इंडिया दर्पण विशेष लेखमाला – परदेशातील सुप्रसिद्ध भारतीय मंदिरे
फ्रेंचांनी पुनर्निर्माण केलेले प्राचिन शिव-विष्णू मंदिर!
थोम्मानोन : हिंदू- कम्बोडियन संस्कृतीचा शिल्पाविष्कार
कम्बोडियातील ‘अंग्कोर वाट’ मंदिर समुहातील प्रत्येक मंदिर वैशिष्ट्येपूर्ण आहे. एक टक्का हिंदू लोकसंख्या असलेल्या या देशांत ४००० पेक्षा अधिक हिंदू मंदिरं आहेत. यातील प्रत्येक मंदिर अतिशय भव्य कलात्मक आणि दुसर्या मंदिरांपेक्षा विभिन्न आहेत. थोम्मानोन Thommanon नावाचे मंदिरही याला अपवाद नाही. सुर्यवर्मा व्दितीय (इ.स. १११३ ते ११५०) हा राजा असतांना थोम्मानोन Thommanon मंदिर बांधण्यात आले. या मंदिराचे मूळ नाव ‘धम्मानंद’ असे होते.पाली भाषेतील हा शब्द आहे. पुढे त्याचे थोम्मानोन Thommanon असे नामकरण झाले असावे असा तज्ञांचा अंदाज आहे.
कुठे आहे हे मंदिर
कम्बोडियातील जगप्रसिद्ध अंग्कोर थोम’ मंदिर समुहाच्या पूर्वेला ‘गेट ऑफ व्हिक्टरी’ म्हणजे युद्धातील विजयाचे प्रतिक असलेल्या प्रवेशव्दारा जवळ आणि सुप्रसिद्ध चाऊ से तेवोड़ा मंदिराच्या उत्तरेला ‘थोम्मानोन’ हे मंदिर आहे.
इ.स. १९९२ मध्ये अंग्कोर वाट मंदिरांच्या सोबतच यूनेस्कोने थोम्मानोन मंदिरालाही ‘यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट’ म्हणून जाहिर केले. सुर्यवर्मा व्दितीय याने थोम्मानोन हे मंदिर भगवान शंकर आणि भगवान विष्णु यांचे साठीच बांधले होते. कालांतराने कम्बोडियात बौद्ध धर्माचे प्राबल्य वाढल्यावर येथील अनेक मंदिरांत बुद्धाच्या मुर्तींची स्थापना करण्यात आलेली दिसते.
मंदिराचा इतिहास
आजपासून हजार बाराशे वर्षांपूर्वी भारतापासून सुमारे पाच हजार किमी अंतरावर असलेल्या कम्बोडियात बांधण्यात आलेल्या शिव आणि विष्णु मंदिराचा इतिहास मनोरंजक आहे. पुरातत्वक्षेत्रातील विद्वानांच्या दृष्टीने ही मंदिरे म्हणजे आव्हानच आहेत. या मंदिरातील अप्सरा आणि स्त्री देवता यांच्या मुर्तींवरून ‘थोम्मानोन’ मंदिर अंग्कोर वाट मंदिर समूह बांधला त्याच काळात बांधले असावे असे काही विद्वान म्हणतात तर दुसरे काही विद्वान् याच देवतांच्या मूर्ती वरून ‘थोम्मानोन’ मंदिर इ.स. १०८० ते १११३ या कालावधीत म्हणजेच अंग्कोर वाट पेक्षा अगोदर बांधले असावे असा अंदाज व्यक्त करतात. अर्थात हे मंदिर अंग्कोर वाट बांधले त्याच वेळी म्हणजेच इ.स. १११३ ते ११५० या काळात राजा सूर्यवर्मा दूसरा यानेच बांधले असावे यावर अनेक विद्वानांचे एकमत झाले आहे.त्यांचे हे अनुमान अधिक योग्य वाटते. याचे महत्वाचे कारण म्हणजे राजा जयवर्मा दूसरा आणि त्याचा पुत्र राजा जयवर्मा तिसरा यांच्या शासनकालात कम्बोडियात वैष्णव धर्म भरभराटीला आलेला होता.
त्यानंतर या वैष्णव मंदिरांत शैव संस्कृतीचा समावेश करण्यात आला याचा पुरावा देणारे अनेक शिलालेख कम्बोडियातच सापडले आहेत. ‘थोम्मानोन’ मंदिरा प्रमाणेच ‘बेंग मिर्ली’, चाऊ से तेवड़ा’, बांते सामरे’ आणि अंग्कोर वाट ‘ या मंदिरांतही वैष्णव आणि शैव संस्कृतींचे मिलन झालेले दिसते. या सर्व मंदिरांत भगवान विष्णु आणि भगवान शिव यांच्या मूर्ती आजही पहायला मिळतात. ‘थोम्मानोन’ मंदिर चाऊ से तेवोड़ा मंदिराच्या अगदी समोर विजय प्रवेशव्दारा पासून फक्त ५०० मीटर्स अंतरावर आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे इ.स. १९६० साली फ्रेंच आर्किऑलॉजिस्टच्या टिमने या मंदिराचे पुर्निर्माण केले.
कसे आहे मंदिर?
‘थोम्मानोन’ हे एकच विशाल घुमट असलेले पुर्वाभिमुख मंदिर आहे. पूर्वेकडील गोपुरातुन या मंदिरातील मुख्य मंडपात प्रवेश केला जातो. तेथून मध्यवर्ती गाभार्यात जाता येते. हे संपूर्ण मंदिर पायापासून कळसा पर्यंत अतिशय बारीक़ सारिक शिल्पाकृतींनी घडविलेले आहे आणि त्याचे जतनही अतिशय चांगल्या प्रकारे केलेले आहे. ‘अंग्कोर वाट’ आणि ‘चाऊ से तेवोड़ा’ मंदिराप्रमाणेच ‘थोम्मानोन’ मंदिरावरही अतिशय सुंदर शिल्पं पहायला मिळतात. हे मंदिर चाऊ से तेवोड़ा मंदिरा पेक्षाही अधिक चांगल्या स्थितीत आहे. याचे कारण म्हणजे या मंदिरांत लाकडाचा वापर जवळ जवळ केलेलाच नाही. संपूर्ण मंदिर दगडी शिल्पातच तयार केलेलं आहे.
मंदिरा भोवतीच्या संरक्षक भिंती आता पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत.पूर्व आणि पश्चिमेची वेशींसारखी प्रवेशव्दारं मात्र अजूनही तग धरून आहेत. ‘थोम्मानोन’ मंदिरातील देवतांच्या मुर्तीनी अनामिका आणि मधलं बोट यांच्यात अंगठ्याने फुलं धरलेली आहेत. याला देवता मुद्रा म्हणतात. अशाच प्रकारच्या देवता मुद्रा अंग्कोर वाट मंदिरातील देवतांनी धारण केलेल्या दिसतात.यावरून ही दोन्ही मंदिरं एकाच कालखंडात बांधली असावी असा अंदाज विद्वान् व्यक्त करतात. अंग्कोर वाट किंवा चाऊ से तेवोड़ा मंदिराच्या तुलनेत ‘थोम्मानोन’ मंदिर लहान आहे. परंतु शिल्पकलेच्या दृष्टीने मात्र हे मंदिर इतर सर्व मंदिरापेक्षा सरस आहे. त्यामुळेच दर वर्षी पंधरा लाखांपेक्षा अधिक पर्यटक ‘थोम्मानोन’ मंदिराला भेट देतात.