इंडिया दर्पण विशेष लेखमाला – खेळाच्या मैदानातून
बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू
पी व्ही सिंधू बॅडमिंटन या भारतात जन्मलेल्या खेळात नंदू नाटेकर, प्रकाश पडुकोण आणि पुल्लेला गोपीचंद, श्रीकांत,प्रणय , काश्यप, सांकी रेड्डी इ पुरुषांत तर महिलामध्ये केवळ सायना नेहवाल , ज्वाला गट्ट आणि पी व्ही सिंधू हेच काय ते अनेक वर्षे जागतिक दर्जाचे खेळाडू भारताने दिले तेही अलीकडेच. पण आता चित्र बदलले आहे आणि पुरुष आणि महिलांमध्ये पहिल्या तीस मध्ये किमान ५-६ भारतीय खेळाडू असतातच. त्यातीलच एक म्हणजे बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू….

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
पुसर्ला वेंकट सिंधूने सिंगापूर ओपन ५०० या अव्वल स्पर्धेत चीनच्या वॅंग झी यी या तितक्याच अव्वल खेळाडूला अंतिम सामन्यात तीन गेम्समध्ये झुंझार लढत देउन तिच्या स्वतःच्या कारकिर्दीतील अतिशय महत्वपूर्ण विजय नोंदवला आहे. २०२२ सालातील अवघ्या तीन महिन्यात सिंधूने आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडियन ओपन आणि स्विस ओपन नंतर मिळविलेले हे मोठे यश मानले जाते . आता येत्या २८ जुलै पासून सुरु होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा आणि त्यानंतर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धा हे मह्त्वाचे टप्पे तिच्या निशाण्यावर आहेत.
गेले काही वर्षे सिंधूनेच मान्य केल्याप्रमाणे ती महत्त्वाच्या सामन्यात म्हणजे उपांत्य किंवा अंतिम सामन्यात किंवा अव्वल प्रतिस्पर्ध्या विरूध्द म्हणजे तैवानची ताई त्सु यिंग किंवा स्पेनची करोलिन मरिन – यांच्या विरूध्द मानसिक दबावामुळे हरत होती. तथापि गेल्या काही महिन्यां मध्ये तिने आता त्या दोषावर आता मात केली आहे असे निश्चित म्हणता येइल. सिंगापूर ओपन मधील अंतिम सामन्यात तर हे प्रकर्षाने जाणवले.
सिंधूने झी यी विरूध्द पहिला गेम २१-९ असा आरामात खिशात घातल्यावर ती जराशी over -confident झाली आणि पाहता पाहता दुसरा गेम ११-२१ असा गमविल्यावर ती एकदम सावध झाली आणि इतर कोणत्याही गोष्टींवर लक्ष न देता खेळ आणि फक्त खेळ यावरच तिने लक्ष केंद्रीत केले आणि तिसरा गेम २१-१५ असा जिंकला . त्यातही झी यी ने ११-११ पर्यंत बरोबरी साधली होती आणि १२-११ असा पुढावाही मिळविला होता . पण सिंधूचे नवे रुप पहायला मिळाले आणि तिने शांतपणे पण खंबीरपणे खेळून सामना, विजेतेपद आणि स्वतःवर उत्तमरित्या आणि मोठा विजय मिळवून दाखवला !
या कारकीर्दीतील मह्त्वाचा विजय तिने कसा मिळविला? सिंधू म्हणते,” हॉल मधील एअर कंडीशनरच्या हवे मुळे एका बाजूने खेळताना शटल drift होत होते. पण मी त्याकडे दुर्लक्षच केले नाही तर त्यावर उपाय शोधला तो म्हणजे डाऊन द लाईन फटके न मारता क्रॉस कोर्ट शॉट मारून शटल कोर्टच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली. तसेच माझा खेळ अचानक गतिमान केला त्यामुळे झी यी गोंधळात पडली आणि मी संधी साधली. पूर्वी मी अशा परिस्थितीत निराश होत किंवा चिडून जात पराभव ओढवून घेत असे . शिवाय ज्यांच्या विरूध्द मी अनेकदा हरत होती त्या मरीन किंवा ताइ किंवा चीनच्या ॲन से यंग समोर असल्यास मी हात पायच गाळत असे,”
असे प्रामाणिक पणे तिने सांगितले आणि आता मात्र इंग्लिशमध्ये म्हणतात त्याप्रमाणे ‘ She has turned the corner.’ अशी आशा करु या. जागतिक स्तरावर गेली १० वर्षे कायम पहिल्या दहा क्रमांकात राहिलेली ही २७ वर्षे वयाची बॅडमिंटनची राणी पूर्वीची प्रशिक्षक गोपीचंद यांची आणि सध्या किम जी ह्यून यांची शिष्या हीचा खरा प्रवास आता सुरु झाला आहे. कारण तिने ऑलिंपिकची दोन पदके आणि तीन विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करुन तसेच दोन दोन राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत रौप्यपदक आणि कांस्यपदक मिळवून गुणवत्ता आणि दर्जा सिध्द केला आहेच. आता राहिले जागतिक अजिंक्यपद आणि ऑलिंपिक सुवर्ण, त्याबद्दल आता रास्त आशा किंवा खात्री आपण निश्चित बाळगू शकतो!
ब्राव्हो सिंधू !!!
Column from Play Ground Badminton star PV Sindhu by Deepak Odhekar