इंडिया दर्पण विशेष – गुरुवे नमः
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अॅथलेटिक्स प्रशिक्षक विजेंद्र सिंग
उत्तर प्रदेश मधील हरिद्वार येथील कुणी विजेंद्र सिंग नावाचा ॲथलेटिक्सचा प्रशिक्षक नाशिक येथे साई ॲथलेटिक्स सेंटरचा मुख्य प्रशिक्षक म्हणून येतो काय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवतो काय. हे सारे अपार मेहनतीचे फळ आहे. गेल्या २५ वर्षांत नाशिकचे नाव त्यांनी घडविलेले खेळाडूंमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले आहे. हे सारेच अजब पण अतिशय स्पृहणीय आणि प्रशंसनीयच!

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
१९९२ साली नाशिकला साई ॲथलेटिक्स सेंटर सुरु झाले. आज ३० वर्षांचा गौरवास्पद इतिहास सगळ्यांच्या समोर आहे . मिनी सुवर्ण (१९९९) पासून साधारणपणे नाशिकचे ॲथलिट – मुख्यत्वे- मध्यम आणि लांब पल्ल्याचे धावपटू- जे देशातील आणि आंतरराष्ट्रीय मैदाने गाजवीत आहेत. तो पराक्रम अव्याहतपणे चालू आहे. सिंग सर खरे तर आज वयाच्या साठीत आहेत. तथापि त्यांचा उत्साह यत्किंचीतही कमी झालेला नाही. आजही पहाटे ४ वाजता भोसला मैदानावर खेळाडूंच्या आधी संपूर्ण कीटमध्ये हजर असतात. तसेच दुपारच्या सत्रात तीन वाजेपासून भोसला किंवा १० किमी दूर असलेल्या विभागीय क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅकवर हजर असतात. खास म्हणजे त्यांना सुट्टी माहिती नाही.
हे कमी आहे म्हणून की काय, स्पर्धेसाठी खेळाडूबरोबर भारतात कोठेही त्यांना स्पर्धेआधी महत्त्वाच्या टिप्स देण्यासाठी तसेच प्रोत्साहित करण्यासाठी ते स्वतः सर्वठिकाणी जातीने उपस्थित रहातात हे विशेष! त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीने खेळाडू motivate होतात आणि पदके मिळवितात, असे अनेक ॲथलिट सांगतात. लांब पल्ल्याच्या म्हणजे ५ हजार मीटर, १० हजार मीटर, अर्ध आणि पूर्ण मॅरेथॉन, मध्यम पल्ल्याच्या म्हणजे ४०० मीटरपासून ३ हजार मीटर पर्यंतच्या स्पर्धांमध्ये भारतात आज नाशिकचे खेळाडू देशात अव्वल आहेत. जवळपास सर्व शालेय, विद्यापीठ, आणि महासंघ आयोजित तसेच खेलो इंडियाच्या सर्व राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धात पदक विजेते खेळाडू हे नाशिकचेच असतात. ते केवळ आणि केवळ विजेंद्र सिंग यांच्यामुळेच!
विजेंद्र सिंग यांचे नाव आणि लौकिक भारतात इतका झाला आहे की, इतर जिल्ह्यातील आणि इतर राज्यातील खेळाडू हे नाशिक सेंटरला येऊन राहतात (उदा. दिनेश आणि आवेश यादव, कोमल जगदाळे, दिनेश पटेल इ). विजेंद्र सिंग सरांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतात आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवितात. नवीन येणारा खेळाडू कोणत्या प्रकाराला (१०० मी ते मॅरेथॉनपर्यंत) योग्य आहे हे त्यांच्या नजरेला इतके अचूक कळते की ते सहसा चुकत नाही. खेळाडूची शरीर रचना आणि मानसिकता पाहून ते त्यांना stamina किंवा endurance किंवा strength वाढवण्यासाठी योग्य व्यायामाची आखणी करतात. त्याचा अचूक क्रीडाप्रकार ठरवितात.
विजेंद्र सिंग यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण म्हणजे कविता राऊतची रिओ ऑलिम्पिक (२०१६) मध्ये मॅरेथॉनसाठी झालेली निवड. तसेच मोनिका आथरेची २०१८ लंडनमध्ये वर्ल्ड ॲथलेटिक्स Championship साठी झालेली निवड. याशिवाय कविताची आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील पदके, संजीवनी जाधवचे आशियाई स्पर्धांमध्ये मिळवलेले पदक. याव्यतिरिक्त किसन तडवी, अंजना ठमके, दुर्गा देवरे, कोमल आणि पल्लवी जगदाळे (स्टीपलचेस), आरती पाटील आदी ॲथलिट नियमितपणे मिळवित असलेली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विविध स्पर्धांमधील पदके. Show must go on या तत्वाला अनुसरून विजेंद्रसिंग अनेक समस्या आणि अडचणीवर मात करीत आपले काम प्रामाणिकपणे करीत आहेत. नाशिकला ॲथलेटिक्सची फारशी पार्श्वभूमी नसताना सिंग यानी नाशिकचे साई ॲथलेटिक्स भारतातील एक फार मोठे पॉवर सेंटर बनवले आहे. त्याचे श्रेय मनमोकळेपणे त्यांना देऊया…!!!