इंडिया दर्पण विशेष लेखमाला – परदेशातील सुप्रसिद्ध मंदिरे
अॅडलेड येथील श्रीगणेश आणि स्वामी नारायण मंदिर
परदेशातील मंदिरं म्हणजे भारतीय लोकांना एकत्र येण्याची, विचार विनिमय करण्याची , विविध सण,उत्सव एकत्रित साजरे करण्याची,आणि आपली शक्ती आपली एकता निर्माण करणारी सामाजिक केन्द्रं बनली आहेत. येथे देवपूजा किंवा देवदर्शन यापेक्षा परक्या देशांत सुखरूपपणे रोजचे जीवन जगण्याचा मार्ग दाखाविण्यासाठी अशा मंदिरांची गरज असते.
ऑस्ट्रेलियातील अॅडलेडचं नाव घेतल्या बरोबर क्रिकेट शौकिनाचे कान टवकारने सहाजिक आहे. कारण अॅडलेड म्हणजे क्रिकेटची ऑस्ट्रेलियातील ‘पंढरी’ हे सगळ्या भारतीय क्रिकेट प्रेमींना पाठ आहे ! पण हेच अॅडलेड ‘फूटबॉल’ची ‘काशी’ आहे हे अनेकांना माहित नसेल! अॅडलेडच्या ओव्हल मैदानावर क्रिकेटचे सामने खेळण्याच्या कितीतरी आधी पासून फूटबॉलचे सामने खेळले जात होते. आजही अॅडलेड फूटबॉलसाठीच जगभर प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे जगातले टॉप फाईव्ह मधले दोन फूटबॉल संघ ‘अॅडलेड फूटबॉल क्लब’ आणि ‘पोर्ट अॅडलेड फूटबॉल क्लब’ हे अॅडलेडच्या मातीतलेच आहेत.
अॅडलेड ही दक्षिण ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. ऑस्ट्रेलियातील हे पाचव्या क्रमांकाचे महानगर आपल्या कडील चंदीगड किंवा गुजरात मधील गांधी नगर सारखे पूर्व नियोजित म्हणजे प्लानिंग करून बांधलेले शहर आहे. इ.स. १८३६ मध्ये या शहराची स्थापना करण्यात आली आहे. इ.स. १८८४ पासून समर सीझनमध्ये अॅडलेडच्या ओव्हल मैदानावर अंतर्राष्ट्रीय क्रिकेटचे सामने सुरु झाले. ओव्हल मैदानाजवळच असलेल्या मेमोरियल ड्राइव्ह पार्क या बंदिस्त मैदानावर डेव्हिस कप, ऑस्ट्रेलियन ओपन, अॅडलेड इंटर नॅशनल आणि इतर आंतरराष्ट्रीय टेनिसचे सामने खेळले जातात.
अशा या क्रीडानगरी अॅडलेड मध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अॅडलेड मध्ये भारतीय किंवा हिंदू मंदिरांची संख्याही मोठी आहे. ही मंदिरं म्हणजे भारतीय लोकांना एकत्र येण्याची विचार विनिमय करण्याची , विविध सण,उत्सव एकत्रित साजरे करण्याची,आणि आपली शक्ती आपली एकता निर्माण करणारी सामाजिक केन्द्रं बनली आहेत. येथे देवपूजा किंवा देवदर्शन यापेक्षा परक्या देशांत सुखरूपपणे रोजचे जीवन जगण्याचा मार्ग दाखाविण्यासाठी अशा मंदिरांची गरज असते.
श्री गणेश मंदिर
अनेक चर्चेसचे महानगर असलेल्या ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध अॅडलेड शहराच्या ह्दय स्थानी श्री गणेशाचे मंदिर आहे.एखाद्या किंमती सुंदर हराच्या अग्रस्थानी असलेल्या शोभिवंत पदका सारखे हे गणेशाचे मंदिर आहे.
इ.स. २००१ मध्ये स्थापन करण्यात आलेले हे गणेश मंदिर म्हणजे अॅडलेड आणि त्याच्या आसपासच्या परिसरांत राहणार्या भारतीय लोकांना एकत्र आणणारे प्रमुख केंद्र आहे. ऑस्ट्रेलियात राहणार्या भारताच्या विविध प्रांतातील लोकांना एकत्र येण्याचे , विविध भारतीय सण आणि उत्सव साजरे करण्याचे हक्काचे ठिकाण मानले जाते. मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळवर वर्षभररातील उत्सवांची यादी अगोदरच प्रसिद्ध केली जाते.
सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश करणार्या श्री गणेशाचे हे प्रमुख मंदिर असले तरी येथे लक्ष्मी-नारायण, मुरूग वल्ली आणि दैवनाई,नवग्रह ,हनुमान,भैरव तसेच शिवलिंगाची देखील नित्य पूजा केली जाते.
या मंदिरांत सर्व देव देवतांची नित्य पूजा केली जाते.विविध सण,उत्सव साजरे केले जातात.तसेच या प्रसंगी एकत्र येणार्या भारतीय तसेच इतर भाविकांना भारतीय पद्धतीचे भोजन वेळोवेळी पुरविले जाते. भारतीय संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचे केंद्र म्हनुनच अॅडलेड मधील या श्री गणेश मंदिराची ख्याती आहे.
संकेतस्थल: www.shriganeshatempleadelaide.com.au
श्री स्वामीनारायण मंदिर सॅलिसबरी
अॅडलेड येथील श्री स्वामीनारायण मंदिर २०१४ मध्ये स्थापन करण्यात आले आहे. हे मंदिर अॅडलेड येथे स्थापन करण्याची प्रक्रिया २००६ पासूनच सुरु झाली होती. २००६ पासून दर शनिवारी रविवारी सतसंगाच्या निमित्ताने अॅडलेड आणि आसपासच्या परिसरातील अनेक भारतीय कुटुंब एकत्र येऊ लागले.विविध सण उत्सव साजरे करू लागले .विविध विषयांवर चर्चा करू लागले. हे असे जवळ जवळ सहा वर्षे चालले तेव्हा कुठे २०१२ मध्ये येथे जागा विकत घेउन स्वामीनारायण मंदिर स्थापन करण्याची प्रक्रिया वेगात सुरु झाली आणि दोनच वर्षांत हे अतिशय सुंदर,देखने मंदिर आकारस आले.
या अतिशय देखण्या व भव्य मंदिरांत श्री स्वामीनारायण आणि अक्षरब्रह्मन गुणातितानंद स्वामी यांच्या प्रमाणेच भगवान शिव माता पार्वती आणि श्री गणेश देव,राधा -कृष्ण देव, श्री सीतारामदेव आणि हनुमानजी,श्री गुरुपरंपरा आणि श्री निलकंठ वर्णी यांच्या मूर्ती आहेत.
मंदिरांत नित्य आरती, निलकंठ वर्णी आरती, भाविकांना नित्य दर्शन या प्रमाणेच येथील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथे संघटन करण्यासाठी व ते सदृढ़ ठेवण्यासाठी बालसभा,बालिकसभा,किशोर सभा,किशोरी सभा, युवक सभा, युवती सभा यांचे नित्य आयोजन केले जाते.
BAPS स्वामीनारायण संस्थेचे सर्व नियम येथे कटाक्षाने पाळले जातात. भारतीय संस्कृती आणि मूल्य यांचा प्रचार प्रसार करण्याचे एक विश्वासाहार्य केंद्र म्हणून श्री स्वामीनारायण मंदिर साऊथ ऑस्ट्रेलियात प्रसिद्ध आहे.
संकेतस्थल: www.swaminarayanadelaide.org