इंडिया दर्पण विशेष लेखमाला – परदेशातील सुप्रसिद्ध मंदिरे
सिडनीतील ‘श्रीमुरुगन’,’श्री वेंकटेश्वर’ आणि श्रीस्वामीनारायण मंदिर!
जगातल्या प्रेक्षणीय महानगरांत ऑस्ट्रेलियाचा क्रमांक अग्रभागी लागतो. बर्याच वेळा सिडनी हीच ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे असे वाटते. पण वस्तुस्थिति तशी नाहीये. ५४ लाख लोकवस्ती असलेले सिडनी हे ऑस्ट्रेलियातील सर्वांत मोठे महानगर असून राजधानी केनबेरा पासून २८० की.मी. अंतरावर आहे. सिडनी हे ऑस्ट्रेलियातील सर्वांत प्राचीन आणि मोठे शहर आहे. न्यू साऊथ वेल्सचं हे सर्वांत देखणं आणि प्रेक्षणीय शहर आधुनिक वास्तुकला आणि विकासाचे प्रतिक आहे. ब्राउन रंगाची रेती असलेले सिडनीचे समुद्रकिनारे जगभर प्रसिद्ध आहेत. अशा या महानगरात भारतीय लोकांनी स्थापन केलेली अनेक हिंदू मंदिर पहाण्यासाठी दरवर्षी भारताप्रमाणेच जगभरातील लाखों पर्यटक आवर्जुन येतात.
सिडनी मुरुगन टेंपल
तमिळ बांधवांची अतिशय श्रद्धा असलेले सिडनी येथील भगवान मुरुगन मंदिर ‘सिडनी मुरुगन टेम्पल’ याच नावाने प्रसिद्ध आहे. भगवान मुरुगन यांचे हे मंदिर तमिळ बांधवांचे धार्मिक तीर्थ स्थान म्हणून लोकप्रिय आहे. हे मंदिर स्थापन करण्याचा उद्देश म्हणजे लोकांना आपल्या कुटूंबियांसह नियमितपने पूजा व प्रार्थना करण्यासाठी, धार्मिक ग्रंथांचे वाचन, प्रवचन ,किर्तन, धार्मिक उत्सव साजरे करने यांसाठी योग्य स्थान मिळावे हा होता.शैव पंथ आणि तमिळ भाषेचा प्रचार प्रसार हा देखील हे मंदिर स्थापन करण्या मागचा हेतु होता.
या मंदिरांत भगवान मुरुगन यांची मूर्ती आहे, येथे ध्यान धारणा आणि योगक्रिया शिकविल्या जातात. लहान मुलांना सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा यांचे ज्ञान देणार्या युवक युवतींचा ग्रुप येथे सक्रिय आहे.
संकेतस्थळ : www.sydneymurugan.org.au
श्री वेंकटेश्वर मंदिर , सिडनी
सिडनी या महानगराच्या हेलेन्सबर्ग भागातील श्री वेंकटेश्वराचे सुप्रसिद्ध मंदिर ४०० फूट उंच टेकडीवर बांधलेले आहे. दक्षिण गोलार्धात हे मंदिर सर्वाधिक लोकप्रिय आहे. भगवान वेंकटेश्वर किंवा बालाजी चे हे मंदिर अतिशय प्रेक्षणीय आहे. इ.स. १९७८ साली हे मंदिर वैदिक पद्धतीने बांधले आहे. या मंदिरांत भगवान वेंकटेश्वर,महालक्ष्मी माता, भगवान शंकर,( येथे त्याला श्री चंद्रमौलीश्वर असे म्हणतात) आणि श्री त्रिपुरा सुंदरी यांची पूजा केली जाते.धार्मिक पूजा पाठा प्रमाणेच हिंदू धर्माचे तत्वज्ञान, धार्मिक ग्रंथ,श्लोक ,कविता भजन कर्नाटक संगीत नृत्य आदि कला मंदिरा द्वारे चालविल्या जाणार्या विद्यालयात शिकविल्या जातात.त्याच प्रमाणे भगवान वेंकटेश्वराची परिसरातून रथातुन शोभा यात्रा काढली जाते. त्याच प्रमाणे अन्न दान ,आराधना, स्वयंसेवक आणि युवकांसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
संकेतस्थळ : www.svtsydney.org.au
श्री स्वामीनारायण मंदिर, न्यू साऊथ वेल्स
ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स या भागांत श्रीस्वामीनारायण भक्तांची संख्या वाढू लागल्या मुळे न्यू साऊथ वेल्स येथे वेगळ्या श्री स्वामीनारायण मंदिराची स्थापना करण्यात आली. नित्यसत्संग, धार्मिक कार्यक्रम आणि एकमेकांना भेटने यासाठी अशा प्रकारच्या धार्मिक स्थळाची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे श्री स्वामीनारायण कट्टर भक्तांनी या मंदिराची स्थापना केली आज ऑस्ट्रेलियाच्या धार्मिक पर्यटनात न्यू साऊथ वेल्सचे श्रीस्वामीनारायण मंदिर अग्रेसर आहे. बोचसनवासी श्री अक्षर पुरुषोत्तमस्वामीनारायण संस्था (BAPS) चे हे मंदिर धार्मिक मोरल आणि सामाजिक आव्हानांचे प्रमुख केंद्र बनले आहे. नित्य सत्संग तसेच भारतातून आलेल्या संत महंत महात्म्यांचे मार्गदर्शन केले जाते.
संकेतस्थळ : www.sydneytemple.org