इंडिया दर्पण विशेष लेखमाला – जगातील सुप्रसिद्ध मंदिरे
मलेशियातील मुरुगन मंदिर
भारतात हिंदू देवी देवतांची असंख्य मंदिरं आहेत त्यातील जवळ जवळ प्रत्येक मंदिराची एखादी आख्यायिक सांगितली जाते.परंतु अशी मंदिरं भारतातच आहेत असे नाही तर परदेशातही अशी काही मंदिरं आहेत. मलेशियाची राजधानी क्वालालंपुरच्या गोम्बेक जिल्ह्यांत चुणकळी दगडांपासून नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बाटू गुहेत भगवान मुरुगन यांचे मंदिर आहे.या मंदिराला श्रीसुब्रमणियास्वामी मंदिर असेही म्हणतात. आपल्याकडे असलेल्या तिरुपति बालाजीच्या मंदिरा सारखे हे मंदिर आहे.
बाटू गुहा सुमारे ४० करोड़ वर्षांची जुनी आहे असे मानले जाते.येथे गुहा किंवा गुंफा मध्ये हिंदू मंदिरांची शृंखलाच आहे. येथील भगवान मुरुगन स्वामींचे मंदिर आणि परिसर पाहिल्यावर आपण भारता बाहेर आलो आहे असे वाटतच नाही. हे मंदिर तमिल लोकांचे पवित्र धार्मिक स्थळ म्हनूनच ओळखले जाते.
मुरुगन मंदिराचा इतिहास
मलेशियांतील मुरुगन मंदिराचा इतिहास येथीळ गुफांशी जोडलेला आहे. एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी चाळीस कोटी वर्षांची गुहा येथे सापडली.त्यानंतर काही दिवसांनी के थम्बूस्वामी पिल्लै नावाचे एक श्रीमंत तमिळ व्यापारी येथे आले. येथील गुहेचे प्रवेशव्दार भगवान मुरुगन यांच्या भाल्यासारखे असल्याचे त्यांना जाणवले. या गुहेचे प्रवेशव्दार पाहताच या ठिकाणी मंदिर बनवावे असा विचार त्यांच्या मनात दृढ़ झाला. त्यानीच नंतर येथे मंदिर बांधून इ.स. १८९१ साली येथे भगवान मुरुगन यांची प्रतिष्ठापना केली.पाहता पाहता हे स्थान नावारुपाला आले आणि काही वर्षांतच तमिल लोकांचे तीर्थ स्थान म्हणून प्रसिद्ध झाले. येथे भगवान मुरुगन यांची मूर्ती स्थापन केल्यानंतर सुमारे वर्षभराने भगवान मुरुगन यांचा जन्म दिवस असलेला ‘थाईपुसम’ नावाचा सण साजरा केला जावू लागला. जानेवारीचा शेवट आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो.त्यावेळी लाखो तमिळ बांधव येथे एकत्र येतात.
मंदिराची वास्तुकला
मुरुगन मंदिर चुनखडीपासून नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहंच्या श्रुंखलेत स्थापन करण्यात आले आहे. मंदिरा पर्यंत जाण्यासाठी अतिशय आकर्षक रंगीबेरंगी २७२ पायर्या आहेत. डोंगराच्या पायथ्याशी तमिल पद्धतीचे अतिशय भव्य आणि देखने मंदिर आहे. हा मंदिर समूह पाहून तिरुपति बालाजी या स्थानाचीच आठवण येते. येथे सुरुवातीलाच असलेली भगवान मुरुगन यांची १४३ फूट उंच मूर्ती दुरूनच भाविकांचे लक्ष्य वेधून घेते. डोंगर पायथ्यापासून तर गुहेच्या मुखापर्यंत ही मूर्ती उंच आहे. ही मूर्ती तयार करण्या साठी १५ शिल्पकार तीन वर्षे सतत काम करीत होते.
आख्यायिका
भगवान मुरुगन मंदिरा विषयी एक आख्यायिका प्रचलित आहे.या ठिकाणी असलेल्या चुनखडीच्या डोंगरावर भगवान शंकर आणि पार्वती यांनी नृत्य केले होते आणि येथेच माता पार्वती हिने आपला जेष्ठ पुत्र मुरुगन स्वामी उर्फ़ कुमार कार्तिकेय याला भाला दिला होता.अशी मान्यता आहे. यामुळेच तमिळ व्यापारी के थम्बूस्वामी येथे प्रथम आले तेव्हा त्यांना गुहेचे मुख भाल्याच्या टोका सारखे दिसले असावे.
येथील गुहेत कुमार कार्तिकेय किंवा भगवान मुरुगन यांचे प्रमुख मंदिर आहे. त्याच प्रमाणे भगवान शंकर, माता पार्वती गणेश आणि इतर अनेक देवी देवतांची मंदिरं आहेत. हे ठिकाण मुळांत निसर्ग संपन्न आहे. भाविक आणि पर्यटक यांच्यासाठी येथे अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. थाई पुसम उत्सवाला लाखो भाविक येथे येतात.
बाटू गुहेपर्यंत कसे जावे: क्वालालंपुर पासून केवळ १३ किमी. अंतरावर बाटू गुहा आहे. तिरुपति बालाजी सारखेच हे स्थान अतिशय विकसित केलेले आहे. रेल्वे ,बसेस ,टैक्सी सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत.