चकराता (उत्तराखंड)
मंडळी नमस्कार
आपल्या हटके पर्यटन स्थळांच्या माहितीपर लेख मालिकेत मध्यंतरीच्या काळात कुठल्याही पर्यटनस्थळाची माहिती देता आली नाही. त्याबद्दल प्रथम दिलगिरी व्यक्त करतो. आज आपण चकराता या उत्तराखंड राज्यातील अचर्चित थंड हवेच्या ठिकाणाची माहिती घेणार आहोत.
चकराता हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड राज्याची राजधानी असलेल्या डेहराडून जिल्ह्यात येते. चकराताची समुद्र सपाटीपासून उंची २११८ मीटर म्हणजेच ६९४० फुट आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेले चकराता हे एक मस्त छोटेखानी हिल स्टेशन आहे. ज्याबद्दल भारतीय पर्यटकांना फारशी माहिती नाही. शांत व नयनरम्य असलेलं चकराता प्रदूषणमुक्त पर्यटन स्थळ आहे. तसेच चकराता हे देशभरातील ट्रेकर्स व निसर्गाची आवड असलेल्या पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आलेलं आहे.
येथील घनदाट उंच वृक्षराजी व त्यातील पायवाटांवर चालणे, ट्रेक करणे हे पर्यटकांना आवडते. ब्रिटीश अधिकारी कर्नल ह्युम याने चकराताची स्थापना केली असे म्हणतात. कर्नल ह्युम व त्याच्या सहकार्यांनी त्याकाळी चकरातास उन्हाळी सैनिकी स्थळाचा दर्जा दिला होता. अशा या चकराता परिसरास भेट देणार्या पर्यटकांना खालील पर्यटनस्थळांना भेट देता येते.
लाखामंडल
लाखामंडल हे चकराता पासून ६० कीमी अंतरावर यमुना नदीकाठी आहे. येथे पुरातत्व विभागाने केलेल्या खोदकामात लाखो मूर्ती सापडल्या आहेत. या महाभारत काळातील मूर्ती आहेत, असे मानले जाते. येथे लाखो मूर्ती असल्याने यास लाखामंडल असे नाव पडले आहे. असे म्हणतात की, कौरवांनी पांडवांना जाळण्यासाठी ही जागा निवडली होती. पण पांडव येथील एका गुहेत लपून एक महिन्याने चकरातास पोहचले. याचमुळे येथे पांडव, परशुराम, केदार यांची मंदिरे आहेत.
टायगर फाॅल
चकराता येथून ५ किमी अंतरावरील हा नैसर्गिक धबधबा साधारण ५० मीटर उंचीवरुन कोसळतो. हा टायगर वाॅटरफाॅल हे चकराता येथे येणार्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.
रामतल गार्डन
रामतल गार्डन हे चकराता पासून ९ किमी अंतरावर आहे. रामतल हे छान पिकनीक स्पाॅट आहे.
देववन
चकराता येथून १६ किमी अंतरावर असलेले देववन घनदाट वृक्षराजीसाठी प्रसिद्ध आहे. या अतिऊंच वृक्षांमधील पायवाटा व ट्रेक खुपच विलोभनीय आहेत. तसेच येथून हिमाचल पर्वतरांगा स्पष्टपणे दिसतात.
कसे पोहचाल
विमानमार्ग चकराता येथे जाण्यासाठी १२३ किमी अंतरावर डेहराडून येथे जाॅली ग्रांट विमानतळ आहे. रेल्वेने जाऊ इच्छिणार्या पर्यटकांनाही डेहराडून हेच जवळचे रेल्वे स्टेशन आहे. रस्तेमार्ग चकराता डेहराडून जोडलेले आहे.
केव्हा जावे
मार्च ते जून व ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी चकराता येथे जाण्यासाठी योग्य असतो.
कुठे रहाल
चकराता येथे अनेक छोटी-मोठी हाॅटेल्स आहेत. तसेच येथील होम स्टे मधे राहण्याचा आनंद वेगळाच आहे.