इंडिया दर्पण विशेष लेखमाला – परदेशातील सुप्रसिद्ध मंदिरे
मेलबोर्नचे ‘श्रीमुरुगन’, ‘श्री वक्रतुंड’ व ‘हरे कृष्ण’ मंदिर!
‘लार्ड्स’ला क्रिकेटची ‘काशी’ म्हटले तर ‘मेलबर्न’ला क्रिकेटची ‘पंढरी’ म्हणावे लागेल. कारण जगातले दुसर्या क्रमांकाचे सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम मेलबर्न येथे आहे. या स्टेडियम मध्ये एका वेळी १,२०,००० प्रेक्षक बसु शकतात. एवढे मोठे स्टेडियम अजून आपल्या भारतातही नाहीये. मेलबर्न हे ऑस्ट्रेलियातील दुसर्या क्रमांकाचे शहर आहे. इ.स. १९०१ ते १९२७ पर्यंत ऑस्ट्रेलियाची राजधानी असलेले मेलबर्न सध्या ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्याची राजधानी आहे. पोर्ट फिलिप जवळ वसलेले मेलबर्न ऑस्ट्रेलियाचे कला आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. जगभरातील क्रिकेट प्रेमी आणि पर्यटक यांच्या एक नंबरची पसंती असलेल्या मेलबर्न शहरांत अनेक देखणी हिंदू मंदिरं आहेत. त्यातील काही मंदिरांचा परिचय आपण आज करून घेणार आहोत.
‘मेलबर्न’ चे मुरुगन मंदिर!
मेलबर्न शहराच्या पश्चिम उपनगरात असलेले मुरुगन मंदिर तमिल लोकाप्रमाणेच इतर भाविक भक्तांत त्याच प्रमाणे पर्यटकांत लोकप्रिय आहे.
या मंदिरांत भगवान मुरुगन, तेव्यानई आणि वल्ली आणि विनायकार म्हणजे गणपती बाप्पा यांच्या मूर्ती आहेत.
या मंदिर समुहांत तीन प्रमुख देवतांची मंदिरं आहेत. पहिल्या भागांत वल्ली आणि देवसेना यांच्या सोबत मुरुगन, दुसर्या भागांत विनायगार म्हणजे श्री गणेश असून तिसर्या भागांत शिवलिंग आणि माता पार्वती यांच्या मूर्ती आहेत.या शिवाय मंदिरांत दक्षणामूर्ती, भगवान विष्णु आणि दुर्गा देवी यांच्याही मूर्ती आहेत.
मेलबर्नच्या या सुप्रसिद्ध मंदिरांत वर्षभर विविध उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात.
संकेतस्थळ: www.melbourn-murugan.org
श्री वक्रतुण्ड विनायगार मंदिर
भगवान श्री गणेशाचे मेलबर्न येथील पाहिले पारंपरिक मंदिर श्रीवक्रतुंड विनायगार मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. मंदिराचे नुकतेच विस्तारीकरण करण्यात आले.त्यावेळी श्री हनुमान आणि श्री नगम या देवतांच्या नवीन मुर्तींची स्थापना करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या मंदिरांत आजवर दोन महाकुंभाभिशेक करण्यात आले आहेत. कोणताही नवीन प्रोजेक्ट सुरु करण्यापूर्वी ते यशस्वी व्हावेत,त्यात काही अडचणी अडथळे येऊ नयेत, सर्व कार्ये निर्विघ्नपणे पार पडावी याची प्रार्थना करण्यासाठी अनेक भाविक या मंदिरांत येतात. वक्रतुंड विनायगार गणेशाला साकडं घालतात.त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुले या गणेशाच्या भक्तांत दिवसेंदिवस वाढ होते आहे.
मंदिराच्या आवारातील कैंटीन मध्ये भारतीय पद्धतीचं भोजन मिळू शकते.
संकेतस्थल: www.mvhs.org.au
हरेकृष्ण मंदिर
ऑस्ट्रेलियातील पाहिले हिंदू मंदिर मेलबर्न या शहरांत स्थापन करण्यात आले. हरे कृष्ण पंथाचे प्रमुख प्रवर्तक श्रील प्रभुपाद यांनी १९७५ मध्ये या मंदिराची स्थापना केली. लोकांना मोठ्या प्रमाणात धार्मिक ज्ञान देणे, श्रीकृष्णाचा महिमा वर्णन करने, समाजातील लोकांना एकत्र आणून त्यांना श्रीकृष्ण भक्तीचे महत्व समजावून देणे, सर्वत्र श्रीकृष्णाचे नामसंकीर्तन करने, धार्मिक ग्रंथ, मासिकं , नियतकालिक यांच्या द्वारे श्रीकृष्णाचे चरित्र व तत्वज्ञान जगभर प्रसारित करने, समाजातील लोकांना एकमेकांच्या अधिक जवळ आणणे ही इस्कॉनची तत्वे येथे काटेकोरपणे पाळली जातात. या मंदिरांत भगवान चैतन्य आणि भगवान नित्यानंद श्री-श्री गौरव निताई यांच्या मनोवेधक मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या मंदिरांत श्री श्री राधा वल्लभ आणि श्री श्री गौरव , भगवान जगन्नाथ, भगवान बलदेव आणि सुभद्रा यांच्या देखील अतिशय आकर्षक प्रतिमा आहेत. मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर ध्यान धारणा, धार्मिक संगीत आणि समाजसेवेद्वारे लोकांना खरा आनंद, अंतरीचे समाधान मिळवून दिले जाते. तसेच जीवनातील शास्वत प्रश्न सोडविण्यासाठी प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचा उपयोग केला जातो असे म्हटले आहे.
संकेतस्थळ: www.harekrishnamelbourn.com.au