इंडिया दर्पण विशेष – गुरुवे नमः
नाशिक टेबल टेनिसला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजय मार्ग दाखविणारा जय मोडक
टेबल टेनिस या खेळात अतिशय भरीव योगदान देणारे आणि अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणारे प्रशिक्षक अशी जय मोडक यांची ओळख आहे. त्यांचा आजवरचा प्रवास हा वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळे त्याची दखल घेणे आवश्यकच आहे.
त्याचे वडील (संजय मोडक) मागच्या पिढीतील नामवंत टेबल टेनिस खेळाडू होते. आज ते साठीतही महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे ज्याला घरातूनच टेबल टेनिसचे धडे जन्मापासून मिळाले आहेत, तो तिकडेच वळणार हे निश्चित होते. तथापि या पार्श्वभूमीमुळे जरी त्याला टेबल टेनिस मध्ये सहज प्रवेश मिळाला तरी तेथे यश मिळण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी केलेले कष्ट मात्र त्याचे स्वतःचेच आहेत. जयची खेळाडू म्हणून कारकीर्द कौतुकास्पद आहे. तसेच, महाराष्ट्रचे माजी जुनियर विजेते असणाऱ्या वडिलांना भूषणावह सुद्धा आहे. तो राज्याकडून तीन रॅकिंग सारख्या अतिशय तीव्र स्पर्धा असलेल्या स्पर्धेचा विजेता आहे. राज्याकडून नऊ वर्षे विविध वयोगटात राष्ट्रीय पातळीवर चमकला आहे. भारतातर्फे तो वर्ल्ड जुनियर स्पर्धाही खेळलेला आहे हे विशेष. त्याहीपेक्षा मोठे यश तो इंग्लंडला M.Sc. करीत असताना त्याने मिळविले. ते म्हणजे ब्रिटनमधील आंतरविद्यापीठ स्पर्धेत रौप्य पदक पटकावून. तसेच युरोपीय विद्यापीठ स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारून. अशी चमकदार कारकीर्द असलेला खेळाडू त्याच्या ऐन तारुण्यात प्रशिक्षक होतो तेव्हा थोडी खळबळ होतेच. तशी ती झाली सुद्धा, पण प्रशिक्षक झाल्यावर सातत्याने चांगले रिझल्ट दिल्याने जयचे बस्तान चांगल्या प्रकारे बसले. परिणामी, खळबळ शांत झाली.
जयच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा फायदा त्याच्या चेल्यांना तसे की सायली वाणी, तनिशा कोटेचा, कुशल चोपडा, पुनीत देसाई आदींना उत्तम प्रकारे करुन देत आहे. आज हे खेळाडू केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धा आत्मविश्वासाने खेळताना दिसतात. पदकेही मिळवत आहेत. सायलीने वर्ल्ड जुनियर स्पर्धेत कांस्य पदक मिळविले आहे तर तनिशा आणि कुशल तुनिशिया व ओमान स्पर्धेत उपान्त्य फेरीत खेळले आहेत. राष्ट्रीय 13 वर्षे वयोगटाखालील स्पर्धेत तनिशाने दोनदा कांस्य मिळविले आहे. हे सर्व खेळाडू राष्ट्रीय रँकिंग मध्ये गेली काही वर्षे पहिल्या दहात स्थान टिकवून आहेत. त्यामुळे त्यांना सहाजिकच आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही खेळण्याची संधीही मिळते. हे यश जय मोडक या प्रशिक्षकाचे आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अनुभव तो खेळाडूंना प्रशिक्षण देताना पुरेपूर वापरतो आणि म्हणूनच त्याने खेळाडूंना आधुनिक (state of the art) पध्दतीने प्रशिक्षण दिले. नवी तंत्रे शिकविली. स्वतः तरुण असल्याने तरुण खेळाडूंबरोबर त्याची chemistry उत्तम जमते. तसेच त्यांना समजून घ्यायला त्याला अधिक सोपे जाते. खेळाडूबरोबर मित्रांसारखा राहत आणि वागत असल्याने खेळाडू मोकळेपणाने त्याच्याशी संवाद साधताना दिसतात. प्रशिक्षक होणे म्हणजे फक्त टेबल टेनिस कसे खेळायचे इतकेच शिकविले जात नाही, तर त्यांना खेळाडू म्हणून मानसिकरित्याही कणखर करणे, मह्त्वाच्या सामन्यात आत्मविश्वासपूर्वक उभे करणे तसेच विजयात किंवा पराजयात समतोल राहणे या गोष्टीही तो शिकवितो.
अनेक खेळाडूंना तो मानसिक आधार देतो. विशेषत: मोठ्या खेळाडूविरूध्द खेळताना किंवा महत्वपूर्ण सामना खेळण्यापूर्वी लागतो तो आधार आणि आत्मविश्वास जय देत असतो, असे खेळाडू सांगतात आणि त्याचा फायदाही झाल्याचे सांगतात. त्यामुळे त्याची महाराष्ट्राच्या विविध संघाचे प्रशिक्षक म्हणूनही नेमणूक सातत्याने होत आहे. आता जयचे प्रशिक्षक म्हणून बस्तान चांगले बसले आहे. नाशिकच्या टेबल टेनिसला पुन्हा त्याने वैभवाचे दिवस दाखवावे आणि मुख्य म्हणजे age group मध्ये उत्तम यश मिळाले आहे आता सिनियरमध्ये ही यशाची अपेक्षा करायला हरकत नाही!