इंडिया दर्पण विशेष लेखमाला – परदेशातील सुप्रसिद्ध मंदिर
कम्बोडियातील एकमेव गणपती मंदिर!
जमिनीच्या मालकी हक्का वरुन सगळ्या जगांत भांडण होतात. लढाया होतात हे आपल्या सर्वांनाच ठावुक आहे. परंतु मंदिराच्या जागेवरून दोन देशांत युद्ध होऊ शकते याचे एकमेव उदाहरण म्हणजे कम्बोडियातील प्रेअह विहार! ‘प्रेअह विहार’ किंवा ‘शिखरेश्वर’ हे कम्बोडियातील सर्वार्थाने वेगळे मंदिर आहे. कम्बोडिया आणि थायलंड या दोन देशांच्या सीमेवर असलेल्या डोंगरावर हे भव्य मंदिर बांधलेले आहे. खरं तर हे अति प्राचीन शिव मंदिर आहे. परंतु कम्बोडियात कुठेही न दिसणारा गणपतीबाप्पा इथला प्रमुख देव आहे.
कम्बोडियाची राजधानी नॉम पेन्ह पासून ४१८ किमी वर तर सीएम रिप पासून १४० किमी अंतरावर हे वैशिष्ट्येपूर्ण मंदिर आहे. गेल्या तीस वर्षांपासून कम्बोडिया आणि थायलंड या देशांत या मंदिराच्या मालकी हक्का वरून वाद चालू आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात हा वाद गेलेला आहे. २०१३ साली आंतर राष्ट्रीय न्यायालयाने कम्बोडियाच्या बाजूने निकाल दिला आहे. या मंदिराच्या व्यवस्थापनासाठी यूनेस्कोने आंतर राष्ट्रीय समन्वय समिति स्थापन केली आहे. त्यात आता भारताचा समावेश करण्यात आला आहे.
कम्बोडियात सुमारे ४००० हिंदू मंदिरं आहेत. जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिर कम्बोडियात आहे हे आपल्याला ठावुक आहे.
कम्बोडियाने यापूर्वीही भारताला या मंदिरांची देखभाल करण्याची विनंती केली होती मात्र थायलंडला न दुखविण्याच्या हेतूने भारताने या वादांत पडण्यास नकार दिला होता. त्यामुळे गेल्या वर्षी ‘अंग्कोर वाट’ या जगप्रसिद्ध मंदिराच्या जतन-दुरुस्तीच्या कामाची जबाबदारी भारताच्या हातून निसटली होती. जापान आणि फ्रांस यांना ती संधी मिळाली होती. प्रेअह विहार मंदिराची जतन – दुरुस्ती आणि व्यवस्थापनाची संधी मिलाल्या मुळे भारतीय पुरातत्व खात्याला थायलंड आणि कम्बोडियात आपला नावलौकिक वाढविण्याची संधी मिळाली आहे.
प्रेअह विहार या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे २००८ मध्ये या मंदिराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तर या मंदिरांची व्हॅल्यु आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रांत खूपच वाढली आहे. जापान, फ्रांस सारख्या प्रगत देशांची नजर या मंदिरावर होती भारताला ही संधी अनायासे मिळाली आहे. त्या संधीचे सोने करने आता भारतीय पुरातत्व खात्याच्या हातांत आहे.
मंदिराचा इतिहास:
कम्बोडियाचे सम्राट यशोवर्मन यांनी नवव्या शतकांत हे शिव मंदिर बांधले. जवळ जवळ तीनशे वर्षे या मंदिराचे बांधकाम आणि विस्तारीकरण सुरु होते. ख्मेर स्थापत्यकलेतील अनेक वैशिष्ट्ये या मंदिरांत पहायला मिळतात. त्यासाठी जगभरातील स्थापत्यकला अभ्यासक या मंदिराला भेट देतात. राखाडी आणि पिवळया रंगाच्या सैंड स्टोन मध्ये या मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात सागाच्या लाकडी फळयांचा वापर येथे करण्यात आलेला आहे.
प्रेअह विहार मंदिराचे सुरुवातीचे बरेचसे बांधकाम सुर्यवर्मा पहिला (इ.स. १००६ ते १०५०) यांच्या काळांत तर बाकीचे सर्व काम सुर्यवर्मा दूसरा यांच्या कारकिर्दीत करण्यात आले आहे. या मंदिरांत असलेल्या ख्मेर आणि संस्कृत लिपीतील शिलालेखांवरून ही माहिती जगा समोर आली आहे. राजा सूर्य वर्मा यांच्या गुरूने शिखरेश्वर मंदिराला अनेक मौल्यवान वस्तू वेळोवेळी भेट दिल्याचा उल्लेखही याच शिलालेखांत आहे.
येथे कसे जावे:
सीएम रिप पासून डोंगर पायथ्याशी एक पर्यटक केंद्र तयार करण्यात आले आहे. सर्व प्रकारची खाजगी वाहने येथे ठेवावी लागतात.या केंद्रापासून ६ आसनी जीप सारखे वाहन घेउन डोंगरावर जातात. या डोंगरावर जाण्याचा रस्ता तीव्र चढाचा असल्यामुळे इतर वाहने तिथे चढू शकत नाहीत. या केंद्रा पासून अर्धातास तीव्र चढा चढून आल्यावर एका लहानशा वस्तीपाशी येतो. वर आलेल्या जीप्स येथे पार्क करतात.
कम्बोडिया आणि थायलंड या देशांच्या सीमेवरील डोंगरावर हे मंदिर असल्याने आणि या दोन देशांत याच मंदिरावरून वाद असल्याने दोन्ही देशांचे सैनिक येथे कायम तैनात असतात. येथून उजवीकडे प्रचंड लांब दगडी मार्गाने पुढे जावे लागते. या मंदिराला एकूण पांच गोपुरे आहेत. प्रत्येक गोपुरांच्या दरवाजांवर घोड्यावर बसलेले दम्पती,गोवर्धन गिरिधारी कृष्ण इत्यादि शिल्पे कोरलेली आहेत.
पांचही गोपुरे पार करुन आपण उंचावर एका भव्य वास्तूत येतो. येथे मोठ्या दगडी दरवाजातुन आत गेल्यावर समोर उंच दगडी चौथर्यावर मुख्य मंदिर दिसते. या मंदिराचा प्राकार चारही बाजूंनी ओवर्या बांधून बंधिस्त केलेला आहे. या सगळ्या परिसरांत कम्बोडियाचे सशस्त्र सैनिक सुरक्षेसाठी नेहमीच तैनात असतात. या ओवर्या आतून सलग आहेत. एक लांबच लांब कोरिडोर असून त्याच्या एका बाजूने अखंड भिंत तर दुसर्या बाजूने एकाला एक जोडून असलेल्या खिडक्या आहेत.
असे घडते गणेश दर्शन:
मुख्य मंदिरांत काही पायर्या चढून जावे लागते. आत मध्ये आपल्याला गणपती बाप्पा दिसतात आणि सुखद आश्चर्याचा धक्का बसतो. कम्बोडियात कुठेही न दिसणारा भारतीय लोकांच्या अतिशय ओळखीचा असलेला काळया पाषाणातील गणपती पाहून मनाला समाधान वाटते. कम्बोडियात सर्वत्र दिसणार्या टोपी सारखा मुकुट असलेली गणपतीची ही मूर्ती अंदाजे दिड फूट उंच आहे. एका हातांत तुटलेला दांत आणि दुसर्या हातांत पात्र असून त्यावर सोंड टेकलेली आहे.गणपतीचे कान त्याच्या खांद्याच्या खाली पर्यंत आलेले आहेत.
आल्या मार्गाने बाहेर जावून मंदिरालापूर्ण वळसा घालून मागच्या बाजूला असलेल्या डोंगराकड़े जाता येते. तिथून आपण ज्या मार्गाने मंदिरापर्यंत आलो ते पर्यटन केंद्र, तिथे लावलेल्या बसेस आणि गाड्या,बाजुचा पाण्याचा मोठा तलाव आणि सर्वत्र हिरवी घनदाट झाड़ी असलेल्या परिसरातून सीएम रिप कड़े जाणारा लांबच लांब रस्ता दिसतो.बाजूला कुलेन डोंगर रांगा आणि दुसर्या बाजूला थायलंड देशाच्या सैन्याच्या चौक्या लांबवर पसरलेल्या दिसतात.
येथे येणारा पर्यटक हे विहंगम दृश्य पाहून थक्कं होतो. चकित होतो. तो हे दृश्य कधीच विसरु शकत नाही. कारण दोन देशांचे सैनिक ज्याचे रक्षण करतात, दोन देशांतील सीमेवरील डोंगरावर बांधलेल्या, यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत समाविष्ट असलेल्या जगातल्या एकमेव प्रेअह विहार मंदिरातील गणपतीचे दर्शन घेण्याचे भाग्य त्याला लाभलेले असते..!!