सुचिंद्रम मंदिर (तामिळनाडू)
देखो अपना देश या मालिकेतील पर्यटनस्थळांच्या माहितीपर लेखांची आपण आतुरतेने वाट पहात असतात, अशा आशयाचे मेसेज काही वाचकांनी पाठवले आहेत. तसेच लाॅकडाऊनमुळे प्रत्यक्ष सहलीला जरी जाता येत नसले तरी या लेखांतील माहिती व फोटो यामुळे प्रत्यक्ष स्वतः जाऊन आल्यासारखे वाटते, असेही काही पर्यटकांनी नमूद केले आहे. पर्यटन ज्यांचा आवडता विषय आहे, अशा भटक्यांची आगामी सहलींची लिस्ट तयार असते. तर अशा यादीतही या लेखांमुळे फेरबदल होत आहेत, असेही काहींनी आवर्जून फोनवर सांगितले. तर आपल्या या मालिकेत आज आपण भेट देणार आहोत दक्षिणेतील तामिळनाडू राज्यातील सुचिंद्रम मंदिरास….

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
सुचिंद्रम मंदिर हे तामिळनाडू राज्यातील प्रसिद्ध कन्याकुमारी पासून १३ किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना समर्पित आहे. या मंदिरात या तिन्ही देवांचे एकाच मूर्तीमध्ये एकत्र पूजा केली जाते. असे म्हणतात की, मंदिर १३०० वर्ष जुने आहे.
सुचिंद्रम मंदिराबद्दल काही जुन्या पौराणिक कथा आहेत. हे स्थान अरण्य नामक वनात आहे येथे महर्षी गौतम ऋषी आपल्या अनुसया पत्नी सोबत राहत होते. अनुसया या पवित्रतेसाठी व आपल्या पतीवर असलेल्या भक्तीसाठी हिंदू पत्नीचे मूर्तिमंत रूप होत्या. त्यांच्या ह्या भक्तीमुळे त्यांना एक अनोखी शक्ती प्राप्त झाली. त्याला स्थानिक लोक पाथ थेरम असे म्हणतात. पाथ थेरम म्हणजे पतीचे पाय धुतलेले पाणी शिंपडून त्या इच्छेनुरूप पाऊस पाडू शकत होत्या. तसेच कुठल्याही वस्तूचे/ जिवाचे रूप बदलू शकत होत्या.

एकदा देवी लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती या तिन्ही देवींनी जेव्हा या स्त्रीचे सामर्थ्य नारदमुनींकडून ऐकले तेव्हा त्यांनी तिची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्या आपले पती, भगवान ब्रह्मा, विष्णू व शिव यांच्याकडे गेल्या. तेव्हा हे तिघे देव एकत्र आले. नेमके याचवेळी अत्री ऋषी हिमालयात तपस्या करण्यासाठी गेले होते. तेव्हा हे ब्रह्मा, विष्णू व महेश यांनी साधूचा वेष धारण करून ते माता अनुसयेकडे आश्रमात भिक्षा घेण्यासाठी आले. तेव्हा अनुसया स्नान (अंघोळ) करत होत्या व स्नान करत असल्यामुळे त्या भिक्षा देऊ शकत नव्हत्या. पण त्यांना भिक्षा न देता या तिघांना पाठवले तर अधर्म होईल म्हणून त्यांना भिक्षा देणे आवश्यक वाटले. परंतु पर पुरुषासमोर आंघोळ करता करता येता येणार नाही म्हणून त्यांनी त्यांना प्राप्त असलेल्या शक्तींनी त्या तिन्ही साधूंना बाल (शिशु) रूपात परिवर्तित केले व त्यांना आंघोळ करता करता येऊन भिक्षा दिली.
जेव्हा बाल रूपात ब्रह्मा-विष्णू-महेश यांचे परिवर्तन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला हे कळले तेव्हा त्यांनी आश्रमात येऊन अनुसया देवीची क्षमा मागितली. त्यांना बाल रूपातून मुक्त करा, अशी विनंती अनुसया देवींना केली. तेव्हा त्यांनी या तिघांना मुक्त केले पण त्यांच्या बाल्यावस्थेत येथेच राहण्यासाठी सांगितले. तेव्हा ब्रह्मा-विष्णू-शिव यांची एका मूर्तीमध्ये स्थापना केली. या मंदिरात २ हजार वर्षे जुना वृक्ष आहे. ज्याला तमिळ भाषेत कोनायडी वृक्ष असे म्हणतात. या झाडाची पाने एकदम चमकदार आहेत. त्याच्या बुंध्यांतील मोकळ्या जागी या त्रिमूर्तीची स्थापना केलेली आहे.

दुसरी आणखीन एक कथा अशी आहे, गौतम ऋषींनी इंद्राला जेव्हा शाप दिला होता, तेव्हा इंद्राने या वनात तपस्या केली होती. आणि ते या स्थानी शापमुक्त झाले होते. या पवित्र स्थानावरून त्यांनी देवलोक येथे प्रयाण केले होते. या मंदिराच्या प्रवेशद्वारात डाव्या दिशेला सीता व राम यांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. जवळच हनुमानाची १८ फूट उंच मूर्ती आहे.
जेव्हा हनुमान सीता मातेच्या शोधात श्रीलंकेला गेले होते, तेव्हा त्यांनी अशोक वाटिकेत माता सीता समोर ज्या रूपात प्रकट झाले होते त्याच रूपांमध्ये उंच हनुमानाची मूर्ती येथे आहे. त्या मूर्तीसमोर नवग्रह मंडप आहे. या मंडपात नऊ ग्रहांची उत्पत्ती झाली आहे. अलंगर मंडप मध्ये चार संगीतमय स्तंभ (पोल) आहेत. हे स्तंभ अद्भुत दगडांपासून बनवलेले आहे. या चारही स्तंभामधून मृदंग, सितार, जलतरंग व तंबुरा यांच्या या दोन्ही निघतात. पूर्वी जेव्हा देवाची पूजा आरती केली जात असे त्यावेळी याच स्तंभामधून संगीत निर्माण केले जायचे.
या मंदिरात नटराज मंडप आहे या मंडपात आठशे वर्षे जुनी नंदीची भव्य मूर्ती आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर १३४ फूट उंचीचे भव्य शिखर आहे. ते शिखर सात मजल्यात बनवलेले आहे. यामुळे या मंदिराची भव्यता लक्षात येते. हे मंदिर नारळाच्या दाट झाडीत असल्याने व या मंदिराजवळ एक सुंदर तलाव (सरोवर) असल्याने संपुर्ण परीसर निसर्गरम्य आहे.
सरोवराच्या मध्यभागी एक छोटा मंडप आहे. या मंदिरात मर्गळी सण (रथ) यात्रा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान येथील भाविक व्रत ठेवतात. त्या उत्सवा दरम्यानच्या काळात ते भोजन घेत नाहीत. हे व्रत ठेवल्यामुळे त्यांना या उत्सवाचे पुण्य प्राप्त होते. अशा या पुरातन व वैशिष्ट्यपूर्ण मंदिरास आपल्या केरळ – कन्याकुमारी सहली दरम्यान अवश्य भेट द्या.










