इंडिया दर्पण विशेष लेखमाला – खेळाच्या मैदानातून
विराट कोहलीचे करायचे काय?
सध्या भारतीयच नव्हे तर जगातील क्रिकेट वर्तुळात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की विराट कोहलीच्या फॉर्मला काय झाले आहे? गेली ८-१० वर्षे Fabulous Four म्हणून जगातील चार अव्वल क्रिकेटपटू (इंग्लंडचा जो रूट, न्यूझीलंडचा केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियाचा स्टिव स्मिथ आणि भारताचा विराट कोहली) गाजत आहेत. त्यांच्यात विराट कोहली हा सर्वात अव्वल मानला गेला आहे. कारण क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात म्हणजे T20, एक दिवसीय सामने आणि कसोटीमध्ये सातत्याने धावा करुन शिवाय तिन्ही प्रकारात शतक करणारा विराट एकटाच.

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तेंडुलकर (१००) आणि रिकी पॉन्टींग (७१) यांच्या नंतर जास्तीत जास्त शतके (७०) ही कोहलीच्या नावावरच आहेत. पण इतर तिघे कमी जास्त प्रमाणात (रूट खूपच) फॉर्म मध्ये आहेत. मात्र आपला कोहलीचा फॉर्म गेल्या तीन वर्षांपासून गेला कुठे या चिंतेने क्रिकेट शौकीन हैराण झाले आहेत.
विराट आजिबात फॉर्ममध्ये नसल्यामुळे गेली तीन वर्षे त्याने भारतातर्फे जवळपास सर्व सामने खेळूनही त्याला एकही आंतरराष्ट्रीय शतक करता आले नाही. इतकेच नव्हे तर या रन मशिनचा धावांचा ओघही इतका आटला आहे की तो जवळपास या काळात ८० सामने खेळला आहे आणि फक्त दहा वेळाच तो ५० पेक्षा अधिक धावा करु शकला आहे.
एकच उदाहरण द्यायचे तर कोहलीची कसोटीत २७ शतके झाली आहेत. ती तीन वर्षांपूर्वी. त्यावेळी रूटची १७ शतके होती. आज रूटची २८ शतके आहेत तर कोहली अजूनही २०१८ पासून २७ वरच आहे. फक्त आंतरराष्ट्रीय सामन्यातच नव्हे तर IPL मध्ये देखील विराट तुलनेने Flop च गेला आहे.
बरं त्याला मानसिक समस्या असावी म्हणावी तर तसे आजिबात दिसत नाही. कारण त्याचे कर्णधारपद गेले तरीही त्याची मैदानावर involvement १०० टक्के दिसते. तो नेतृत्व गेले म्हणून मैदानावर उदास बिल्कुल दिसत नाही. गांगुलीचे आणि कोहलीचे पटत नाही असे म्हणतात पण तसे काही वाटत नाही. आणि कोहली त्या वादासाठी स्वतःचे नुकसान का करेल? कर्णधार पद काढून घेणे आणि आवडीचा कोच शास्त्रीची गत्छंती या अलीकडील गोष्टी. शास्त्री असतानाही कोहली फॉर्ममध्ये नव्हताच. त्याला शारीरिक कोणतीही इजा नाही. तो पूर्णपणे फिट आहे हेही दिसतेच.. मग कोहलीचा फॉर्म गेला कुठे? आणि इतके दिवस? बॅड पॅच आतापर्यंत एकही महान खेळाडूचा इतका प्रदीर्घ टिकून राहिलेला नाही, असे क्रिकेटच्या १४५ वर्षांचच्या इतिहास सांगतो.
मग नक्की काय झाले आहे? अति क्रिकेटमुळे मानसिक थकवा? की त्याची जादूच संपली? आणि यावर उपाय काय? भारतात मधल्या फळीत सूर्या यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, शुभमन गिल आणि इतर अनेक खेळाडू संघाची दारे आपल्या उत्तम खेळीने गाजवित आहेत. त्यांना कोहलीमुळे जागा मिळात नाही असा एक सूर निघत आहे. तेही बरोबरच आहे . कोहलीसारख्या सुपरस्टारला वगळता येत नाही. कारण त्याची Brand Value अजूनही टिकून आहे. तो महान असल्याने केव्हा तरी फॉर्ममध्ये येणारच या आशेवर त्याला वगळता येत नाही हेच खरे.
तथापि आता त्याच्या Supporters चाही संयम संपला आहे. ते (म्हणजे कपिल देव, वेंकटेश प्रसाद इ) सुद्धा कोहलीला आता विश्रांती द्या, असे जाहीररित्या म्हणू लागले आहे. तर इंग्लंडचा मायकेल वॉन म्हणतो की, कोहलीने ३-६ महिने आराम करावा, स्थानिक सामने खेळून आपला फॉर्म परत मिळवावा. मगच आंतरराष्ट्रीय सामने खेळावे. वेंकटेश प्रसाद तर म्हणतो की आता कोहलीचे लाड पुरे झाले! युवराज, कुंबळे, द्रविड , हरभजनसिंग आणि झहीर खान यानांही फॉर्म गेल्यावर काढले होते. मग कोहलीला वेगळा न्याय का?
खरं तर कोहलीने स्वतःच काही दिवस क्रिकेटपासून बाजूला व्हावे आणि या वादावर तात्पुरता का होईना तोडगा काढावा. तो अजून तरुण आहे. आणि किमान पाच वर्षे तरी तो अजून खेळू शकतो. त्याच्या सारखा प्रचंड गुणवत्ता असलेला खेळाडू फार दिवस बाहेर राहू शकत नाही.. कारण क्रिकेटमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे Form is temporary but class is permanent आणि कोहलीच्या क्लास बद्द्ल तर बोलायलाच नको!