आपल्या देखो अपना देश या भारतातील हटके पर्यटन स्थळांमध्ये आपण आज जाणार आहोत प्राकृतिक सौंदर्याने नटलेल्या निसर्गरम्य उत्तराखंड मध्ये. उत्तराखंड हे भारतातील पर्यटनदृष्ट्या अतिशय संपन्न असलेले राज्य आहे. उत्तराखंड मध्ये गढवाल व कुमाऊॅं असे दोन विभाग आहेत. येथील निसर्ग सौंदर्यामुळे याला देवभूमी असेही म्हणतात. अशा या देवभूमीतील अस्पर्श असे पर्यटनस्थळ असलेल्या मुन्शियारी या पर्यटन स्थळाला आपण भेट देऊया.
अर्थात मिनी काश्मीर
उत्तराखंड राज्यातील मुन्शियारी हे गाव कुमाऊॅं भागातील पिठोरागड जिल्ह्यात आहे. तसेच हे नेपाळ व तिबेटच्या सिमेस लागून आहे. मुन्शियारी हे समुद्र सपाटीपासून साधारणपणे ७५०० फूट उंचीवर गौरीगंगा नदीकाठी वसलेले आहे. मुन्शियारी गावाने अजून आपले गावपण टिकवून ठेवले असून येथे तुम्हाला आजही मोठ्या प्रमाणावर दगड-माती-लाकुड यांचा वापर करुन बनविलेली असंख्य जुनी घरे दिसतील.
मुन्शियारी गावाची आपली वेगळी ओळख असली तरी यास मिनी काश्मीर तसेच मिनी स्विर्त्झलॅंड असेही म्हणतात. याचे मुख्य कारण म्हणजे तुम्हाला येथे काश्मीर व स्विर्त्झलॅंड प्रमाणेच बर्फाच्छादित पर्वत, ग्लॅशियर्स, देवदार व पाईनचे वृक्ष, असंख्य तलाव व खळाळत्या नद्या-नाले, हिरवेगार डोंगर असे सर्व बघावयास मिळेल. यामुळे येथे वर्षभर परदेशी पर्यटकांची वर्दळ असते.
मुन्शियारी हे पर्यटन स्थळ शहरातील गर्दीपासून दूर आहे व हे माऊंटेनियरींग, कॅंम्पिंग व ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. याचबरोबर येथे बर्थी धबधबा, माहेश्वरी कुंड, पंचचुला पर्वत, गायत्री चेतना केंद्र, खलियाटाॅप, नंदादेवी मंदिर, मिलन व रालम इ. ग्लेशिअर, थमरी कुंड अशी एकसे बढकर एक पर्यटन स्थळे आपण बघू शकतो. तसेच येथून नेपाळची काही शिखरेही स्पष्ट दिसतात.
मुन्शियारी व पिठोरागड येथे जगातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन आकारास येत असून त्यानंतर हा परिसर पर्यटकांनी फुलून जाईल. तसेच येथे इतरही अनेक प्रकारची रानफुले फुलतात. या परिसरात तुम्ही कुठल्याही दिशेला बघितले तर विहंगम दृश्य बघायला मिळते. चला तर मग लाॅकडाऊन संपल्यानंतर सर्वप्रथम देवभूमी मुन्शियारीला.
कसे पोहचाल
मुन्शियारी येथून जवळचे विमानतळ हे पंतनगर आहे ते ३१३ किमी अंतरावर आहे. तसेच काठगोदाम हे रेल्वे स्टेशन ३०० किमीवर आहे. येथून पुढे रस्तामार्गे जावे लागते. पण हा प्रवास अतिशय सुंदर व अविस्मरणीय आहे.
योग्य कालावधी
येथे जाण्यासाठी मार्च ते जून हा कालावधी सगळ्यात चांगला आहे. मात्र स्नोफाॅलचा आनंद घ्यायचा असेल व प्रचंड थंडी सहन करायची तयारी असेल तर नोव्हेंबर ते मार्च या काळातही जाता येईल. कारण येथे भरपूर बर्फ पडतो. मात्र पावसाळ्यात अजिबात जाऊ नये.
कुठे रहाल
मुन्शियारी परिसरात काही चांगले हाॅटेल्स व होम स्टे आहेत. येथे ३/४ दिवस राहून सर्व परिसर बघता येतो.
खरेदी
याठिकाणी पश्मिना व अंगोरा शाॅल उत्तम मिळतात. तसेच स्थानिक महिलांनी विणलेले स्वेटर्स, कानटोपी, मफलर इ. गरम कपडे खरेदी करु शकता.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!