इंडिया दर्पण विशेष लेखमाला – परदेशातील सुप्रसिद्ध मंदिरे
कॅनबेराचे ‘विष्णु शिव मंदिरं’ आणि ‘हरे कृष्ण (इस्कॉन) मंदिर!
भारतीय माणसं जगात जिथे जिथे गेले तेथे आपल्या संस्कृति आणि धर्माची प्रतिकं असलेली लहान मोठी मंदिरं त्यांनी स्थापन केली. जगभरातील सुप्रसिद्ध मंदिरांची माहिती घेत असतांना आज आपण ऑस्ट्रेलियातील काही प्रमुख मंदिरांचा परिचय करून घेऊ या.
क्रिकेटमुळे भारतीयांना आपलासा वाटणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला एकमेव असा देश आहे ज्याला ‘महाद्वीप’, ‘राष्ट्र’ आणि ‘द्विप’ म्हटले जाते. ऑस्ट्रेलियाई राष्ट्र मंडलाच्या दक्षिणी गोलार्धात ऑस्ट्रेलिया हे खंड येते. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला ‘इंडोनेशिया’, ‘पूर्व तिमोर’ आणि ‘पापुआ न्यू गिनी’ उत्तर पूर्वेला ‘सोलोमन वानुअतु’ आणि ‘न्यू कॅलोडोनिया’ तर दक्षिणेला ‘न्यूझीलंड’ हे देश आहेत.
कांगारुंचा देश म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या फक्त अडीच कोटी आहे. एवढे लोक आपल्या देशांत भारतीय रेल्वेने दररोज प्रवास करतात. असो तर अशा या जगभरातील पर्यटकांच्या यादीत अग्रेसर असणार्या ऑस्ट्रेलियात पहिले हिंदू मंदिर हरे कृष्ण पंथाचे प्रवर्तक स्वामी प्रभुपाद यांनी १९७७ साली स्थापन केले. ‘श्री मंदिर टेम्पल’ या नावाने हे मंदिर सुप्रसिद्ध आहे. त्यानंतर अनेक हिंदू मंदिरं ऑस्ट्रेलियात स्थापन करण्यात आली आहेत.आजच्या घडीला ४५ पेक्षा जास्त अतिशय भव्य आणि देखणी हिंदू मंदिरं ऑस्ट्रेलियात पहायला मिळतात.
हिंदू टेम्पल अॅंन्ड कल्चरल सेंटर, कॅनबेरा
ऑस्ट्रेलियात राहणार्या भारतीय हिंदुंना तसेच हिंदु धर्मा विषयी जाणून घेणार्या ऑस्ट्रेलियन लोकांना हिंदू धर्माची व संस्कृतीची माहिती मिळावी.त्याविषयी अधिक मार्गदर्शन मिळावे या उद्देश्याने ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे पहिल्या हिंदू टेम्पल आणि कल्चरल सेंटरची स्थापना करण्यात आली. ऑस्ट्रेलियन हिंदू समाजासाठी येथे स्पेशल वाचनालयाची स्थापना करण्यात आली आहे. येथे सर्व प्रकारचे नवीन आणि जुने धार्मिक ग्रंथ अभ्यास करण्यासाठी उपलब्ध आहेत. या सांस्कृतिक केंद्रात नियमितपणे योग व मेडिटेशनचे अधिकारी गुरुंद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शन केले जाते.तसेच हिंदी,संस्कृत आणि इतर भारतीय भाषां शिकविण्याचे क्लास घेतले जातात. येथील मंदिरात नित्य पूजा करण्यासाठी पगारी पुजारी नेमलेले असून भारतातील नामवंत धार्मिक साधू संत यांचे सत्संग देखील नियमितपणे आयोजित केले जातात.
येथे नित्य नेमाने हनुमान पूजा, हनुमान चालीसा पठण, शिर्डीच्या साईंबाबांची साईं सेज आरती, मुरुगन पूजा, योग क्लास, पंजाबी लोकनृत्य क्लास, आयप्पा भजन व आरती यांचे साप्ताहिक आयोजन केले जाते. तसेच दर पौर्णिमेला सत्यनारायन कथा व पूजन केले जाते.
संकेतस्थळ : www.htcc.org.au
कॅनबेरा येथील विष्णु शिव मंदिर
इ.स. १९१३ पासून कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. आल्प्स पर्वताचा एक भाग असलेल्या ब्रिंडावेला पर्वत मालेजवळच हे शहर वसले आहे. सुमारे ४ लाख लोकवस्तीचे हे महानगर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व तटापासून १५० किमी आत आहे. कॅनबेरा शहराच्या मॉसन नावाच्या भागांत १९८९ मध्ये विष्णु शिव मंदिराची स्थापना करण्यात आली भारतीय वंशाच्या लोकांना आपल्या धर्मा नुसार पूजा, प्रार्थना, ध्यान धारणा आणि विविध प्रकारचे धार्मिक व सांस्कृतिक उत्सव साजरे करण्यासाठी या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. या मंदिराचे व्यवस्थापन मंदिर सोसायटी ऑफ ऑस्ट्रेलिया यांचे द्वारा केले जाते.
विशेष म्हणजे आपल्या भारतात अनेक ठिकाणी दिसणार्या पारंपरिक पद्धतीच्या भगवान शंकर आणि भगवान विष्णु यांच्या मंदिरासारखेच हे मंदिर स्थापन केलेले आहे. हे मंदिर पाहिल्यावर आपण भारतातील एखाद्या गावातले शिव मंदिरच पहात आहोत असे वाटते.
या मंदिरात भगवान शंकर, माता पार्वती, श्री गणेश, मुरुगन, महादेवी, श्रीराम सीता,लक्ष्मण आणि हनुमान त्याच प्रमाणे भगवान प्रसन्न वेंकटेश्वर आणि राधा,तसेच भगवान विष्णु, महालक्ष्मी माता,आणि श्रीकृष्ण यांच्या मूर्ती आहेत.
येथे नित्य नेमाने धार्मिक ग्रंथ वाचन, शास्त्रीय संगीताचे आणि शास्त्रीय नृत्य शिकविण्याचे क्लास घेतले जातात. योगाचे महत्व आणि सेवे द्वारे हिंदूधर्माचा प्रचार व प्रसारकेला जातो.
संकेतस्थळ: www.vishnushivmandir.org.au
हरे कृष्ण (iskaon इस्कॉन ) मंदिर,कॅनबेरा
ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय मंदिरांचा पाया घातला तो हरे कृष्ण मंदिराचे प्रमुख प्रवर्तक स्वामी प्रभुपाद यांनी. इस्कॉन या जग प्रसिद्ध संस्थेचे हरे कृष्ण इस्कॉन मंदिर ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे पहायला मिळते. ऑस्ट्रेलिया कॅपिटल टेरिटरीतील AINSLIE या भागात हे मंदिर आहे.
लोकांना मोठ्या प्रमाणात धार्मिक ज्ञान देणे, श्रीकृष्णाचा महिमा वर्णन करने, समाजातील लोकांना एकत्र आणून त्यांना श्रीकृष्ण भक्तीचे महत्व समजावून देणे, सर्वत्र श्रीकृष्णाचे नामसंकीर्तन करने, धार्मिक ग्रंथ, मासिकं , नियतकालिक यांच्या द्वारे श्रीकृष्णाचे चरित्र व तत्वज्ञान जगभर प्रसारित करने, समाजातील लोकांना एकमेकांच्या अधिक जवळ आणणे ही इस्कॉनची तत्वे येथे पाळली जातात. त्याच प्रमाणे गोरक्षण,ध्यान साधना आणि संगीताचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित केली जातात. येथे दररोज आरती, नृसिंह प्रार्थना ,तुलसी पूजा,शास्त्रीय संगीत व नृत्य यांचे क्लास, वैष्णव आचार्यंचे भजन,नैवेद्य ,किर्तन इत्यादि कार्यक्रम घेतले जातात.
संकेतस्थळ: www.hareksrishncanbera.com