ओसिया डेझर्ट
नमस्कार मंडळी,
आपण आजवर आपल्या देशातील पर्यटन स्थळांमधे निसर्ग, पर्वत, मंदिरे, राजवाडे, सागर किनारे, अभयारण्ये, फुलांच्या बागा, बर्फाच्छादित प्रदेश अशी जवळपास सर्व प्रकारांची माहिती घेतली. परंतु आपला देश इतका वैविध्यपूर्ण आहे की आपल्याकडे पर्यटकांना हवे असलेले सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. म्हणून आज आपण एका वेगळ्या पर्यटनस्थळाला आज भेट देणार आहोत, जेथे तुंम्हाला निसर्ग निर्मित वाळवंट पहावयास मिळेल…….
आपल्याला सर्वांना राजस्थानमधील जैसलमेर जवळील सॅंड ड्यून्स हे वाळवंट माहित आहे. परंतु जोधपुर जवळील ओसिया येथील वाळवंटाबाबत फारच थोड्या पर्यटकांना कल्पना आहे. म्हणून आपण आज ओसिया या हटके पर्यटन स्थळास भेट देऊया…
आपल्या राजस्थान या राज्याचे मेवाड व मारवाड असे दोन भाग पडतात. यातील मारवाड भागात जोधपूर जवळ ओसिया हे ऐक शहर आहे. ओसिया पूर्वी उपकेसपुर व पाटननगरी या नावाने ओळखले जायचे. मात्र येथिल ओसवाल व माहेश्वरी समाजातील लोकांमुळे हळूहळू याचे नाव ओसिया असे झाले. या ठिकाणी जैसलमेर सारखाच वालूकामय परिसर असला तरी जैसलमेरच्या तुलनेत ओसिया येथे फारच कमी पर्यटक येतात. कारण या ठिकाणाचे व्यवस्थित मार्केटिंग झालेले नाही. ओसिया हे पर्यटकांना माहित आहे ते तेथिल प्रसिद्ध सच्चियाय माता अर्थात ओसिया माता मंदिर व इतर मंदिरासाठी. मात्र ज्या पर्यटकांना जैसलमेरच्या गर्दी ऐवजी छान व शांत वाळवटांत वास्तव्य करायचे असेल त्यांनी अवश्य ओसियाचा पर्याय निवडावा.
ओसिया हे आशिया खंडातील नववे मोठे वाळवंट असलेल्या थरच्या वाळवंटात वसलेले आहे. ओसिया येथे जैसलमेर प्रमाणेच वाळूच्या छोट्या-मोठ्या टेकड्या आहेत. येथे सर्व सुविधायुक्त राजस्थान शैलीतील तंबुत पर्यटकांची राहण्याची व्यवस्था आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे कॅमल सफारी, ओसिया वाळवंटातील जीप सफारी, उंटाच्या बैलगाडीतील फेरफटका, राजस्थानी लोकसंगीत, राजस्थानच्या महाराजांनी बनवलेले चटकदार भोजन अशा विविध सुविधा उपलब्ध असल्याने ओसियाच्या रुपाने जैसलमेर येथील सॅंड ड्यून्सला एक सशक्त पर्याय उपलब्ध झाला आहे.
ओसिया येथील सच्चियाय माता मंदिर, जैन मंदिर व इतर मंदिर समुहांमुळे राजस्थानचे भुवनेश्वर म्हणूनही ओळखले जाते. सच्चियाय मातेची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली आहे. तसेच जैन धर्मियांचे अनेक पवित्र मंदिरे व या मंदिरांची स्थापत्यशैली हजारो पर्यटकांना ओसिया येथे येण्यासाठी आकर्षित करतात. येथे असलेल्या शेकडो मंदिरांमुळे ओसियाला मंदिरांची नगरी असेही संबोधले जाते. येथिल सच्चियाय माता मंदिर व जैन मंदिर वगळता सर्व मंदिरे राजस्थान सरकारच्या अखत्यारीत येतात व या दोन मंदिरांचे कामकाज स्थानिक ट्रस्टद्वारे पाहिले जाते.
सच्यियाय माता मंदिर हे ओसवाल समाजाचे कुलदैवत आहे. आपल्याकडील ओसवाल समाजातील अनेक लोक लग्नापूर्वी ओसिया येथे दर्शनास जातात. येथे विविध मंदिरांप्रमाणेच १८ विविध पुरातन स्मारके आहेत. अशा या विस्तीर्ण वाळवंट, ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारे लोकसंगीत, चटकदार जेवण, मंदिरांचा खजिना व राजस्थानी आदरातिथ्य असे विविध पर्याय असलेल्या ओसियाला एकदा भेट द्यायलाच हवी. चला तर मग अशा या फारश्या प्रचलित नसलेल्या वाळवंटात केव्हा जावे , कसे पोहाचायचे, कुठे रहायचे याबाबत सविस्तर माहिती घेऊया.
केव्हा भेट द्याल
साधारण ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात येथील हवामान आल्हाददायक असते. हाच कालावधी येथील पर्यटनासाठी योग्य आहे.
कसे पोहचाल
जोधपूर येथे सर्वात जवळचे विमानतळ आहे. जोधपूर ते ओसिया हे अंतर ६५ किमी आहे. ओसिया येथे जाण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे.
कुठे रहाल
ओसिया येथील वाळवंटात अनेक ठिकाणी तंबूत राहण्याची व्यवस्था आहे. तसेच हे तंबू सर्व सुविधांनी युक्त व प्रशस्त असतात. ओसिया येथे भरपूर हाॅटेल्स असून राहण्याची चांगली व्यवस्था आहे. मात्र पर्यटकांची पसंती तंबुतील वास्तव्याला असते. सर्व तंबूत रोज सायंकाळी पर्यटकांसाठी लोकसंगीताची मेजवाणी असते. यात पर्यटकही सहभागी होऊ शकतात.
जवळपासची पर्यटन स्थळे
जोधपुर येथील मेहरानगड पॅलेस , उम्मीदभवन पॅलेस , जसवंतथाडा इ.