इंडिया दर्पण विशेष लेखमाला – गुरुवे नमः
नौकानयन प्रशिक्षक अंबादास तांबे
मितभाषी आणि प्रसिद्धीपासून दूर राहाणारा. एकदम पाहिल्यास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रोइंगपटू निर्माण करीत असलेला प्रशिक्षक तो हाच आहे का असा प्रश्न पडावा इतका साधा. अतिशय शांतपणे आपले काम करणारा. रोइंग या खेळाचा प्रशिक्षक अंबादास तांबे. तांबे हे माजी राष्ट्रीय विद्यापीठ रोइंगपटू आहेत. त्यांनी १९९५ ते २००२ या काळात पुणे विद्यापीठाला पाच राष्ट्रीय पदके मिळवून दिली आहेत.
तांबे यांनी त्यांचा अनुभव आणि ज्ञान स्वतःजवळ ठेवलेले नाही. नव्या पिढीला रोइंग या नाशिककरांना नवीन असलेल्या खेळाची ओळख करुन देण्याचे आव्हानात्मक काम त्यांनी स्वीकारले ते २००३ साली. तथापि जेव्हा त्यांची धडपड आणि सचोटी माजी महापौर प्रकाश मते आणि विक्रांत मते यानी पाहिली तेव्हा ते Rock of Gibralter सारखे खंबीरपणे त्याच्यामागे उभे राहिले. म्हणूनच आज प्रसिद्ध असलेला Water’s Edge Club हा उभा राहिला (साल २००५)! गोदावरी नदीचे जरासे विशाल, संथ आणि बरेचसे सरळ पात्र त्यांना मते यांच्या घराजवळच म्हणजे बापू पुलाजवळ मिळाले. इंग्रजीमध्ये जसे म्हणतात तसे ‘the rest is history’! अवघ्या १०-१५ वर्षात तांबे यांच्या असंख्य शिष्यांनी नाशिकला रोइंग या खेळात महाराष्ट्रातील अव्वल संघ बनविले आहे. महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलीच्या संघात जास्तीत जास्त खेळाडू नाशिकचेच असतात.
आंतरराष्ट्रीय नौकानयनपटू मृण्मयी साळगावकर ही गेली चार वर्षे भारतीय संघाच्या संभाव्य संघात असते. राष्ट्रीय संघासह सराव करीत असते ती तांबे यांचीच शिष्या. तिच्यासह राष्ट्रीय पातळीवर वरिष्ठ आणि कनिष्ठ गटात चमकणारे खेळाडूंची भलीमोठी यादी आहे ज्यात अविनाश देशमुख, पूजा जाधव, वैशाली तांबे, सूर्यकांत घोलप, जागृती शहारे, संतोष आणि तुषार कडाळे, मनीष बोरस्ते, अनिकेत तांबे, धनश्री गोवर्धने, पूजा सानप इ ची नावे प्रामुख्याने येतात. येथे प्रामुख्याने स्कल्स (सिंगल, डबल इ.), coxless pair तसेच फोर हे प्रकार शिकविले जातात. त्यासाठी लागणाऱ्या अत्यंत महागड्या बोटी आणि वल्हे ही मुख्यत्वे मते या पिता-पुत्र आणि हितचिंतक यांच्या नियमित सहकार्याने मिळतात. तेही तांबे यांचे रोइंगसाठी असलेले dedication आणि Integrity पाहूनच.
तांबे यांच्यामध्ये प्रशिक्षकासह एक सहृदय जबाबदार नागरिकही वसलेला आहे. म्हणूनच गोदावरीला जेव्हा जेव्हा महापूर येतो तेव्हा ते स्वतः आणि त्यांचे सहकारी म्हणजेच खेळाडू जीवाची पर्वा न करता पूरग्रस्त लोकांच्या मदतीला अहोरात्र धावून जातात. शिष्यांना ते केवळ खेळ आणि खिलाडूवृत्ती यांचेच शिक्षण देत नाही तर सामाजिक बांधिलकीचे धडेही लहान वयात देत आहेत. ही या एरवी शिस्तबद्ध आणि कडक असलेल्या अंबादास तांबे या प्रशिक्षकाची फार लोभस बाजू आहे. आज फक्त ४६ वर्षे वय असलेल्या तांबे यांचे प्रशिक्षण कौशल्य पाहून महाराष्ट्र पोलीस संघाचेही प्रशिक्षक बनण्याची जबाबदारी त्यांना घ्यावी लागली आहे. त्यांचे उत्तम प्रशिक्षण मिळताच महाराष्ट्र पोलिसांनी राष्ट्रीय विजेतेपद मिळविले. सुमारे १० आंतरराष्ट्रीय, ५०० राष्ट्रीय आणि तेवढेच राज्य पातळीवरील खेळाडू, शिवाय अनेक संघाचे वेळोवेळी मिळणारे प्रशिक्षकपद, इतकी कमाई असूनही हा गृहस्थ रस्त्याने दिसला तर ओळखता येणार नाही इतका साधा दिसतो, राहतो आणि वागतो. यालाच तर म्हणतात साधी राहणी, उच्च विचारसरणी.