इंडिया दर्पण विशेष लेखमाला – खेळाच्या मैदानातून
बुद्धिबळ ऑलिंपिक जिंकण्याची भारताला सुवर्णसंधी!!
येत्या २८ जुलैला चेन्नई येथे ४४ वे चेस ऑलिंपियाड सुरु होत आहे. त्यात जगातील बुद्धिबळ खेळणारे जवळपास सर्व म्हणजे १८८ देशांचे पुरुष संघ आणि महिलांचे १६२ संघ भाग घेत आहेत. भारतात पहिल्यांदाच हे ऑलिंपिक होत आहे….
विशेष म्हणजे भारत यजमान देश असल्याने भारताला खास नियमांनुसार पुरुषांचे व महिलांचे दोन दोन संघ खेळवायला परवानगी आहे पण चीनच्या पुरुष संघाने कोरोनाचे कारण पुढे करीत ऐनवेळी माघार घेतली तर रशियाने युक्रेन वर आक्रमण केल्याने रशियाला वगळले आहे . त्यामुळे जगत्जेतेपदाचे दोन दावेदार गेल्याने भारतासह अनेक देशांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्यास नवल नव्हे !
या जागतिक परिस्थितीमुळे फायदा झाला आहे तो भारताचा , कसा ते बघा ! आता lots काढण्यासाठी आवश्यक तेव्हढे संघ कमी पडत असल्याने ऐनवेळी इतर कोणत्याही देशाला संघ मैदानात उतरविणे शक्य नसल्याने भारताच्या तिसऱ्या संघानाही खेळण्याची संधी चालून आली आहे !भारताचे अशा रितीने १५ पुरुष आणि १५ महिला (एका संघात पाच खेळाडू) या ४४ व्या ऑलिंपियाड मध्ये खेळ्णार आहेत !
खरं तर न खेळणारे रशिया आणि चीन हे दोन्ही संघ विजेतेपदाचे अव्वल दावेदार होते पण आता जगातील प्रथम मानांकन असलेला अमेरिका ( सरासरी मानांकन २७७१ – या संघातील खेळाडू आहेत वेस्ली सो , करुअना , शांकलॅण्ड , पेरेझ आणि ॲऱोनियन) तसेच द्वितीय मानांकित अझरबैजान आणि चतुर्थ मानांकीत मॅग्नस कार्लसनचा नॉर्वे हे विजेतेपदाचे दावेदार असले तरीही पाचवे मानांकन असलेला यजमान भारत यांचा विजेतेपदाचा दावा एकदम मजबूत झाला आहे असे मानले जाते ( भारतीय अ संघाचे सरासरी मानांकन २६९६ आहे ).
भारत २०२० च्या (ऑनलाईन) ऑलिंपियाड चा रशियासह संयुक्त विजेता आहे . त्यावेळी भारतीय खेळाडू रशिया विरूध्द अंतिम लढत खेळत असताना ज्या software वरुन भारतीय खेळत होते त्याला ऐनवेळी भारतात Power failure ने झटका दाखवला आणि भारत पराभूत झाला . पण भारताने जागतिक बुद्धिबळ संघटनेकडे अपील केले. भारताचा दावा रास्त वाटल्याने जागतिक संघाने भारताची विनन्ती मान्य केली आणि भारताला संयुक्त विजेता घोषित केले !
याच संघाचा कर्णधार नाशिकचा विदित गुजराथी होता. तोच आता भारताच्या अ संघाचा मुख्य खेळाडू आहे आणि त्याच्यासह पेंटल्या हरिकृष्ण, उगवते खेळाडू अर्जुन एरिगिअसी आणि नारायणन तसेच के शशीकरण हे खेळाडू भारतीय संघाचे अ संघाचे आव्हान जिवंत ठेवतील.
पण बुद्धिबळप्रेमीच्या मते मात्र अतिशय सनसनाटी खेळ करुन जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात खळबळ माजवित असलेली भारतीय ब संघाचे प्रतिनिधित्व करीत असलेली विशीच्या घरातील नवीन पिढी ( प्रद्न्यानंदन . गुकेश , सिधवानी आणि सरीन )हे धक्कादायक निकाल देउन भारताला जगत्जेते बनवू शकतात.
भारताचा तिसरा क संघ तुलनेत दुबळा आहे कारण तो ऐनवेळी जाहीर करावा लागला. भारतीय महिलाना अव्वल मानांकन आहे आणि कोनेरू हंपीच्या नेतृत्वाखाली तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी आणि पद्मिनी हा विजेतेपदा चा प्रबळ दावेदार मानला जात आहे तसेच दिव्या देशमुख, ॲनी जोंस इ असलेला महिलान्चा ब संघही चमत्कार करु शकतो.
स्पर्धेचे स्वरूप
१) स्पर्धा २९ जुलैला सुरु , १० ऑगस्टला संपणार
२) एकूण ११ डाव स्विस लिग पध्दतीने प्रत्येक संघ खेळेल
३) ९० मिनिटात ४० चाली, निकाल न लागल्यास अधिक ३० मिनिटे
४) प्रत्येक संघात चार खेळाडू आणि एक राखीव खेळाडू आणि प्रत्येक संघ चार सामने खेळणार
५) विजय १ गुण, बरोबरी अर्धा गुण आणि पराभव शून्य गुण
६) रेस्ट डे – ४ ऑगस्ट
Column From Playground Chess Olympic by Deepak Odhekar