इंडिया दर्पण विशेष लेखमाला – परदेशातील सुप्रसिद्ध मंदिरं
मुक्ती गुप्तेश्वर आणि शक्ती मंदिर
परदेशातील सुप्रसिद्ध मंदिरांत ऑस्टेलियातील मंदिरं देखणी आणि प्रेक्षनीय आहेत. सर्वत्र ही मंदिरं हिंदू धर्माची आणि संस्कृतीची पताका फड़कवित असतात. न्यू साऊथ वेल्स मधील मंदिरांचा ही याला अपवाद नाही. ‘न्यू साऊथ वेल्स’ ज्याला सगळे ऑस्ट्रेलियंस NSW याच शार्टफॉर्म नावाने ओळखतात,ते ‘न्यू साऊथ वेल्स’ हे ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनार्यावरील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. न्यू साऊथ वेल्स च्या उत्तरेला ‘क्वींसलैंड’ दक्षिणेला ‘व्हिक्टोरिया’ आणि पश्चिमेला दक्षिण ऑस्ट्रेलिया ही राज्ये आहेत.कोरल आणि तस्मन सीज हे समुद्र किनारे न्यू साऊथ वेल्स ला लाभले आहेत. सिडनी हे आपले सर्व परिचित महानगर न्यू साऊथ वेल्स ची राजधानी आहे.
सर्वाधिक ख्रिश्चन धर्मियांची वस्ती असलेल्या या राज्यात अनेक हिंदू मंदिरं अभिमानाने उभी आहेत. ऑस्ट्रेलियातील भारतीय तसेच भारत व इतर देशांतून ऑस्ट्रेलियात जाणारे पर्यटक न्यू साऊथ वेल्स मधील ही मंदिरं पाहून आश्चर्यचकित होतात. यातील काही मंदिरांची माहिती आज आपण करून घेऊ या…
मुक्ती गुप्तेश्वर मंदिर सोसायटी न्यू साऊथ वेल्स
भारतातील सुप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग मंदिरं आपणा सर्वांना माहित असतील परंतु तेरावे ज्योतिर्लिंग मंदिर ऑस्ट्रेलियात आहे हे ऐकून निश्चितच आश्चर्य वाटेल.
ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स या भागांत एक मानव निर्मित गुफा असून या गुहेतील मुक्ती गुप्तेश्वर मंदिर हे १३ वे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. अशा प्रकारचे हे जगातले एकमेव शिव मंदिर आहे असे म्हणतात. येथे धा मीटर खोलीची एक व्हाल्ट असून या व्हाल्ट मध्ये विश्वातील दोन मिलियन भाविकांनी आपल्या हाताने ॐ नमो शिवाय हा शिवमंत्र लिहिलेल्या नोट्स जपून ठेवलेल्या आहेत!तसेच जगभरातील प्रसिद्ध धार्मिक मार्गदर्शक, साधु,संत यांच्या शुभेच्छा देखील या व्हाल्ट मध्ये सुरक्षित जपून ठेवल्या आहेत.
त्याच प्रमाणे येथे ऑस्ट्रेलियातील ८१ नद्यांचे आणि ५ महासागरांचे पाणी अष्ट धातुंच्या भांड्यात सुरक्षित ठेवलेले पहायला मिळते.
मुक्ती गुप्तेश्वर या मंदिरांत भारतातील सुप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती, १०८ रुद्रशिव १००८ सहस्त्र नाम भगवान शिव उभारण्यात आले आहेत.त्याच प्रमाणे या मंदिर संकुलात मठ, मंदिर,रामपरिवार मंदिर,श्री गणेश मंदिर आहेत.सगळी मिळून ११२८ मंदिरं येथे आहेत. अशा प्रकारचे हे जगातले एकमेव मंदिर आहे.
धार्मिक पूजा पाठा बरोबरच येथे नियमित योगाचे क्लासेस घेतले जातात. ऑस्ट्रेलियात पर्यटन हेतुने गेलेले पर्यटक मुक्ती गुप्तेश्वर मंदिराला अवश्य भेट देतात.
संकेतस्थळ: www.muktigupteshwar.org
श्री स्वामीनारायण मंदिर, न्यू साऊथ वेल्स
आज ऑस्ट्रेलियाच्या धार्मिक पर्यटनात न्यू साऊथ वेल्सचे श्रीस्वामीनारायण मंदिर अग्रेसर आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स या भागांत श्रीस्वामीनारायण भक्तांची संख्या वाढू लागल्या मुळे न्यू साऊथ वेल्स येथे वेगळ्या श्री स्वामीनारायण मंदिराची स्थापना करण्यात आली. नित्यसत्संग, धार्मिक कार्यक्रम आणि एकमेकांना भेटने यासाठी अशा प्रकारच्या धार्मिक स्थळाची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे श्री स्वामीनारायण कट्टर भक्तांनी या मंदिराची 2012 मध्ये स्थापना केली. बोचसनवासी श्री अक्षर पुरुषोत्तमस्वामीनारायण संस्था (BAPS) चे हे मंदिर धार्मिक आणि सामाजिक कार्याचे प्रमुख केंद्र बनले आहे. नित्य सत्संग तसेच भारतातून आलेल्या संत महंत महात्म्यांचे मार्गदर्शन केले जाते.
संकेतस्थळ: www.sydneytemple.org
सिडनी शक्ती टेम्पल कल्चरल अॅंण्ड एज्युकेशन सेंटर, न्यू साऊथ वेल्स
सिडनेच्या ‘तुंगाबी भागांत वसलेले ‘सिडनी शक्ती टेम्पल कल्चरल अॅंण्ड एज्युकेशन सेंटर’ हे ऑस्ट्रेलियातील सर्वांत लोकप्रिय मंदिर मानले जाते. हिंदू धर्मातील आदर्श आणि शिकवणुकीवर आधारित असे हे मंदिर आहे. धर्म आणि कर्म सांभाळतांना प्रत्येक व्यक्तीला मान देणे हे मंदिराचे ध्येय आहे. येथे प्रामुख्याने प्रार्थनेतून आणि भक्ती भावातून कृतज्ञता व्यक्त करण्यावर भर दिला जातो. हे मंदिर म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणूनच कार्यरत आहे. सामाजावर परिणाम करणार्या घटनांविषयी जागृती करणे तसेच समाजोपयोगी कार्यावर भर दिला जातो. येथे नित्य पूजा अर्चा, विवाह समारंभ ,वाढदिवस सेलिब्रेशन आदींचे आयोजन केले जाते. तसेच इंग्लिश, तमिल, हिंदी भाषा शिकविण्याचे क्लासेस घेतले जातात.
संकेतस्थळ: www.sydneyshakti.org