इंडिया दर्पण विशेष – गुरुवे नमः
विक्रमी गोलंदाज सत्यजित बच्छावचे प्रशिक्षक संजय मराठे
सध्या सुरू असलेल्या रणजी सामन्यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सत्यजित बच्छावचे प्रशिक्षक संजय मराठे यांची आज आपण ओळख करुन घेणार आहोत. मराठे यांनी सत्यजितसह अनेक उत्तम खेळाडू घडविले आहेत. त्यांची अपार मेहनत त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचते आहे.

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर जसे सचिनच्या उदयाबरोबर एका रात्रीत प्रसिद्ध झाले तसे महाराष्ट्राचा आधारस्तंभ असलेला डावरा फिरकी सत्यजित बच्छाव ने परवाच ( ता २० फेब्रुवारी २०२०) रोहतक येथे आसाम विरूध्द खेळताना पहिल्या डावात २५ धावात ४ बळी आणि ५२ धावांची मजबूत खेळी केली तर दुसऱ्या डावात तर ४५ धावात ७ बळी घेउन महापराक्रम केला. सामन्यात एकूण ६९ धावात ११ बळी घेत फक्त महाराष्ट्राला पहिल्याच सामन्यात डावाने विजय मिळवून दिला नाही तर आपल्या प्रशिक्षकाना म्हणजेच संजय मराठे याना सार्थ आणि आवश्यक अशी प्रसिद्धी मिळवून दिली. प्रामाणिक आणि कष्टाळू असलेल्या संजय मराठे या प्रशिक्षकाच्या आयुष्यातील हा दिवस सुवर्णदीन म्हणून नोंदला जाईल.
आपण तयार केलेले शिष्य जेंव्हा असे नाव कमावितात तेंव्हा खरे तर तो प्रशिक्षकाच सन्मान असतो पण संजय हे काही यशाने हुरलुन जाणारे आणि अपयशामुळे खचून जाणारे प्रशिक्षक नाही . त्यामुळे असे लक्षणीय यश ते त्यांच्या स्वभावाला अनुसरून थोडेसे Smile देत , गाजावाजा न करता स्विकारतात. सुमारे २४ वर्षांपूर्वी बीसीसीआयची प्रशिक्षकाची लेव्हल वन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी नाशिक जिमखाना येथे क्रिकेटचे प्रशिक्षण सुरु केले आणि तिथल्या क्रिकेटच्या दृष्टीने गैरसोयीच्या आणि मर्यादित जागेबाबत कोणतीही तक्रार न करता आपले प्रशिक्षणाचे काम ते आजही चोखपणे करीत आहेत. नाशिक जिल्ह्याकडून १९ वर्षे आघाडीचा फलंदाज म्हणून विविध वयोगटात खेळलेला असल्याने खेळाडूची मानसिकता आणि तो करित असलेल्या चुका याची त्याना चांगली माहिती आहे.
“सर खेळाडूच्या चांगल्या आणि वाईट काळात खंबीरपणे मागे उभे राहून त्याचा आत्मविश्वास कमी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतात. या खेळात ups and downs ही नित्याची बाब आहे विशेषत खेळ चांगला होत नसेल तर खेळाडू नर्व्हस होतो , खेळताना चुका करतो त्यामुळे खेळावर परिणाम होतो . अशावेळी खेळाडूला मानसिक आधार लागतो तो सरांनी वेळोवेळी दिला आहे ” हे उद्गार आहेत त्यांचा सुप्रसिद्ध शिष्य सत्यजित बच्छावचे. त्यांच्याकडे तयार झालेल्या मह्त्वाच्या खेळाडूंची यादी बघितली तर असे लक्षात येते की महाराष्ट्राकडून विविध गटात खेळलेले नाशिक जिमखाना येथे तयार झालेले एकूण तब्बल १८ खेळाडू आहेत. (त्यातील काही नावे बघा मनोज परदेशी, मनोज पालखेदे, सुनील पटेल, नीलेश चव्हाण, यासर शेख , अभिमन्यू सिंग, तन्मय शिरोदे आणि अलीकडेच चमकत असलेला यष्टिरक्षक फलंदाज शर्विन किसवे)
खेळाडूला फक्त खेळाचे तंत्र शिकविणारे अनेक आहेत पण खेळाडूला त्याच्या मर्यादा, शरिर यष्टि आणि मानसिकता ओळखून त्याला योग्य मार्गदर्शन कसे करावे हे संजय सर बरोबर जाणतात हे स्वतः सत्यजित बच्छावनेच सांगितले. सत्यजितला जलदगती गोलंदाज बनायचे होते पण त्याच्यात फिरकी गोलंदाज होण्याची क्षमता आणि कौशल्य अधिक आहे हे ओळखून संजयसरांनी सत्यजितला फिरकी गोलंदाज व्हावे असा सल्ला दिला आणि तो किति योग्य होता हे आपण पाहातच आहोत. अशा अनेक खेळाडूना त्यांनी तंत्रात थोडा बदल करून किंवा थोडे समुपदेशन करून त्यांचे करीअर घडवले आहे आणि हे काम त्यांचे अथकपणे चालूच आहे. क्रिकेट हा अति प्रसिद्ध खेळ असल्याने जास्तीतजास्त मुलांना क्रिकेटपटूच बनायचे असते त्यामुळे सहाजिकच अनेक प्रशिक्षक आणि प्रशिक्षण केंद्रे होत असतात अशा तीव्र स्पर्धेत संजय मराठे इतकी वर्षे का टिकून आहेत याचे उत्तर सत्यजित बच्छाव ने चपखलपणे दिले.