इंडिया दर्पण विशेष – परदेशातील सुप्रसिद्ध मंदिर
अमेरिकेतील रॉबिन्सविले एन.जे. येथील श्री स्वामिनारायण मंदिर
आपला भारत देश हा मंदिरांचा देश आहे असे म्हणतात.गावांत मंदिरं असणं हे भारतीय संस्कृतीत समृद्धिचे प्रतिक समजतात. मंदिरावरून आपण गावांची समृद्धि मोजतो. मानसिक, अध्यात्मिक आणि आत्मिक विकास करण्याची कामं मंदिरं करतात असं आपली भारतीय संस्कृति मानते. भारतीय लोकं जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब असणार्या मंदिरांची स्थापना केलेली दिसते. अगदी आजच्या कालातही पुढारलेल्या यूरोप,अमेरिकेपासून ओस्ट्रेलिया,आफ्रिका खंडात जिथे जिथे भारतीय माणूस पोहचला तिथे तिथे भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेली मंदिरं स्थापन केली. सुरुवातीला लहान असणार्या भारतीय मंदिरांनी कालांतराने आपला आकार वाढवीला. भारतीय माणसं सुद्धा परदेशांत कुठेही गेल्यावर आपल्या देव देवतांची मंदिरं कुठे आहेत याचीच सर्व प्रथम चौकशी करतात.
अमेरिकेत देखील भारतीयानी स्थापन केलेली अनेक हिंदू मंदिरं आहेत. आज आपण रॉबिन्सविले एन.जे. येथील अतिशय देखण्या कलाकृति पूर्ण श्री स्वामिनारायण मंदिराचा परिचय करून घेणार आहोत.

मो. ९४२२७६५२२७
भारतातील अनेक प्रमुख शहरांत श्री स्वामीनारायण किंवा अक्षरधाम या नावांनी प्रसिद्ध असलेली मंदिरं आहेत. दिल्ली येथील अक्षरधाम मंदिर हे तर देशांतील सर्वांत सुंदर,सर्वांत मोठे आणि अतिशय देखने असे मंदिर आहे. अगदी तसेच श्री स्वामीनारायण मंदिर अमेरिकेत रॉबिन्स विले येथे पहायला मिळते. परम पूज्य प्रमुख स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रॉबिन्सविले येथील श्रीस्वामिनारायण मंदिर स्थापन करण्यात आले. भगवान श्रीस्वामीनारायण यांच्या अनुयायी गुरु परंपरेतील प्रमुख स्वामी महाराज हे पाचवे गुरुदेव. तेच बी.ए.पी.एस. या संस्थेचे प्रमुख होते. त्यांनी भारतात आणि परदेशांत ११०० पेक्षा अधिक श्रीस्वामीनारायण अक्षरधाम मंदिरांची स्थापना करून एक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. सामाजिक,शैक्षणिक तसेच आरोग्यच्या क्षेत्रांत निस्वार्थ सेवा करणार्या प्रमुख स्वामी महाराज यांनी १००० पेक्षा अधिक उच्च विद्या विभूषित युवकांना साधू दीक्षा दिली आहे.
अमेरिकेतील रॉबिन्स विले येथील स्वामिनारायण मंदिराचे बांधकाम २०१० साली सुरु झाले. १२००० स्क्वेअर फूट आकरमानाचे हे मंदिर चिझल्ड इटालियन मार्बल पासून तयार करण्यात आले आहे. अमेरिकेतील कडाक्याच्या थंडीत प्रचंड स्नोफ़ॉल (बर्फवृष्टी) होत असतांनाही या मंदिराचे काम सुरूच असायचे. चार वर्षां नंतर म्हणजेच २०१४ मध्ये या मंदिराचे काम पुर्णत्वास गेले. १० ऑगस्ट २०१४ रोजी प्रमुख स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी भारतातून जेष्ठ स्वामी तर जगभरातून अनेक भाविक भक्त उपस्थित होते. या मंदिराची भव्यता आणि सुंदरता पहात रहावी अशी आहे. ‘नागाराडी’ पद्धतीने बांधलेले हे मंदिर ४२ फूट उंच, १३३ फूट लांब आणि ८७ फूट रुंद आहे. संपूर्ण मंदिर जगातील सर्वांत महाग आणि दुर्मिळ अशा ६८००० क्यूबिक फूट इटालियन कॅरेरा मार्बल पासून तयार करण्यात आले आहे. जगातील अशा प्रकारचं हे तिसरं मंदिर आहे.
मंदिरा भोवतालची कलाकुसर केवळ देखणीच नाही तर अर्थपूर्ण देखील आहे. आता हेच पहा ना मंदिराच्या ९८ खांबावर महान परमहंस आणि भगवान स्वामिनारायण यांच्या परम भक्तांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्याच प्रमाणे संपूर्ण मंदिरावर भगवान स्वामिनारायण यांनी केलेला उपदेश आणि त्यांच्या प्रेरणादायी कथा कोरलेल्या आहेत. हे मंदिर बांधण्यासाठी किती मेहनत घेतली हे ऐकून आश्चर्य वाटल्या शिवाय रहाणार नाही. मंदिरासाठी लागणारा संपूर्ण इटालियन मार्बल युरोपातुन समुद्रमार्गाने कार्गोने प्रथम भारतात पाठविण्यात आला. भारतात आल्या नंतर हा मार्बल रस्ते मार्गाने ट्रकने राजस्थानात पाठविण्यात आला. तेथे शेकडो कुशल करागिरांनी छिन्नी हातोड्याने आपल्या हातांनी मार्बल वरील कोरीव काम केले. सुमारे साडेतीन वर्षे हे काम चालू होते. संपूर्ण कोरीव काम तयार झाल्या नंतर सर्व भाग भारतातील वर्क शॉप मध्ये एकमेकांना जोडण्यात आले. थोडक्यात अमेरिकेत सध्या जे मंदिर आहे तसेच मंदिर भारतातील वर्कशॉप मध्ये तयार करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक पिस (तुकड्याला) नंबर्स देण्यात आले. स्थानिक ऑनसाईट इंजीनियर्सनी विकसित केलेली नंबर सिस्टिम येथे वापरण्यात आली. मंदिराचे सर्व पीसेस नंतर डिसअसेम्बल (सुटे) करण्यात आले. नम्बर्स दिलेले सर्व पीसेस काळजीपूर्वक व्यवस्थित पैकिंग करण्यात आले. जहाजाने हे सर्व पीसेस अमेरिकेला पाठविण्यात आले. तिथे मंदिर उभारण्यासाठी सर्व पीसेस पुन्हा योग्य क्रमाने जोडण्यात आले. यामुळे रॉबिन्स विले येथील मंदिराचा प्रत्येक दगड यूरोप ते अमेरिका व्हाया इंडिया २१,५०० मैलाचा प्रवास करून आला असे गंमतीने म्हटले जाते.
अमेरिकेत मंदिर उभारण्या पूर्वी मंदिराच्या संरक्षणासाठी ५५ फूट उंच आणि १३५ फूट रुंद मंडप उभारण्यात आला होता.
मंदिराच्या मुख्य प्रवेशव्दाराला ‘मयूरद्वार’ असे म्हणतात. हे प्रवेशव्दार २३६ कलाकृति पूर्ण मयूर अनेक सुशोभित हत्ती, भक्त आणि परमहंस यांच्या नक्षीदार कलाकुसर युक्त कलाकृतीनी सुशोभित करण्यात आले आहेत. हे मंदिर तयार होताना ४.७ मिलियन मनुष्य तास एवढा वेळ खर्च झाला. हजारो करागिर आणि स्वयंसेवक यांनी आपला अमूल्य वेळ या मंदिराच्या उभारणी साठी स्वखुशिने दिला.
या सर्वांना प्रमुख स्वामी महाराज यांनी सतत प्रेरणा दिली प्रोत्साहन दिले. मानवी समाजाच्या उत्कर्षासाठी आपण हे कार्य करतो आहोत अशी भावना त्यांनी या लोकांमध्ये सतत जागृत ठेवली. चार वर्षे हजारो लोकाना अशा प्रकारच्या धार्मिक कार्यासाठी सतत प्रेरणा देणे हे काही सोपे काम नव्हते.
मंदिराची वैशिष्ट्ये
४० लहान आकाराची कोरीव शिखरं , २ मोठे आणि ८ लहान घुमट (डोम), ९८ कलाकुसर युक्त खांब (स्तंभ), 66 मयुराच्या आकारच्या शोभिवंत कमानी ,१४४ कलाकुसर युक्त मानवी आकृत्या,५८ सुशोभित सीलिंग डिझाइन्स,३४ सुशोभित ग्रिल्स (जाळया),९१ संगीतवाद्यं आणि फुलांनी सुशोभित हत्ती,44 भगवानाचे पूजन करणारे 44 गणेश प्रतिमा, १३,४९९ सुट्टे कलाकुसर युक्त पीसेस. भगवान स्वामिनारायण आणि अक्षरधाम गुणातीतानंद स्वामी, श्री घनश्याम महाराज, श्री राधा कृष्ण देव, श्री हरी कृष्ण महाराज, ब्रह्मस्वरूप भगतजी महाराज,ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराज, ब्रह्मस्वरूप योगीजी महाराज, ब्रह्मस्वरूप प्रमुख स्वामी महाराज , श्री सिताराम देव,श्री लक्ष्मण आणि श्री हनुमानजी, श्री शिव पार्वतीदेव,श्री गणेश जी, आणि श्री कार्तिकेयजी, श्री नर- नारायण देव, श्री विठोबा रुक्मिणी देव, श्री लक्ष्मी नारायण देव, श्री तिरुपति बालाजी देव, श्री घनश्याम महाराज अभिषेक मूर्ती.
मंदिराचा संपर्क: BAPS SHRI SWAMINARYAN MANDIR
112, N Main street Robinsville NJ 08561 USA