इंडिया दर्पण विशेष लेखमाला – परदेशातील सुप्रसिद्ध मंदिरे
चिनी तज्ज्ञांनी पुनर्निर्माण केलेले हिंदू मंदिर
भारतापासून सुमारे पांच हजार किमी अंतरावर , आग्नेय आशियातील कम्बोडिया नावाच्या देशांत बाराशे वर्षांपूर्वी भारतीय हिंदू संस्कृती भरभराटीला आली होती हे ऐकून आज देखील आपल्याला अभिमान वाटतो. आज एक टक्क्यांपेक्षाही कमी हिंदू असलेल्या कम्बोडियात ४००० हजार पेक्षा अधिक मंदिरं आहेत. इथलं एकेक मंदिर आपल्या जगन्नाथ पुरीच्या मंदिरा सारखे कलाकुसरयुक्त भव्य आणि प्रशस्त आहे. प्रत्येक मंदिरामागे हजारो वर्षांचा इतिहास आहे.
जगप्रसिद्ध अंग्कोर वाट मंदिर समुहापासून जवळच ‘अंग्कोर थोम’ मंदिराच्या पूर्वेला आणि ‘थोम्मानेल’ मंदिराच्या दक्षिणेला एक वैशिष्ट्येपूर्ण मंदिर आहे. या मंदिराला कम्बोडियाच्या भाषेत म्हणतात, ‘चाऊ से तेवोडा’! चाऊ से तेवोडा याचा अर्थ समजला का? नाही ना? चाऊ से तेवोडा याचा अर्थ आहे, भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांचे मंदिर! भगवान शंकर आणि भगवान विष्णु यांचे मंदिर म्हटले असते तर तुम्ही दुर्लक्ष केले असते. परन्तु ‘चाऊ से तेवोडा’ वाचल्यावर हा काय प्रकार आहे हे पहाण्यासाठी तुम्ही हा लेख वाचायला घेतला. खरं ना? असो.
कम्बोडियातील जगप्रसिद्ध ‘अंग्कोर-वाट’ मधील मंदिरांप्रमाणेच हे मंदिर ही अकराव्या आणि बाराव्या शतकात बांधण्यात आले आहे.
‘चाऊ से तेवोडा’ या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे हे मंदिर स्पेशली भगवान शंकर आणि भगवान विष्णु यांच्याचसाठी बांधण्यात आले आहे. येथे इतरही अनेक स्त्री देवतांची मंदिरं आहेत. कम्बोडियाचा सुप्रसिद्ध राजा जयवर्मा सातवा याचे वडिल राजा धर्निन्द्र वर्मा याने हे मंदिर बांधले आहे.
कुठे आहे हे मंदिर?
कम्बोडियातील जगप्रसिद्ध अंग्कोर वाट मंदिर समुहापासून जवळच हे मंदिर आहे. थोम्मोनोन मंदिरा पासून ५०० मीटर दक्षिण दिशेला हे मंदिर आहे. मंदिराच्या वाटेवर एक दगडी पुल आहे. याच मंदिराचे जे शिल्पकारी तुकडे होते त्यापासून हा पुल बनविण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोणतीही नदी नसतांना हा पुल बांधण्यात आला आहे.
मंदिराचा आकर्षक इतिहास
चाऊ से तेवोडा मंदिर अकराव्या आणि बाराव्या शतकांत बांधण्यात आले आहे. मंदिराचा सुरुवातीचा प्रमुख भाग राजा सूर्यवर्मा द्वितीय आणि जयवर्मा सातवा यांच्या काळात बांधण्यात आला. हे मंदिर पूर्णत: शिव आणि विष्णु यांना समर्पित होते. पुढे बौद्ध धर्माचे प्राबल्य वाढल्यावर बुद्धाच्या मुर्तींची ही येथे अनेक ठिकाणी स्थापना करण्यात आली. अनेक शतके हे मंदिर भाविक भक्तांनी ओसंडून वाहत होते.
पुढे काही शे-वर्षांनी कम्बोडियात झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपात हे मंदिर सोबतच्या हजारो मंदिरांसह जमिनीच्या पोटांत गडप झाले. कालांतराने त्यावर झाड़ी उगवली. नुसती झाडीच नाही तर घनदाट जंगलं उगवली. त्यातही काही शतके गेली. पुढे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फ्रेंच पुरातत्व संशोधकानी या घनदाट जंगलाखाली जमिनीत गाड्ली गेलेली ही हिंदू मंदिरं शोधून काढली. सिमरिप नदी आणि तिच्या परिसरांत ‘चाऊ से तेवोडा’ या मंदिराचे सुमारे ४००० पेक्षा अधिक कलाकुसर युक्त शिल्पं तुकडे -तुकडे होऊन इतस्तत: विखरुन पडले होते. या मंदिराच्या पुनार्निर्मितिचे काम चीन ला मिळाले होते.
चीनच्या पुरातत्व विभागातील संशोधक, आर्किटेक्ट आणि वास्तु तंत्रज्ञांनी हे सर्व ४००० तुकडे एकत्र जमा केले. हे सर्व तुकडे एकत्र जुळविले. बाराशे वर्षां पूर्वी हे मंदिर जसे होते अगदी तसेच त्यांनी ते तयार केले. अॅनास्टिलॉसिस ( anastylosis) पद्धतीने या मंदिराची पुर्निर्मिती करण्यात आली. अॅनास्टिलॉसिस पद्धतीत जिग्सॉ पझल्स प्रमाणे इमारतीचे इतस्तत: विखुरलेले भाग एकमेकांना जोडतात. या जोडलेल्या भागांच्या जागा निश्चित करून त्यांना चिन्हांकित करतात. उरलेल्या इमारतीच्या रचने विषयी शंका असेल तर सर्व दगड काढून ते पुन्हा त्यांच्या योग्य जागी लावतात. हे दगड पक्के जोडण्यासाठी काही ठिकाणी नवीन पदार्थांचीही मदत घेतली जाते.
चाऊ से तेवोडा सारखे पूर्णत: शिल्पांनी तयार झालेले मंदिर सपाट किंवा प्लेन मंदिरांच्या तुलनेने लवकर जोडले जाते. कारण एखादे शिल्प किंवा त्याचे भाग पझल्स सारखे जोड़णे सोपे असते. दगड जर सपाट प्लेन असतील तर मात्र ते जोड़णे अवघड जाते. कारण कोणता दगड कोठे असेल ते शोधणे अवघड असते. अशा पद्धतीने या मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले. भगवान शिव आणि भगवान विष्णु यांच्या या मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी चीनी पुरातत्ववेत्ते, तंत्रज्ञांनी विशेष मेहनत घेतली हे देखील या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणता येईल.
२००९ पासून हे मंदिर भाविक आणि पर्यटकासाठी खुले करण्यात आले आहे. या मंदिराचा अनेक शतकांचा आश्चर्यचकित करणारा हा इतिहासच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. त्यामुळेच जगभरातील पंधरा लाखापेक्षा अधिक पर्यटक दरवर्षी या मंदिराला भेट देतांत.
मंदिराची वैशिष्ट्ये:
चाऊ से तेवोडा हे मंदिर भारतातील ओरिसा पद्धतीने बांधण्यात आलेले आहे. प्रवेशव्दारापासून ते गाभार्या पर्यंत सम्पूर्ण मंदिर विविध प्रकारच्या शिल्प कलाकुसर युक्त आहे. मंदिराला चार गोपुरं म्हणजे प्रवेशव्दारं आहेत. मध्यभागी मोठा सभामंडप आणि अनेक घुमट आहेत. मंदिरा भोवती संरक्षक दगडी भिंत आहे. या भिंतीवर अनेक ठिकाणी गरुड आणि नाग यांची मोठ मोठी शिल्पे कोरलेली आहेत.
मुख्य म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णु यांच्यासाठीच हे मंदिर निर्माण करण्यात आले आहे.
येथील भगवान विष्णु आणि भगवान शिवाच्या मूर्ती आजही बाराशे वर्षांनी सुस्थितीत असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले जाते.
येथील गोपुरांच्या प्रवेद्वारावर भगवान बुध्दाच्या जीवनातील प्रसंग कोरलेले आहेत.
रामायणातील अशोक वनांत राक्षसनिंच्या पहार्यात बसलेल्या सीतेला हनुमान रामाची अंगठी देतो तो प्रसंग एका गोपुरावर हुबेहूब कोरलेला आहे.
या मंदिराचे आगले वेगळे वैशिष्ट्ये म्हणजे या प्राचीन हिंदू मंदिराचे पुनर्निर्माण चीनी तंत्रज्ञांनी केली आहे.
इस. २००९ मध्ये हे मंदिर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.
दरवर्षी या मंदिराला १५ लाखांपेक्षा अधिक पर्यटक भेट देतांत!