कास पुष्प पठार
नमस्कार, इंडिया दर्पणच्या माध्यमातून सुरु झालेली “हटके डेस्टिनेशन” ही पर्यटन स्थळांची यात्रा तब्बल पन्नासाव्या भागापर्यंत पोहचली आहे. दरम्यानच्या काळात आम्ही देशातील अनेक अस्पर्शित व लपलेली हटके पर्यटन स्थळे आपल्या डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. हे कार्य अव्याहतपणे चालले याला एकमेव कारण म्हणजे आपला उत्साह आणि प्रतिसाद. त्यामुळेच आम्ही सातत्याने नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती आपणास दिली. खरंतर वर्षातून एक-दोन सहली करणारी मंडळी मागील मार्चपासून कुठेही फिरायला जाऊ शकलेली नाही. परिणामी, ही भटकी मंडळी घरात बसूनच आहे. अशा पर्यटकांना सहलीस जरी जायला मिळाले नसले तरी सचित्र माहिती देऊन आम्ही तुमच्यातील व पर्यटन स्थळांमधील दुरावा कमी करु शकलो, याचा आम्हाला आनंद आहे. चला तर मग आज आपण अशाच एका वेगळ्या पण निसर्गनिर्मित पुष्प पठारास भेट देऊया. ज्याची माहिती तुम्हास निश्चितच अचंबित करणारी असेल.
कास पुष्प पठार
आपल्या महाराष्ट्रातील पश्चिम घाटात अनेक रत्न लपलेली आहेत. त्यापैकी एक म्हणजे सातारा जिल्ह्यातील कासचे पुष्प पठार. हे कासचे पुष्प पठार सातारा-बामणोली-तापोळा या रस्त्यावर सातारा शहरापासून फक्त २३ किलोमीटर अंतरावर आहे.
आपण प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर मार्गही कासला पोहचू शकतो. कुठल्याही मार्गाने गेले तरी सुरुवातीला छोटे नागमोडी वळण घेणारे रस्ते आपल्याला अचानक पठारावर घेऊन जातात. पठारावर पोहचल्यावर जे समोरचे दृश्य असते ते डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडणारे असते. कास पठार ही नैसर्गिक देणगी आहे. यात येथील खडकाळ व लाल माती असलेली जमीन या विविधरंगी फुलांचा गालिचा तयार करण्यास हातभार लावतात. कास पुष्प पठार हे समुद्र सपाटीपासून १२१३ मीटर उंचीवर असून या सुमारे १८०० हेक्टरच्या भव्य परिसरात ८५० पेक्षा जास्त दुर्मिळ पुष्प वनस्पतींचे प्रकार आढळतात. यातील अनेक वनस्पती औषधी व दुर्मिळ आहेत. काही वनस्पती तर अशाही आहेत की ज्या फक्त कास येथेच उपलब्ध आहेत, असे येथे नियमित भेट देणार्या संशोधकांचे मत आहे.
कास पठारावरील फुलांचे महत्व म्हणजे येथील फुले विविधरंगी आहेत. तसेच काही फुले ठराविक काळानंतर रंग बदलतात. या परीसरात नजर पोहचे पर्यंत कुठेही बघा फुलेच फुले दिसतात. ही सर्व फुले नैसर्गिक आहेत. हवामानाच्या बदलानुसार रंग बदलणारी आहेत. यामुळे आपण एकाच हंगामात काही ठराविक अंतराने कास पठारास भेट दिली तर समोर दरवेळी वेगळाच नजारा पहावयास मिळतो. या पठारावरील बोचरा वारा, पावसाच्या हलक्या सरी, दाट धुके व फुलांचे विविधरंगी गालिचे आपले मनापासून स्वागत करतात. या परिसरातील जैवविविधतेमुळे कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळांमधे युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे.
कास पठारावरील लक्षावधी, विविधरंगी फुले असलेले हे निसर्गाचं देखणं रुप पर्यटकांना आकर्षित करीत असतं.
कास पठारचे वैशिष्ठ्य म्हणजे येथील काही फुले दरवर्षी फुलतात तर काही फुले दर सात वर्षांनी फुलतात. तसेच दर नऊ वर्षांनी फुलणारी टोपली कारवी हे कासचे खास आकर्षण आहे. जसे आकाशातील काही ठराविक काळाने दिसणारे निसर्ग निर्मित ग्रहांचे योग आपण अवश्य बघतो. तसेच निसर्गाची ही जमिनीवरची रंगीबेरंगी आवर्तनं आपण अवश्य बघायलाच हवी. येथे शुभ्र पांढरा, पिवळट पांढरा, लाल, निळा, पिवळा, जांभळा, अबोली अशा असंख्य फुलांचे रंग पाहतांना ओठावर आपसूक या गाण्यांच्या ओळी येतात……. यह कौन चित्रकार है….
येथील फुलांमधे कारवी सारख्या दुर्मिळ दर्शन देणार्या फुलांव्यतिरीक्त पांढरे आमरीचे कोंब, दोन तुर्यांचा वायतुरा, पिवळी सोनकी, कवळ्याची मिकीमाऊस, सीतेची वेणी व सीतेची आसवे, लाल रंगाचा तेरडा, कुमुदिनीची कमळे, विविध जातींचे पांढर्या फुलांचे ताटवे यांचे सुंदर सुंदर फोटो घेण्याचा मोह कुणीही टाळू शकत नाही. या कास पठारावर कंदी पुष्पांचे विविध प्रकारही पहावयास मिळतात. यात निचुर्डी, अबोलिमा, ब्युगोनिया, दिपकांडी, चवर, गौरीहार, रानहळद, आभाळी, नभाळी, हत्तीची सोंड, सापकांदा, नागफणी, शेषगिरी, ड्राॅसेरा इ.अशी नाना प्रकारची फुले आढळतात.
आता जिथे अशी लाखो फुलांची मेजवानी असते तेथील निसर्गाचं हे अनोखं रुप सजविण्यात प्राणी-पक्षी-किटक कसे मागे राहतील. या कास पठारावर आपणास ३२ प्रकारची फुलपाखरे, १९ प्रकारचे सरपटणारे प्राणी, १० प्रकारचे सस्तन प्राणी व पक्ष्यांच्या सुमारे ३० पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. अशा प्रकारचं विविधरंगी लेणं ल्यायलेल्या परिसरात देश-विदेशातून पर्यटक भेट देण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी येतात. आनंदाची बातमी म्हणजेच महाराष्ट्र सरकारने हा निसर्ग निर्मित खजिना यंदा पर्यटकांसाठी खुला केला असून याबाबत www.kas.ind.in या संकेतस्थळावर माहिती घ्यावी. तसेच येथे भेट देण्यापूर्वी प्रथम नोंदणी करणे अनिवार्य आहे.
कास पठारास भेट देण्यासाठी कास संरक्षण समितीच्यावतीने शुल्क आकारले जाते. येथील निसर्गाची हानी होऊ नये म्हणून रोज ठराविक संख्येनेच पर्यटकांना प्रवेश दिला जातो. दरवर्षी कास पठारास भेट देणार्या पर्यटकांची संख्या वाढत असली तरी हा नैसर्गिक ठेवा जतन करण्याची जबाबदारी आपली आहे, याची जाण ठेवावी. येथील बरीचशी फुले आपल्या घरी व आपल्या बागेत येणार नाहीत. त्यामुळे फुले तोडण्याचा, रोपे सोबत घेण्याचा प्रयत्न करु नये. तसेच या सुंदर फुलांसोबत आपला सेल्फी घेतांना फुल झाडांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. कास पुष्प पठारावरील जैवविविधता जोपासणे त्याचे संरक्षण करणे हे वन विभागासह आपलेही कर्तव्य आहे. अन्यथा दंड भरण्याची तयारी ठेवावी. फुलांचा आनंद घेतांना रस्त्यात कुठेही वाहने पार्कींग करु नये. चला तर मग या कास पठारच्या अनोख्या दुनियेत कसे पोहचावे , केव्हा जावे, कुठे रहावे याबतची माहिती घेऊया.
कसे पोहचाल
सातारा येथे विमानतळ नाही. नजिकचे विमानतळ कोल्हापूर आहे. मात्र तेथेही मोजकीच विमाने जातात. मात्र पुणे-बंगळुरू या महामार्गावर सातारा शहर असल्याने रस्ते मार्गे प्रथम सातारा व मग तेथून २३ किमी अंतरावर कास पठार आहे. सातारा येथे रेल्वेने पोहचता येते. मात्र रेल्वेही मर्यादित आहेत. पुणे मार्ग जातांना महाबळेश्वर-तापोळा मार्गही कास पठार येथे पोहचता येते.
केव्हा जावे
पावसाचा सिझन संपला की जुलै ते ऑक्टोबर हा कालावधी कासला भेट देण्यासाठी योग्य असतो.
कुठे रहावे
कासपासून जवळ तापोळा येथे काही हाॅटेल्स आहेत. मात्र महाबळेश्वर, पाचगणी व सातारा येथे चांगली हाॅटेल्स आहेत.
काय पहावे
कास पठारासोबत महाबळेश्वर, प्रतापगड, तापोळा, पाचगणी, अजिंक्यतारा, सज्जनगड अशी पाच-सहा दिवसांची मस्त सहल होऊ शकते.