इंडिया दर्पण विशेष लेखमाला – परदेशातील सुप्रसिद्ध मंदिरे
कम्बोडियातील बाराव्या शतकातील भारतीय मंदिरे
परदेशातील भारतीय मंदिरं किंवा हिदू मंदिरांची सर्वाधिक संख्या कम्बोडिया नावाच्या देशांत आहे. भारताच्या दक्षिण पूर्वेला म्हणजे अग्नेय दिशेला भारतापासून ४८०० किमी अंतरावर कम्बोडिया हा देश आहे. पावने दोन कोटी लोकसंख्या असलेल्या या देशांत ९३ टक्के जनता बौद्ध धर्मीय आहे ४ टक्के मुस्लिम, दोन टक्के ख्रिश्चन धर्मीय आहेत तर उरलेल्या एक टक्क्यात इतर उरले सुरले धर्मीय आहेत. त्यात अर्थातच हिंदू धर्मियांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे अशा या एक टक्क्या पेक्षाही कमी भारतीय लोक असलेल्या देशांत ४००० पेक्षा जास्त हिंदू मंदिरं आहेत. आहे की नाही मजा!

मो. ९४२२७६५२२७
कम्बोडियात १२ व्या शतका पर्यंत ही सगळी मंदिरं ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची मंदिरं होती. बाराव्या शतकाच्या शेवटी येथे बौद्ध धर्माचे प्राबल्य वाढले आणिं ही सर्व मंदिरं बौद्ध स्तुपांत किंवा स्मारकांत परिवर्तित करण्यात आली.
दक्षिण पूर्व अशियांत कम्बोडिया हा देश आहे. या देशा भोवती ‘थाईलैंड’,’लाओस’,’व्हिएत्नाम’ हे देश आणि थाईलैंडची खाड़ी आहे. ‘नॉम पेन्ह’ ही कम्बोडियाची राजधानी आहे. अंग्कोरवाट या नावाचा जगातला सर्वांत मोठा आणि विशाल हिंदू मंदिरांचा परिसर येथे आहे. अंग्कोरवाटचे प्राचीन नाव होते -यशोधारापुर! येथेच ४०२ एकर जागेवर ही मंदिरं बांधण्यात आली आहेत.
खमेर राजा सूर्य वर्मन व्दितीय याने बाराव्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या साम्राज्याची राजधानी एखाद्या मंदिराच्या आकाराची बनविली होती. साम्राज्याची पाया भरणी करतांना अंग्कोरवाट हे मंदिर सर्वाधिक सुरक्षित मंदिर होते नंतर ते महत्वाचे धार्मिक केंद्र बनले. खमेर वास्तुकलेचे सर्वोच्च शिखर म्हणजे अंग्कोरवाट हे मंदिर. सुरुवातीला भगवान विष्णुचे मंदिर नंतर जगभरातील बौध्द धर्मियांचे सर्वांत महत्वाचे स्थान असलेले अंग्कोरवाट हे कम्बोडियाचे प्रतिक बनले. म्हणूनच कम्बोडियाच्या राष्ट्रध्वजावर अंग्कोरवाट या मंदिर समुहाला मानाचे स्थान मिळाले आहे.
आजही जगभरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र असलेल्या अंग्कोरवाटने कम्बोडियाला बौद्ध राष्ट्रांत परिवर्तित करण्यात प्रमुख भूमिका निभावली.वास्तुकला शास्त्राच्या दृष्टीने हे मंदिर म्हणजे जगातील एक मोठेच आश्चर्य मानले जाते. भारताच्या प्राचीन पौराणिक मंदिर अवशेषांत तर एकमेव आहे. अंग्कोरथोम मधील मंदिरं आणि भवनं येथील प्राचीन राजपथ आणि सरोवरं या महानगराच्या समृध्दीचे सूचक आहेत. या अवशेषांवरून देखील त्याकाळी (जेव्हा पाश्चिमात्य जग रानटी अवस्थेत होते) हे महानगर किती विशाल आणि समृद्ध होते याची कल्पना येते. तसेच त्याकाळी कोणतीही साधनं नसतांना, तंत्रज्ञान विकसित झालेले नसतांना त्यांनी निर्माण केलेले हे भव्य दगडी कोरीव काम पाहून फक्त थककं होण्याशिवाय आपण दुसरं काही करू शकत नाही.
‘बान्तेय स्रेई’ ( Banteay srei) मंदिर!
अंग्कोरवाटच्या खालोखाल दुसरे महत्वाचे धार्मिक स्थळ म्हणजे ‘बान्तेय स्रेई’ ( Banteay srei). सीम रिप शहराच्या उत्तर पूर्वेला सुमारे ३० किमी अंतरावर ‘बान्तेय स्रेई’ ( Banteay srei) या नावाचे भगवान शंकराचे मंदिर आहे. एखाद्या सोन्याच्या दागिन्या प्रमाणे हे मंदिर आतून व बाहेरून कलात्मक कोरीव कामाने सजविलेले आहे. खमेर वास्तुकलेचा सर्वांग सुंदर दागिना म्हणजे ‘बान्तेय स्रेई’ ( Banteay srei) मंदिरं.
‘बान्तेय स्रेई’ ( Banteay srei) हे मंदिर ‘अंग्कोरवाट’ च्या आधी दोनशे वर्षे बांधलेले आहे. दहाव्या शतकांत हे मंदिर बांधले आहे. मंदिराच्या आतील दगडी कमानी अतिशय नाजुक कोरीव कलाकुसरीने सजविलेल्या आहेत. हातांत कमळपुष्पे धारण केलेल्या नाजुक ललना आणि रामायणातील सर्वच प्रसंग कमालीचे कलात्मक आणि नाजुक आहेत. दगडांवरील हे ‘कोरीव काव्य’ पुरुष कलाकारांनी न करता स्त्री कलाकारांनीच केलेलं असावं असं म्हणतात. कारण इतका सूक्ष्म तरल नाजुकपणा पुरुष कलाकार घडवूच शकणार नाही असं वाटतं.
राजा जयवर्मन सातवा याने आपल्या मातेच्या स्मृतीला हे मंदिर अर्पण केले आहे. मंदिर भग्नावस्थेत आहे पण तेच त्याचे सौंदर्य आहे. हे मंदिर घनदाट अरण्यात दडलेल्या अवस्थेत सापडलं होतं. मंदिरावर बेसुमार झाडं वाढलेली होती. मंदिराच्या भिंती, घुमाट, गाभारे सगळ्यात जंगली झाडं वाढलेली होती सिल्क कॉटन झाडांची अवाढव्य पाळं मुळं सर्वत्र पसरलेली होती.
‘बान्तेय स्रेई’ ( Banteay srei) मंदिराचं वैशिष्ट्ये म्हणजे इथले क्रोक्रोडाईल ट्रीज. मगरी सारखी भयंकर दिसणारी चिवट झाडं. टोम्ब रायडर Tomb Raider नावाच्या इंग्लिश चित्रपटात ही क्रोक्रोडाईल ट्रीज अमर झाली आहेत. या चित्रपटाच बरचसं शूटिंग येथे झाले आहे. ‘अंजेलिना ज्यूली’ हिने ‘लारा क्राफ्ट’ ची भूमिका यात केली आहे. ती या पडझड झालेल्या रहस्यमय अवशेषातून फिरते. आणि अखेर सर्व शक्तिमान निसर्गाला शरण जाते.
अंग्कोरवाट मंदिर पाहण्यासाठी दरवर्षी १५ लाखांपेक्षा अधिक पर्यटक येतात. मात्र ‘बान्तेय स्रेई’ ( Banteay srei) मंदिर पर्यटक शक्यतो दुपार नंतरच पहायला जातात. कारण त्यावेळी ही मंदिरं जिवंत होतात! लाल रंगाच्या वालुकामय दगडांवर सूर्य किरणं पडतात तेंव्हा गुलाबी रंगाने मंदिर आतून बाहेरून उजाळून निघते. त्यावेळी मंदिरातील प्रत्येक शिल्पं जणु बोलू लागतात.शतकानुशतके काळाच्या उदरांत दडलेली आपल्या उदयास्ताची कर्म कहानी सांगू लागतात.