इंडिया दर्पण विशेष लेखमाला – परदेशातील सुप्रसिद्ध मंदिरं
कम्बोडियातील ‘नॉम बखेंग ‘ आणि ‘नीक पीन’ मंदिरं!
दक्षिण पूर्व अशियांतील कम्बोडिया हा देश म्हणजे भारतीय लोकांसाठी आश्चर्य आणि कौतुक वाटावा असाच देश आहे. भारताच्या अग्नेय दिशेला ४८०० किमी अंतरावर हा देश आहे. या देशा भोवती ‘थाईलैंड’, ‘लाओस’,’व्हिएत्नाम’ हे देश आणि थाईलैंडची खाड़ी आहे. ‘नॉम पेन्ह’ ही कम्बोडियाची राजधानी आहे. ‘कम्बोडिया’चे कौतुक अशासाठी की, पावणे दोन कोटी लोकसंख्या असलेल्या या देशांत ९३ टक्के जनता बौद्ध धर्मीय आहे ४ टक्के मुस्लिम, दोन टक्के ख्रिश्चन धर्मीय आहेत तर उरलेल्या एक टक्क्यात इतर उरले सुरले धर्मीय आहेत. त्यात अर्थातच हिंदू धर्मियांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे अशा या एक टक्क्या पेक्षाही कमी भारतीय लोक असलेल्या देशांत ४००० पेक्षा जास्त हिंदू मंदिरं आहेत.

मो. ९४२२७६५२२७
परदेशातील भारतीय मंदिरं किंवा हिदू मंदिरांची सर्वाधिक संख्या कम्बोडियात आहे. अंग्कोरवाट या नावाचा जगातला सर्वांत मोठा आणि विशाल हिंदू मंदिरांचा परिसर येथे आहे. ४०२ एकर जागेवर ही मंदिरं बांधण्यात आली आहेत.कम्बोडियात १२ व्या शतकापर्यंत सगळी मंदिरं ब्रह्मा, विष्णु आणि महेश यां हिंदू देवतांचीच मंदिरं होती. बाराव्या शतकाच्या शेवटी येथे बौद्ध धर्माचे प्राबल्य वाढले आणिं ही सर्व मंदिरं बौद्ध स्तुपांत किंवा स्मारकांत परिवर्तित करण्यात आली आहेत.
कम्बोडियातील सीम रिप प्रोविन्स या शहरा जवळच्या डोंगर माथ्यावर ‘नॉम बखेंग’ (Phnom Bakheng) या नावाचे हिंदू बौद्ध मंदिर आहे. राजा यशोवर्मन (इ.स. ८८९ ते ९१०) यांच्या राजवटीत हे मंदिर बांधण्यात आलं. डोंगराच्या सर्वोच्च शिखरावर असलेले हे मंदिर जगप्रसिद्ध ‘टूरिस्ट स्पॉट’ म्हणून प्रसिद्ध झाले .त्याचे कारणही मोठे मजेशीर आहे. या डोंगराच्या पायथ्याशी अंग्कोरवाट या नावाचा जगातला सर्वांत मोठा आणि विशाल हिंदू मंदिरांचा परिसर आहे. जगातील सर्वांत मोठ्या मंदिरामागे होणारा सूर्यास्त पहाण्यासाठी जगभरातील हौशी पर्यटक येथे येतात!! आहे की नाही गंमतीदार योगायोग. सुमारे दीड-दोन कि.मी अंतरावर असलेले अंग्कोर वाटचे मंदिर येथून स्पष्ट पाहता येते. अंग्कोर वाटला वर्षभरात सुमारे १५ लाख पर्यटक भेट देतांत यातील ९५ टक्के पर्यटक नॉम बखेंग (Phnom Bakheng)ला भेट देतात.
‘नॉम बखेंग’ मंदिराचा इतिहास:
आता गंमत का्य ते पहा. नॉम बखेंग (Phnom Bakheng) अंग्कोर वाट मंदिरापेक्षा दोनशे वर्षांनी सीनियर आहे. म्हणजेच नॉम बखेंग (Phnom Bakheng) आधी बांधले गेले. आणि त्याच्या नंतर दोनशे वर्षांनी अंग्कोर वाट मंदिरं बांधण्यात आली. पुढे विश्वप्रसिद्ध झालेल्या अंग्कोर वाट मंदिर समुहातले हे पहिले मंदिर होते असा इतिहास तज्ञांचा दावा आहे. सध्या थायलंड मध्ये असलेल्या स्डोक कॉक थोम या मंदिरांत इ.स. १०५२ चा एक संस्कृत शिलालेख सापडला आहे.त्यावरून इतिहास संशोधकांनी हा अंदाज वर्तविला आहे.
राजा यशोवर्मन याने दक्षिण पूर्वेकड़े असलेली रोलस विभागातली हरिहरालय ही राजधानी सोडून नवीन राजधानी यशोधरापुर येथे स्थापन केली. त्यावेळी नॉम बखेंग (Phnom Bakheng) मंदिरा भोवतीच नवीन राजधानी स्थापन केली. थोडक्यात नॉम बखेंग (Phnom Bakheng) हे खरे मुख्य मंदिर होते. त्या काळचे सगळे लोक या मंदिराचे दर्शन घेउन स्वत;ला भाग्यवान समजायचे.
त्यावेळी अंग्कोर प्रांतात डोंगर माथ्यावर तीन प्राचीन मंदिरं बांधली होती. ही तिन्ही मंदिरं राजा यशोवर्मनच्या कारकिर्दीत बांधली गेली आहेत. यांत नॉम बखेंग (Phnom Bakheng) मंदिराच्या दक्षिणेला तोनले सॅप नावाच्या लेक जवळ ‘नॉमक्रोम’ आणि उत्तर पश्चिमेला ईस्ट बरी अभयारण्याजवळ ‘नॉम बोक’ नावाचे मंदिर डोंगराच्या माथ्यावर आहे.
अनेक वर्षांनंतर नॉम बखेंग (Phnom Bakheng) मंदिराचे बौद्ध मंदिरांत रूपांतर करण्यात आले.ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धांचे दोन मोठ मोठे पुतळे यां मंदिरांवर स्थापन करण्यात आले होते परंतु काळाच्या ओघात ते देखील नष्ट झाले. त्यांचे काही अवशेष मात्र आजही येथे पहायला मिळतात.
ख्मेर साम्राज्याची पहिली राजधानी यशोधरापुर येथील प्रमुख मंदिर होते नॉम बखेंग (Phnom Bakheng). अंग्कोर वाटच्या दोनशे वर्षे अगोदर हे मंदिर बांधले होते. पांच शिखरं आणि चार टॉवर्स असलेलं हे मंदिर त्याकाळी अग्रस्थानी होते. आजही दुपार नंतर येथून दिसणारा अंग्कोर वाटच्या पार्श्वभूमीवर दिसणारा एकमेवाद्वितीय सूर्यास्त पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक येथे येतात.
औषधी गुणधर्माचे ‘नीक पीन मंदिर!’
कम्बोडियात हजार वर्षांपूर्वी हिंदू संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारी अनेक मंदिरं होती. नीक पीन ( Neak Pean) एक लहानसं मंदिर एका कृत्रिम तळ्यात बांधलेलं होतं. आता या मंदिराचे केवळ अवशेष पहायला मिळतात. परन्तु हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण होतं. केवळ दर्शानासाठीच नाही तर आपलं आरोग्य चांगलं व्हावं यासाठी त्याकाळी लोक या मंदिरात यायचे. थोडक्यात काय तर लोकांना आरोग्य संपन्न ठेवण्याचे काम ही मंदिरं करीत होती.
नीक पीन या शब्दाचा अर्थ होतो औषधी गुणधर्म असलेल्या तलावातील मंदिर! कम्बोडियातील हे औषधी गुणधर्म असलेले मंदिर प्रीह खान मंदिराच्या जवळ आहे. आज या मंदिरांत सहजासहजी प्रवेश करता येत नाही. कारण हे मंदिर अतिशय अरुंद आहे.हजार वर्षांपूर्वी ख्मेर संस्कृतीत जनतेच्या आरोग्याची काळजी कशी घेत याचे ‘नीक पीन’ मंदिर उत्कृष्ट उदाहरण आहे.
नीक पीन मंदिर पूर्वी एका एकांतात असलेल्या बेटावर होते. हजार वर्षांनंतर आता या ठिकाणी मंदिराचे पडझड झालेले अवशेष शिल्लक आहेत. सीम रिप जवळ असलेल्या अंग्कोर आर्कियोलोजिकल पार्क च्या तुलनेत नीक पीन फारसे प्रसिद्ध नाही. परंतु तरीही पर्यटकांना नीक पीन मंदिराचे एक आकर्षण वाटते. प्राचीन मध्ययुगीन संस्कृती आणि त्यावेळच्या लोकांची जीवन पद्धती याविषयी उत्सुकता असणारी मंडळी या मंदिराला आवर्जुन भेट देतात.
‘नीक पीन’ मंदिराचा इतिहास:
ख्मेर राजा जयवर्मन सातवा याने ‘ चाम्स ऑफ व्हिएतनाम’ कडून अंग्कोर प्रान्त मुक्त केला आणि अंग्कोर थोम येथे त्याने आपली राजधानी स्थापन केली त्यानेच सर्व प्रथम नीक पीन मंदिर आणि त्यानंतर बायोण मंदिर बांधले. सातवा जयवर्मन महायान बुद्धिझमचा कट्टर चाहता होता. नीक पीन मंदिर हा त्याचा सबळ पुरावा आहे.
ख्मेर साम्राज्यात असे अनेक बेराया Baray म्हणजे कृत्रिम तलाव बांधलेले होते. मंदिराच्या पायाशी नंदा आणि उपनंदा या नावाचे दोन सर्प होते. त्यावर हे मंदिर उभारलेले होते. संस्कृत मध्ये ज्याला नाग म्हणतात त्याचा ख्मेर भाषेत नीक असा उच्चार होतो. महायान बौद्ध संस्कृतीनुसार अन्वतप्त तलावातील पाणी औषधी असते त्यामुले अनेक व्याधींचे हरण होते. अशी श्रद्धा असल्यामुळे ख्मेर साम्राज्यात असे अनेक तलाव होते. काळाच्या ओघात ते सर्व नष्ट झाले.
अन्वतप्त तलावात एक मुख्य तलाव असतो.या तलावाच्या चार दिशांना चार छोटे छोटे तलाव असतात. हे पांच तलाव अग्नी, जल,वायु, आकाश आणि पृथ्वी या पंच तत्वांचे प्रतिक असतात. ही पंच तत्वे घोड्याचे मुख, हत्तीचे मुख, सिंह मुख आणि मानवी मुखांद्वारे दाखविलेली असत. हे सगले तलाव जमिनीखाली एकमेकांना जोडलेले असत. मंदिराच्या पूर्व दिशेला ‘बलाह’ नावाचा अश्व आहे. तो बुद्धाचे प्रतिक असून बेटांवर आयलंडवर अडकलेल्या सैनिकाना तो आपल्या पाठी वरून सुखरूप घेउन जातो अशी श्रद्धा होती. या कृत्रिम तलावांवरून चालण्यासाठी सर्वत्र लाकडी साकव आणि आवरण केलेली असत. नीक पीन मंदिरातील प्रमुख देवतेचे नव होते ‘अवलोकितेश्वर’ बुद्धासारखीच ही मूर्ती होती.
‘नीक पीन’ मंदिराची वैशिष्ट्ये:
नीक पीन मंदिर महायान बौद्ध तत्वज्ञानावर आधारित आहे.
सीम रिप येथे राजा जयवर्धन सातवा याने हे मंदिर ९ व्या शतकात बांधले .
बेयोन स्टाइल ऑफ आर्किटेचर पद्धतीने हे मंदिर बांधलेले आहे.
येथील पाणी औषधी असल्याचे मानले जाते.
वर्षभर कधीही मंदिरात जाता येते.
मंदिरांत प्रवेश घेण्यासाठी पास व ड्रेसकोडआवश्यक.