इंडिया दर्पण विशेष लेखमाला – परदेशातील सुप्रसिद्ध मंदिर
वडिलांच्या स्मृतीला अर्पण केलेले विश्वप्रसिद्ध मंदिर!
‘प्रेअह कहान’ : चारशे एकर वरील अजरामर मंदिरं!
हजारो वर्षांपूर्वी बांधलेली कम्बोडियातील विशाल हिंदू मंदिरं हाच मुळात एक चमत्कार समजला जातो. हजार वर्षांनंतर देखील या मंदिरांचे आकर्षण कमी झालेले नाही म्हणूनच आज देखील दर वर्षी जगभरातील पंधरा लाखांपेक्षा अधिक पर्यटक या मंदिरांना भेट देतांत.हजार बाराशे वर्षांनंतर देखील ही मंदिरं अजूनही कशी टिकून राहिली आहेत याचा अभ्यास जग भरातील पुरातत्व वेत्ते करीत आहेत. दोन तीनशे वर्षे जमिनीत आणि घनदाट जंगलात दडून राहिलेली ही मंदिरं म्हणजे खरच एक कोडं आहे.
अंग्कोर वाट मंदिर समूह हा या मंदिरांचा राजा मानला जातो. त्याच्या बरोबरच अनेक मंदिरं जगभरतील पर्यटकांना भूल पाडतात. अशाच एका प्राचीन मंदिराची माहिती आपण आज करून घेणार आहोत. अंग्कोर वाट प्रमाणेच या मंदिरातही दर वर्षी १५ ते २० लाख पर्यटक येतात. या सुप्रसिद्ध मंदिराचे नव आहे- प्रेअह कहान Preah Khan ! प्रेअह कहान Preah Khan या शब्दाचा अर्थ होतो रॉयल सोर्ड किंवा राजेशाही तलवार!
राजाने वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेले मंदिर :
कम्बोडियातील अंग्कोर वाट या जगप्रसिद्ध मंदिर समुहापासून जवळच असलेले हे मंदिर बाराव्या शतकांत जयवर्मन सातवा या राजाने त्याच्या वडिलांच्या स्मरणार्थ बांधले होते. अंग्कोर थोमच्या अगदी जवळ जय तटाक बेरायच्या पश्चिमेला हा मंदिर समहू जोडलेला आहे.
खरं म्हणजे ही जयवर्मन सातवा या राजाची राजधानीच होती असे म्हणता येईल. त्याकाळी या मंदिरांत एक लाख अधिकारी आणि नोकर चाकर रहत होते. तसं पहिलं तर या मंदिराचे डिझाईन फ्लैट आहे, जिकडे पहावे तिकडे दगडी बांधनीच्या लांबच लांब आयता कृती इमारती आहेत. मध्येच काही ठिकाणी बुद्धिस्ट स्तूप तर काही ठिकाणी हिंदू मंदिरांप्रमाणे गर्भ गृह आणि घुमट आहेत.या मंदिरा जवळ असलेल्या Ta Prohm ता प्रोहम मंदिरा प्रमाणे हे मंदिरही आता अवशेष रुपांत शिल्लक आहे. अनेक ठिकाणी झाडं झुडुप वाढलेली आहेत.
मंदिराचा इतिहास :
प्रेअह कहान या मंदिराचा इतिहास मात्र अतिशय उज्ज्वल आहे. कम्बोडियाचा तत्कालिन राजा जयवर्मन सातवा याने इ.स. ११९१ मध्ये चाम्स राजाला पराभूत करून दैदीप्यमान यश मिळविले. या विजयाचे कायमस्वरूपी स्मारक व्हावे यासाठी त्याने प्रेअह कहान हे मंदिर बांधले. प्रेअह कहान Preah Khan मंदिराच्या मॉडर्न नावाचा अर्थ होतो ‘होली सोर्ड’ किंवा ‘पवित्र तलवार!’ ‘जयश्री नगर’ किंवा ‘विजय नगर’ अशा अर्थाचा हा कम्बोडियन शब्द आहे.
या जागेवर त्यापूर्वी यशोवर्मन द्वितीय आणि त्रिभुवानादित्यवर्मन या राजांचे राज परिवार रहत असत. मंदिराच्या पायावर असलेल्या शिलालेखांवरून येथे राज परिवारातील लोक आणि अधिकारी आणि नोकर चाकर मिळून सुमारे एक लाख लोक रहात होते.
मंदिरा समोर बोधिसत्व अवलोकितेश्वराची मुख्य प्रतिमा राजाच्या वडिलांच्या रुपांत साकारलेली आहे.इ.स. ११९१ मध्ये ही प्रतिमा उभारलेली आहे. त्यापूर्वी राजाच्या आईची प्रतिमा ‘ता प्रोहम’ येथे अशाच प्रकारे उभारलेली होती. जयवर्मन सातवा याने ‘ता प्रोहम’ हे मंदिर आपल्या आईला तर ‘ प्रेअह कहान’ हे मंदिर वडिलांच्या स्मृतीला अर्पण केले आहे.
अशाच प्रकारच्या पूर्वजांच्या किंवा त्यावेळच्या आमिर-उमराव, दरबारी यांच्या ४३० दगडी प्रतिमा या ठिकाणी ठेवलेल्या आजही पहायला मिळतात. या प्रत्येक मूर्तीला अन्न, वस्त्र, परफ्यूम आणि मच्छरदाणी पुरविण्यात येई. या ठिकाणी सोने , चांदी, रत्नं,११२,३०० मोती आणि शिंगांना सोन्याच्या छंम्ब्या लावलेल्या असंख्य गायींचे गोठे येथे होते. प्रेअह कहान केवळ मंदिरच नव्हते तर बुद्धिष्ट युनिवर्सिटी म्हणजे बौद्ध तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करणारे विद्यापीठ देखील होते. ९७,४८० attendants अटेंडेंटस आणि नोकर चाकर,१००० नर्तिका नर्तक आणि १००० शिक्षक येथे कार्यरत असत. त्यांच्या निवासाच्या, कलेचा रियाज आणि सराव करण्याच्या इमारती येथे पहायला मिळतात.
प्रेअह कहान मंदिराच्या बाहेरील भिंतीवर दर पन्नास मीटर अंतरावर हातांत नाग धारण केलेले ७२ गरुड दगडांत कोरलेले आहेत.
इ.स. १९२७ पासून १९३२ पर्यंत हे मंदिर उत्खनन करून स्वच्छ करण्यात आले. अजुनही या मंदिराचे स्वच्छताकरण चालू आहे. १९३९ मध्येही मंदिराची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर मोकळया (सुट्ट्या) असलेल्या मूर्ती सुरक्षित ठेवण्यात आल्या. त्यानंतरही काही डागडुजी आणि इतर बांधकाम, भिंतीना सपोर्ट देण्याचे काम चालूच असते. हे मंदिर अक्षरशः जमिनीत आणि त्यावर वाढलेल्या घनदाट जंगलात कित्येक शतके गडप झाले होते त्याचे उत्खनन करुन त्याला आजच्या स्वरुपांत आणणे हे मोठेच किचकट खर्चिक आणि वेळखाऊ काम होते.
१९९१ पासून या मंदिराचे व्यवस्थापन , देखरेख आणि मेंटेनन्स वर्ल्ड मोन्यूमेंट फंडातुन केले जात आहे. निबिड आरण्यातील उत्खननात सापडलेल्या पुरातन वास्तुंना धक्का न लावता त्यांना मूल रुपांत आणणे हे खुपच कष्ट दायक काम होते येथील गोपुर, अग्निगृह, आणि नर्तिकालय यावर अजूनही खुप काम करने बाकी आहे.
खरं सांगायचं तर प्रेअह कहानचे भग्नावशेष हेच या मंदिराचे वैशिष्ट्ये आहे. हजार वर्षे काळाच्या छातीवर पाय रोवून हे मंदिर उभे आहे. हजार वर्षे भयंकर उन, पाउस ,वादळं-वारे आणि प्रलयंकारी भूकंपांसारख्या नैसर्गिक आपत्तींना तसेच धर्मांध अनुयायांच्या आक्रमणांना तोंड देत आपल्या निर्मात्यांचे यशोगान गात या प्राचीन वास्तु उभ्या आहेत.हा चमत्कार पाहण्यासाठीच जगभरातील लाखो पर्यटक प्रेअह कहान पहायला येतात.