इंडिया दर्पण विशेष लेखमाला – गुरुवे नमः
बॅडमिंटन प्रशिक्षक मकरंद देव
अनेक बॅडमिंटनपटूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठविण्यात प्रशिक्षक मकरंद देव यांचा मोठा वाटा आहे. नाशिकमध्ये प्रारंभिक पातळीवर काही खेळाडूंना प्रशिक्षण दिल्यानंतर आता त्यांच्या या कार्याचा आता मोठा वटवृक्ष तयार झाला आहे. आज आपण त्यांच्याच कारकिर्दीवर नजर टाकणार आहोत.
नाशिकमध्ये बॅडमिंटन या खेळात बोटावर मोजता येतील असे काही राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू पूर्वीच्या काही वर्षात तयार झाले. पण हा खेळ फक्त श्रीमंत लोकच खेळतात असा समज त्यावेळी झाला. तसेच, मोजक्याच जिमखान्यात उच्चभ्रू लोकच हा खेळ खेळत असल्याने नाशिकची या खेळात खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती होऊ शकली नाही. चाळीसगाव येथे सामान्य कुटुंबात मकरंद देव राहत होते. आपल्या गावात बॅडमिंटनला आणि कोचिंगला फारसा वाव नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते नाशिकला आणि त्यांनी बॅडमिंटनमधील नाशिकचे चित्र एकदम बदलून टाकले.
गंगापूररोडवरील नाशिक मनपाने एक छोटेखानी क्रीडा केंद्र शिवसत्य मंडळात सुरु केले. तेथील बॅडमिंटन कोर्टची धुरा मकरंद देव या फक्त जेमतेम तिशीत असलेल्या प्रशिक्षकाकडे तत्कालिन आमदार दौलतराव आहेर यांनी दिली. तो निर्णय किती अचूक ठरला हे आपण पाहतच आहोत. आज २८ वर्षांनंतरही तेथील मुख्य प्रशिक्षक मकरंद देवच आहेत. त्यांनी घडविलेल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील खेळाडूची संख्या सर्वात जास्त आहे तसेच दर्जाही. भारतीय संघातील महिला दुहेरीची (अश्विनी पोनप्पा तसेच सिक्की रेड्डी सह) सतत तीन वर्षे अव्वल खेळाडू प्रज्ञा गद्रे ही मकरंदचीच देणगी आहे. बेसिक ट्रेनिंग मकरंदकडे घेतल्यानंतर Advanced Coaching साठी ती गोपीचंद अकादमीत गेली. पण तो पर्यंत ती ११, १३, १५ आणि १७ वयोगटातील राष्ट्रीय विजेती झाली होती ती मकरंदच्या हाताखालीच. आजही आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रणव चोप्रासह विवाहबद्ध झाल्यानंतरही ती जेव्हा नाशिकला येते तेव्हा तिच्या या पहिल्या गुरूची भेट घेतल्याशिवाय जात नाही. तथापि प्रज्ञा ही काही एकमेव खेळाडू मकरंदकडे तयार झालेली नाही. नाशिकचा उगवता तारा आणि शिवसत्यमधील केअर टेकरचा मुलगा प्रज्वल सोनावणे हा वयोगटातील राष्ट्रीय विजेता सध्या advanced ट्रेनिंगसाठी बंगळुरू येथील प्रकाश पडुकोण अकादमीत मकरंदच्या सल्ल्याने प्रशिक्षण घेत आहे. आणि गेल्या सहा महिन्यात तो युरोप येथील दोन जागतिक दर्जाच्या स्पर्धेत अव्वल खेळाडूंना पाणी पाजून विजेता झाला.
वरील दोघांशिवाय जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले आजी-माजी राष्ट्रीय विजेते शिखा गौतम, सई नांदुरकर, चैताली चौधरी आणि माजी विजेते सिध्दार्थ आणि यश वाघ, अभिषेक पाटील तसेच भारतीय विद्यापीठ विजेता गौरव सोनवणे या सर्वांनी त्यांचे बॅडमिंटन खेळामधील धडे मकरंद कडेच गिरविले आहेत. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे किंवा करीत आहेत. शिवसत्य मंडळात वूडन कोर्ट करणे आवश्यक आहे हे मकरंदने पदाधिकारी लोकांना पटवून दिले. त्यामुळे मंडळाचाच नव्हे तर खेळाडूचाही कायापालट झाला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्ट मिळाल्यामुळे मकरंदचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण अधिक जोमाने सुरु झाले. आणि त्याच्या क्लबचे आजही जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. अलिकडे त्याने व्यावसायिक हुशारी दाखवून प्रकाश पदुकोण अकादमीशी टाय अप केले. त्यामुळे स्वतः प्रकाश पदुकोण आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू विमलकुमार यांचे मार्गदर्शन मकरंदच्या निवडक शिष्यांना मिळाले आहे. आणि मिळत आहे. शिवसत्य व्यतिरिक्त हल्ली तो केंसिंग्टन क्लब येथेही सिनियर कोच म्हणूनही रुजू झाला आहे. त्याच्या बॅडमिंटनवरील प्रेमाने आणि निष्ठापूर्वक कामामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक संकटे (विशेषतः कोरोना काळात) आली. तरीही तो पुन्हा उभा आहे हे विशेष. कारण त्याच्यामते पराभवानंतर आणि विजयानंतरही शांत कसे राहायचे हेच खेळ शिकवितो.