इंडिया दर्पण विशेष लेखमाला – परदेशातील सुप्रसिद्ध मंदिरे
‘बोत्स्वाना’ येथील ‘श्रीस्वामीनारायण मंदिर’ आणि ‘प्रति बालाजी मंदिर’!
ज्या देशांची नावही आपण कधी ऐकली नाहीत अशा देशांत मोठ मोठ्या जागा विकत घेउन अनेक मंदिरं बांधली आहेत. तिथे देवांच्या मुर्तींची स्थापना केली. परदेशातील भारतीय लोकांना ही मंदिरं आपली वाटतात. आपली मातृभूमी वाटते. आपले माहेर वाटते. परदेशातील भारतीय लोकांनी एकत्र यावं.त्यांना योग्य ती मदत व मार्गदर्शन मिळावं. त्यांचे अध्यात्मिक व वैयक्तिक प्रश्न सोडविण्याचे ,त्यांना धीर आधार देण्याचे अतिशय मोलाचे कार्य ही मंदिरं करतात.
आफ्रिका खंडात बोत्स्वाना नावाचा एक अतिशय लहान देश आहे.अवघी 23 लाख लोकसंख्या असलेल्या या देशांत भारतीय लोकांची संख्या ३५०० पेक्षाही कमी आहे. आफ्रिका खंडात दक्षिण आफ्रिका, नामीबिया आणि झिम्बाब्वे या देशांच्या मधोमध बोत्स्वाना हा प्रजासत्ताक देश आहे. बोत्स्वानाचा ७० टक्के भाग कलहारी नावाच्या वाळवंटाने व्यापलेला आहे.
आपल्या प्रमाणेच या देशावर इंग्रजाचे राज्य होते. १९६५ साली बोत्स्वाना स्वतंत्र झाला त्यापूर्वी वर्षभर आधी गॅबोरोने ही या देशाची राजधानी झाली. अशा या भारतापासून हजारो किमी दूर असलेल्या बोत्स्वाना येथील हिंदू मंदिरांची माहिती आपण घेणार आहोत.
गॅबोरोने ही बोत्स्वानाची अधिकृत राजधानी झाल्यानंतर या शहराचा विकास सुरु झाला. त्यानंतर ३५ वर्षांनी येथे भारतीय लोक येऊ लागले. बोत्स्वानात ७० टक्के जनता खिश्चंन धर्मीय आहे. भारतीय लोकांची संख्या तर आजही ०.३% पेक्षाही कमी आहे असे असताना गॅबोरोने मध्ये अतिशय विशाल, भव्य आणि देखणी अशी पाच हिंदू मंदिरं आहेत.
१) ISKCON चे कृष्ण बलराम मंदिर
इस्कॉन या आंतरराष्ट्रीय संस्थेने गॅबोरोने येथे कृष्ण बलराम मंदिर स्थापन केले आहे. गॅबोरोनेच्या पश्चिम भागांत बाओबाब प्रायमरी स्कुल समोरच ऑरेंज आणि मरून रंगाचे कृष्ण बलराम मंदिर सर्वांचे लक्ष्य वेधून घेते. मंदिर आतून व बाहेरून शोभिवंत आहे. सुंदर नक्षीदार कमानी, खांब आणि भिंतीवर अनेक धार्मिक प्रसंग आणि देव देवता व भक्तांच्या सुबक मूर्ती कोरलेल्या आहेत. बोत्स्वाना प्रमाणेच आसपासच्या देशांतील लोकही औत्सुक्याने हे मंदिर पहायला येतात आणि येथील भारतीय वास्तुकला, शिल्पकला आणि संस्कृतीचे प्रतिक असलेले हे मंदिर पाहून चकित होतात.
२) गॅबोरोने येथील’ हिंदू हॉल’
गॅबोरोने येथील ‘हिंदू हॉल’ या नावाने प्रसिद्ध असलेला एक सुंदर मंदिर समूह आहे. गॅबोरोनेच्या ‘काल्टेक्स फिलिंग स्टेशन’च्या मागे ‘मारू-ए-पुला’ (ट्राफिक लाईट) जवळ ‘हिंदू हॉल’ याच नावाचे एक मंदिर आहे. येथे वर्षभर सर्व भारतीय उत्सव विशेषत: महाशिवरात्र, रामनवमी, दसरा, दिवाळी हे सण हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरे केले जातात.
हिंदू हॉलच्या प्रवेशद्वारा जवळच अतिशय सुंदर व सुबक नवग्रह मंदिर आहे.येथे नऊ ग्रहांच्या आकर्षक मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. या मंदिराला लागूनच भगवान शिवांचे मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग अतिशय आकर्षक आहे. शिवलिंगा भोवती माता पार्वती, श्री गणेश आणि सुब्रमण्यम यांच्या आकर्षक प्रतिमा आहेत.
मंदिराच्या आतल्या भिंतीवरही भगवान शिव आपल्या कुटुंबियांसह बसलेले आहेत. यांत भगवान शिवाच्या मांडीवर, माता पार्वती, बाल गणेश आणि बाल स्वरूपातील सुब्रमण्यम यांच्या आकर्षक कोरीव मूर्ती आहेत. मुख्य शिवलिंगा समोर शिवाचे वाहन नंदी महाराज बसलेले आहेत.
या मंदिरा मागे एक प्रशस्त सभागृह आहे याच सभागृहावरून या मंदिराला ‘हिंदू हॉल’ असे म्हणतात. येथे विवाह समारंभ, वाढदिवस ,रौप्य महोत्सव तसेच इतर अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात.सभागृहाच्या दर्शनी स्टेजवर श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान तसेच भगवान शंकर यांच्या आकर्षक मूर्ती आहेत. बोत्स्वाना येथील भारतीय कुटुंबियांना एकत्र आणण्याचे त्यांना मदत व मार्गदर्शन करण्याचे महत्वाचे कार्य या सभागृहात केले जाते.
३) श्री बालाजी मंदिर
गॅबोरोने येथील ‘बोत्स्वाना हिंदू चॅरिटी ट्रस्ट’ने स्थापन केलेले श्री बालाजी मंदिर म्हणजे द्रविड़ीयन वास्तुकला व शिल्पकला यांचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. अशा प्रकारचे हे दक्षिण आफ्रिकेतील एकमेव मंदिर आहे. या मंदिराची शिल्पकला व वास्तुकला पूर्णपणे दक्षिण भारतीय द्रविड़ी प्रकारची आहे. येथे आल्यावर जणू दक्षिण भारतात आल्यासारखे वाटते. तिरुपति बालाजीची प्रतिकृती असलेले हे मंदिर भारतीय संस्कृतीच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे.हे मंदिर निर्माण करण्यासाठी सुमारे दोन कोटी रूपये खर्च आला आहे.
या मंदिराला दहा गर्भगृह आहेत. यात बालाजी, श्री देवी, भूदेवी यांच्या प्रमुख मूर्ती तसेच श्री गणेश, श्री अन्जनेय (हनुमान), भगवान शिव,माता पार्वती, माता वैष्णोदेवी अयप्पा, मुरुगन यांच्या आकर्षक मूर्ती तसेच नवग्रहयांची स्वतंत्र मंदिरं आहेत.
येथील नवग्रह व देवतांच्या सर्व मूर्ती भारतातून तयार करून आयात केल्या आहेत. महामंडपाचे प्रवेशव्दार आणि राजा गोपुरम हे केरळ मधून आयात केले आहे. महामंडपाच्या प्रवेशव्दारावर श्रीकृष्ण लीला तर राजा गोपुरम वर ‘ दश अवतार ‘चित्रित केले आहेत.
४) श्री स्वामीनारायण मंदिर गॅबोरोने
बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची आध्यात्मिक व सामाजिक हिंदू संस्था आहे.
भगवान स्वामीनारायण (१७८१-१८३०) यांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस देशात मोठ मोठी मंदिरं स्थापन करण्यास सुरुवात केली. इ.स.१९०७ मध्ये शास्त्रीजी महाराज (१८६५-१९५१) यांनी संस्थेची अधिकृत नोंदणी करून देशा बाहेर स्वामीनारायण मंदिरं बांधान्यास सुरुवात केली. रोजच्या जीवनातील प्रत्यक्ष आध्यात्मावर संस्थेचा भर असतो.जगभरातील अध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी बळ देण्याचे महत्वाचे कार्य ही संस्था करते.
जगभरात BAPS ची ३३०० मंदिरं आहेत. ज्या देशांची नावही आपण कधी ऐकली नाहीत अशा देशांत मोठ मोठ्या जागा विकत घेउन ही मंदिरं बांधली. तिथे देवांच्या मुर्तींची स्थापना केली परदेशातील भारतीय लोकांना ही मंदिरं आपली वाटतात. आपली मातृभूमी वाटते. आपले माहेर वाटते. परदेशातील भारतीय लोकांनी एकत्र यावं.त्यांना योग्य ती मदत व मार्गदर्शन मिळावं. त्यांचे अध्यात्मिक व वैयक्तिक प्रश्न सोडविण्याचे ,त्यांना धीर आधार देण्याचे अतिशय मोलाचे कार्य ही मंदिरं करतात.
नित्यपूजा ,प्रार्थना या तर महत्वाच्या आहेतच पण जगाच्या पाठीवर जिथे आपली माणसं ,आपली संस्कृति , धर्म वेगळे आहेत तिथं ही मंदिरं तेथे राहणार्या भारतीय लोकांना मोठा आधार देतात. खर्या अर्थाने ते आपल्या देशाचे दूत म्हणून कार्य करतात.
जगभरातील अशी मंदिरं स्थापन करणारांचे आणि त्याचे व्यवस्थापन करणारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.