स्पिती व्हॅली (हिमाचल प्रदेश)
आजवर आपण अनेक वैविध्य असलेली हटके पर्यटन स्थळांची माहिती घेतली. आपल्या या आगळ्या-वेगळ्या मालिकेत आज आपण आपल्या देशातील अशाच एका लपलेल्या रत्नाचा शोध घेणार आहोत ते म्हणजे स्पिती व्हॅली…

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
हिमाचल प्रदेश हा भटक्यांचा आवडता प्रदेश आहे. कारण या ठिकाणी निसर्गाची मुक्त उधळण तर आहेच शिवाय हा प्रदेश पर्यटकांचे वर्षभर स्वागत करतो. पण आज आपण भेट देत असलेली स्पिती व्हॅली हिमाचल प्रदेशात असूनही मात्र आपण वर्षभरातील फक्त ५-६ महिनेच भेट देऊ शकतो…. कारण येथे होणारी प्रचंड बर्फवृष्टी.
मंडळी हिमाचल म्हटले की आपल्याला शिमला-कुलू-मनाली, डलहौसी, धरमशाला, रोहतांग पास ही परिचीत पर्यटन स्थळे जाणून असतो. या ठिकाणांना आपल्यापैकी अनेकांनी भेटही दिली असेल. मात्र याच हिमाचल प्रदेशात स्पिती व्हॅली हा आगळा वेगळा प्रदेश आहे जो अजवर फार कमी लोकांना माहित आहे. याचं मुख्य कारण हा भाग अजून फारसा विकसित झालेला नाही. येथे वर्षभर पर्यटकांना जाता येत नाही. तसेच हा सर्व प्रदेश डोंगराळ भाग, खडकाळ प्रदेश, कोरडे वाळवंट व नेहमी होणारे भूस्खलन व सहा महिने असणारा बर्फ या घटकांमुळे अजूनही आपला नैसर्गिकपण टिकवून आहे. तसेच प्रदूषण विरहित व निसर्गरम्य आहे.

स्पिती व्हॅली सन १९९२ नंतर पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. रुपयार्ड किपलिंग यांच्या मते येथील लोकांसाठी स्पिती व्हॅली हेच जग आहे, जिथे देव वास्तव्य करतात. यावरून स्पिती व्हॅलीचे वेगळेपण दिसून येते. असे म्हणतात की, स्पिती व्हॅली ही एवढी जुनी आहे की येथे टेथीस महासागराचे नमुने आढळतील. स्पिती व्हॅली हा ट्रान्स हिमालयाचा भाग आहे.
स्पिती या शब्दाचा अर्थ होतो मधली जागा. कारण तिबेट व भारत यांच्या मध्ये स्पिती व्हॅलीचा प्रदेश येतो. शिमला येथून जेव्हा आपण ईशान्येकडे जातो, त्या मार्गावर स्पिती व्हॅली आहे. या मार्गास हिंदुस्तान-तिबेट हायवे असेही म्हणतात. या मार्गावर सर्वप्रथम सांगला हे छोटेसे टुमदार गाव लागते. हा संपुर्ण परिसर सफरचंदाच्या बागा व ऑर्कीड यांनी फुललेला असतो.
स्पिती व्हॅली समुद्र सपाटीपासून १६ हजार फूटांवर असलेल्या कुंझुमला पास येथून सुरु होते. बरेच पर्यटक या भागाचा लाहोल-स्पिती असा एकत्र उल्लेख करतात. मात्र हे दोन वेगळे प्रदेश असून आपणांस परिचीत असलेला रोहतांग पास व कुझूंमला पास यांचेमुळे हे दोन भाग वेगळे झालेले आहेत. मात्र आता हे दोन्ही भाग लाहोल व स्पिती या जिल्ह्यात समाविष्ट असून केलांग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे.
स्पिती व्हॅली हा कोरडा प्रदेश असल्याने येथे फार कमी पाऊस पडतो. मात्र ग्लेशियरचे पाणी नदी मार्गाने या भागास मिळते. दैनंदिन गरजा व थोडीफार शेती येथील नागरिक करतात. शेतीत प्रामुख्याने मटार, बटाटा ही पिके घेतली जातात. तसेच याचबरोबर मुळा, कोबी, गाजर, टोमॅटो हे सुद्धा पिकवले जातात. याशिवाय हस्तकला, पशुसंवर्धन व पर्यटन यातूनही अनेक स्थानिकांना रोजगार मिळतो.











