इंडिया दर्पण विशेष – परदेशातील सुप्रसिद्ध मंदिरं
इंडोनेशियातील प्रम्बानन शिवमंदिर
कधी कधी सत्य हे कल्पनेपेक्षाही अदभुत असू शकते याचा अनुभव इंडोनेशियातील सुप्रसिद्ध प्रम्बानन मंदिराकडे पाहिल्यावर येतो.
परदेशातील सुप्रसिद्ध मंदिरांच्या या लेख मालेत आज आपण इंडोनेशियातीलच नव्हे तर जगातील सर्वांत मोठ्या प्राचीन शिव मंदिराची माहिती घेणार आहोत. इंडोनेशियातील हे सर्वांत मोठे आणि अतिशय विशाल असलेल्या मंदिर समुहाला ‘प्रम्बानन शिव मंदिर’ याच नावाने जगभर ओळखतात. भारता पासून ६८०० किमी वर असलेल्या इंडोनेशियाची राजधानी असलेल्या ‘जावा’ शहरापासून जवळच असलेल्या ‘योग्यकर्ता’ शहरापासून केवळ १७ किमी अंतरावर जगातले हे सर्वांत विशाल मंदिर आहे. स्थानिक जावानिज भाषेत या मंदिराला ‘रोरो जोंग्गारंग’ मंदिर या नावानेही ओळखतात. प्रम्बानन शिव मंदिर समुहाचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे एक हजार एकर पेक्षा विस्तीर्ण जागेवर २४४ दगडी मंदिरांचा हा समूह जगात एकमेव आहे. नवव्या शतकात निर्माण करण्यात आलेल्या या मंदिरातील बहुतांश मंदिरं काळाच्या ओघात कधी धर्मवेड्या मूर्ती भंजकानी तर कधी सोळाव्या शतकांत इंडोनेशियात आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण काळाच्या छातीवर उभं राहून मंदिरांचे हे दगडी अवशेष आजही त्यावेळच्या करागिरांनी निर्माण केलेल्या या दगडी महाकाव्याची महती गात आहेत.
या २४४ मंदिरंपैकी दहा – बारा मंदिरांचा जीर्णोद्धार केल्याने ती पुन्हा आपल्या जुन्या वैभवासह दिमाखात उभी राहिली आहेत. भगवान शंकर, भगवान विष्णु आणि ब्रह्मदेव यांची ही तीनच मंदिरं इतकी प्रभावी आहेत की जगभरातील कोट्यवधी पर्यटक केवळ ही मंदिरं पाहण्यासाठी इंडोनेशिया जातात.
इंडोनेशियाचे वैभव असलेल्या अती प्राचीन प्रम्बानन मंदिराची उंची १५५ फूट आहे. या प्रमुख मंदिराची निर्मिती महाराज पिकाटन यांनी नवव्या शतकात (इ.स. ८५० ते ८५६ या कालावधीत) सुरु केली होती.त्यानंतर पुढची शंभर वर्षे संजय राजवंशातील राजा लोकपाल आणि राजा बलितुंग यांनी या मंदिराचा चहूबाजूंनी विस्तार केला. आज देखील जगातली स र्वांत विशाल निर्मिती म्हणून जग या मंदिर समुहाकड़े आश्चर्याने पाहते.
या मंदिराचे सुरुवातीचे नव ‘शिवगृह’ म्हणजे ‘भगवान शिवाचे घर’ असे होते.मंदिरासाठी विशाल भूप्रदेश उपलब्ध व्हावा यासाठी येथून वाहणार्या ‘ओपक’ नावाच्या नदीचा प्रवाह वळविण्यात आला होता.
जवळ जवळ शंभर वर्षे या मंदिर समूहात दर वेळी नवीन मंदिरांची भर पड़त होती. दहाव्या शतकांत ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे ‘इस्याना’ राजवंशाने आपली राजधानी मध्य जावा कडून पूर्व जावा कड़े स्थलांतरित केली. राजाश्रय आणि लोकाश्रय नसलेली ही सगळी मंदिरं हळूहळू ज्वालामुखीची राख आणि येथे वाढलेल्या घनदाट जंगलात गडप झाली. नंतरची अनेक शतके अफगान आणि मुघल आक्रमकांनी या मंदिरांचा यथेच्छ विध्वंस केला आणि सोळाव्या शतकांत इंडोनेशियात आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने या विशाल मंदिराचे उरले सुरले अवशेषही जमीनदोस्त केले. त्यानंतर सुमारे दोन शतकं त्यावेळीही जगातील सर्वांत मोठा असलेला हा मंदिर समूह विस्मृतीच्या पडद्यआड गेला.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रज आणि डच लोक इंडोनेशियात आले. मंदिरांचे हे खंडहर पाहून ते आश्चर्यचकित झाले. आसपासच्या जावानिज लोकांनी त्यांना या मंदिरांविषयी सांगितले. डच लोकांनी या मंदिर समुहाचे उत्खनन केले. विशेष म्हणजे डच राजांनी १९१८ मध्ये मुख्य शिव मंदिराचे पुनरनिर्माण सुरु केले. पुन्हा मध्येच दोन महायुद्धे झाली त्यामुळे या मंदिरांचे पुनर्निर्माण थांबले. अशा अनेक मानव निर्मित आणि नैसर्गिक अडथळयांवर मात करीत १९५३ मध्ये मुख्य शिव मंदिराचे पुनर्निर्माण पूर्ण झाले. त्यावेळी इंडोनेशियाचे प्रथम राष्ट्रपति सुकर्णो यांनी या मंदिराचे उद्घाटन केले. यानंतर इ.स.१९७८ पासून १९९३ पर्यंत भगवान विष्णु आणि ब्रह्मदेव यांची विशाल मंदिरं तसेच या तिन्ही देवतांची वाहने असलेल्या नंदी, गरुड आणि हंस यांची मंदिरं ही पुन्हा पूर्वी जशी होती अगदी तशीच बांधण्यात आली. याही मंदिरांचे उद्घाटन राष्ट्रपति सुकर्णो यांनी केले. आजही या मंदिरांचे पुनरनिर्माण कार्य चालूच आहे.
प्रम्बानन मंदिरांची रचना
प्रम्बानन मंदिरं प्रामुख्याने दोन मोठ्या भागांत विभागलेले आहे.यातील सर्वांत मोठा भाग बाहेरचा असून यांत २४० मंदिरं आहेत. या सर्व २४० मंदिरांच्या आतल्या मध्य भागांत तीन मुख्य मंदिरं आणि तीन वाहन मंदिरं आहेत.
त्रिमुर्तींची तीन मंदिरं
या मंदिर समुहाच्या केंद्र स्थानी भगवान शंकरांचे प्रम्बानन हे सर्वांत उंच आणि विशाल मंदिर आहे. त्याच्या उत्तरेला भगवान विष्णुंचे तर दक्षिणेला ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. ही तीन मंदिरं पुर्वाभिमुख आहेत. याशिवाय भगवान विष्णुच्या मंदिराजवळ लक्ष्मीचे तर ब्रह्मदेवाच्या मंदिरा सरस्वतीचे मंदिर आहे. आज या मंदिरांत लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या मूर्ती नाहीत. जावानिज भाषेत ‘जवळ’ या शब्दाला ‘अपित’ म्हणतात. म्हणून या दोन मंदिरांना अपित मंदिरं म्हणतात.
पेरवाड मंदिरं
मुख्य मंदिरांभवती २२० मंदिरांची रचना एक सारखी आहे. या प्रत्येक मंदिराची उंची ४५ फूट आणि लांबी रुंदी २० बाय २० फूट आहे. प्रत्येक मंदिरांत पूर्वी एक एक देवतेच्या मूर्ती होत्या परंतु आता त्यापैकी जवळ जवळ सर्वच मंदिरांचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. कोरीव काम केलेल्या दगडांच्या राशी पाहून मन विषण्ण झाल्या शिवाय रहात नाही. प्रम्बानन मंदिरांच्या भिंतीवर रामायण आणि महाभारत काळातील प्रसंग कोरलेले आहेत. शिव मंदिरांत प्रवेश केल्यापासून ही भित्तिचित्र दिसतात.ती प्रदक्षिणा पूर्ण होई पर्यंत पाहता येतात.शिव आणि ब्रह्मा यांच्या मंदिरांच्या भिंतीवर रामायणातील प्रसंग तर विष्णुच्या मंदिरावरील भिंतींवर कृष्णलीला आणि महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत.
‘रोरो जोंग्गरंग’ कथा
या मंदिराला स्थानिक भाषेत ‘रोरो जोंग्गरंग’ नावानेही ओळखतात.मुख्य मंदिरातील दुर्गा मातेच्या मुर्तीची ‘रोरो जोंग्गरंग’ नावाच्या देवीचे पूजन केले जाते. ‘रोरो जोंग्गरंग’ ही येथील राजकुमारी होती. येथील ९९९ देवतांच्या मुर्तीतील १००० वी मूर्ती ‘रोरो जोंग्गरंग’ हिची आहे.त्यामुळेच आजही तिची पूजा केली जाते.
मंदिरापर्यंत कसे जावे?
मंदिरापासून १७ किमी. अंतरावर ‘योग्यकर्ता’ हे इंडोनेशियातील मोठे नगर आहे. इंडोनेशियातुन येथे येण्यासाठी अतिशय चांगले रस्ते तयार केलेले आहेत. टैक्सी व बसेस सेवा सतत सुरु असते. दरवर्षी सुमारे एक कोटी पेक्षा अधिक पर्यटक हे मंदिर पहायला येथे येतात. त्यामुले जगभरातील प्रमुख शहरातून योग्यकर्ता येथे विमान सेवा उपलब्ध आहे.