महाराष्ट्र म्हणजे दुर्गांचा देश. महाराष्ट्राची भूराजकीय जडणघडण झाली आहे ती या गड-किल्ल्यांमुळेच. सर्व प्रकारचे आणि रचनेचे दुर्ग आपल्याला महाराष्ट्रात मुख्य सह्याद्री डोंगररांग, उर्वरीत प्रदेश तसंच समुद्रातही बघायला मिळतात. काही प्रमुख किल्ले सोडले तर आडवाटेवरील अनेक दुर्गांच्या नशिबी उपेक्षा आलेली आहे. कालौघात अनेक किल्ल्यांवरील गडावशेष नष्ट झालेले दिसतात. उत्साहाने किल्ला बघण्यासाठी गेलेल्या जिज्ञासुंच्या नजरेस येतात ती पडकी प्रवेशद्वारं, ढासळलेली तटबंदी, उध्वस्त इमारतींचे उरलेले जोते वगैरे वगैरे… पण त्यातही किल्ला म्हणून बघावे असे काही शिलेदार आजही गतवैभवाची साक्ष देत मानाने उभे आहेत. एक परिपूर्ण किल्ला म्हणून बघावा असा अजिंठा रांगेतील वेताळवाडी किल्ला त्याच्या भेटीस येणार्या प्रत्येकाला तृप्त करतो.
वेताळगडाला जाण्यासाठी नाशिकहून चाळीसगाव – पाचोरा – सोयगाव – वेताळवाडी असा जवळचा मार्ग आहे. पाचोरा ते सोयगाव ३५ कि.मी. अंतर आहे तर सोयगाव ते वेताळवाडी ६ कि.मी. येतं. तसंच औरंगाबादहून सिल्लोड – गोळेगाव – उंडणगाव – हळदा घाट – वेताळवाडी असाही रस्ता आहे. सोयगावकडून वर सिल्लोडकडे चढणार्या हळद्या घाटात वेताळगड आडवा येतो. गडाच्या उत्तरेकडील पायथ्याला वेताळवाडी हे गाव वसलेलं आहे.
गावातली जवळपास सर्वच घरं मुस्लीम बांधवांची. शेती हे त्यांच्या उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन. गावातील सर्व लोक अतिशय आतिथ्यशील आहेत. वेताळवाडीला बैतुलवाडी असंही म्हणलं जातं. गावाच्या भोवताली असलेले डोंगर ‘पायथा ते माथा’ वृक्षाच्छादित आहेत. वेताळवाडीच्या उत्तर बाजूस रूद्रेश्वर नामक अपरिचित लेणी आहेत. मुख्य अजिंठा लेणीच्या जवळ असलेली रूद्रेश्वर ही हिंदू लेणी अपूर्ण आणि अनालंकृत असली तरी अजिंठा लेणीच्या अगोदर खोदली गेली असल्यांचं अभ्यासातून दिसून आलं आहे. इथे प्रमुख लेण्यात शिवपिंड, नंदी, गणपती, देवी तसंच सप्तमातृका अशा कोरीव मुर्ती आहेत. वर्षा ऋतूत या लेणीमुखाशी असलेल्या तलावात वरच्या कड्यावरून नयनरम्य धबाबा कोसळत असतो. वेताळवाडीला येणार्या प्रत्येकाने रूद्रेश्वर भेट द्यायला हवी.
वेताळवाडी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी चढाईवाट आहे. या वाटेने किल्ल्यावर चढण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो. वेताळवाडी गावातून जाणारा गाडीरस्ता हळद्या घाटातून वर हळदा गावात जातो. या हळद्या घाटाच्या मध्यभागी गाडी लावून वेताळगडाच्या दक्षिणेकडून सरळ प्रवेश मिळवता येतो. सलग अशा अभेद्य तटबंदीचे दोन तीन पदर दाखवत वेताळगड आपल्याला त्याच्या कवेत घेतो. किल्ल्याच्या दक्षिण महाद्वारातून दोन वळणं घेत आपल्याला प्रवेश मिळतो. या महाद्वारावर दोन शरभ कोरलेले आहेत. एका शरभाच्या पायाखाली चक्राकृती दिसते.
महाद्वाराच्या दोन्ही बुरूजांत खोली असून त्यातून बुरूजावर जाण्यासाठी जीना केलेला आहे. बुरूजातील खोल्यांवर जाणारी ही रचना बघण्यासारखी आहे. महाद्वारात होणार्या हालचाली लांबून दिसू नये म्हणून महाद्वाराच्या तोंडाशी आडवी अशी आखूड भिंत उभी केलेली दिसते. ह्या भिंतीला ‘जिभली’ म्हटलं जातं. अगदी उत्तम अवस्थेत असणार्या या महाद्वारापासून सुरू होणारी तटबंदी अनेक बुरुजांसकट संपूर्ण किल्ल्याभोवती फिरवलेली आहे. ह्या तटबंदीवरून सलग चालत किल्ल्याला प्रदक्षिणा करता येते पण तत्पुर्वी आपण गडमाथ्याकडे जावून येऊ आणि पलिकडच्या म्हणजेच उत्तर बाजूने उतरत तटबंदी वरून गडफेरी पूर्ण करूया.
तसं पाहिलं तर महाद्वार हे किल्ल्याच्या मधल्या टप्प्यावरील माचीवर येतं. त्यापासून दक्षिण अंगानेच थोडं वर चढत गडमाथा गाठावा लागतो. गडमाथ्याकडे जातांना वाटेत एक गुहेसारखं खांब टाकं दिसतं. वेताळवाडी किल्ल्याचा माथा तसा सलग, सपाट आणि विस्तृत आहे. माथ्यावरही सलग तटबंदी आणि बुरूजांची मालिका दिसून येते. माथ्यावरून उत्तर टोकाकडे जाताना अनेक वास्तू दिसून येतात. काही उद्धवस्त तर काही अगदी सुस्थितीत.
साधारण मध्यावर धान्य कोठार आहे. थोडी सफाई केली तर आजही उपयोगात येऊ शकतं इतक्या चांगल्या अवस्थेत आहे. धान्य कोठाराच्या अंगणातच एका बाजूला तुपाचं टाकं आहे. अरूंद तोंड पण आंत माठासारखा गोलाकार अशा रचनेचं तुपाचं टाकं अन्य कुठे बघावयास मिळत नाही. धान्य कोठाराला लागून दोन तीन उद्धवस्त वास्तू दिसतात. पुढे एक मोठ्या आकाराचा तलाव आहे. बांधीव भिंत टाकून तयार केलेल्या या तलावात मोठा जलसाठा उपलब्ध आहे.
एवढा अलंकृत किल्ला असल्यावर त्यावर शिबंदीही तेवढ्याच प्रमाणावर असावी. त्या शिबंदीसाठी हा तलाव अतिशय उपयोगी पडत असावा. तलावाच्या समोर तीन बाजूंनी भिंत आणि छत नसलेली वास्तू दिसते. वर असलेले छोटे मिनार आणि भिंतीतील कमानाकृती कोनाडे यावरून ही नमाजगीर असावी. नमाजगीर पासून उत्तरेकडे जातांना उंच पाया असलेली एक छान वास्तू दिसते. पुढे माथ्याच्या टोकावर वेताळवाडी किल्ल्याची सर्वात देखणी वास्तू आहे ती म्हणजे ‘बारादरी’.
अनेक कमानी असलेली ही बारादरी बघण्यासारखी आहे. बारादरीत उभं राहून सर्वदूरचा परिसर न्याहाळता येतो. पायथ्याच्या वेताळवाडी गावापासून ते थेट सोयगावपर्यंत सर्व परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. जरंडी जलाशयासहीत गौताळा अभयारण्याचा परिसर आणि अजिंठारांगेतील गिरीशिखरं दिसतात. पलिकडून जंजाळ्याचा किल्ला उर्फ वैशागड भेटीसाठी खुणावत असतो. बारादरीत म्हणजेच या हवामहालात चहू बाजुंनी मस्त हवा येते. ही हवा खाऊन थोडं खालच्या बाजूला मधल्या माचीच्या उत्तर बाजूला उतरायचं.
या मधल्या टप्प्यात एक तोफ आहे. आजही उत्तम अवस्थेत असलेली ही तोफ वेताळगडाचं भूषण आहे. या तोफेवर असलेली चक्राकृती दक्षिण महाद्वारावरील शरभाच्या पायाखाली असलेल्या चक्राकृतीशी साम्य दर्शविते. तोफेच्या समोर एक प्रवेशद्वार आहे. या द्वारातून बाहेर गेल्यावर उजव्याबाजूला मजबूत तटबंदी आणि त्यात खोलगट भागातून काढलेला एक गुप्त दरवाजा आहे. या दरवाजातून बाहेर निघाल्यावर भुयारी रचना दिसते पण ती बंद झालेली आहे. पुन्हा वर येत तोफेच्या समोरील दरवाजातून डावीकडे जायचं. तिथे सलग ओळीने तयार केलेल्या देवड्या आहेत. या देवड्यांवर गोलाकार चर्या दिसतात.
देवड्यांच्या रचनेतून पुढे असलेल्या द्वारातून बाहेर निघण्यासाठी मार्ग आहे. हे वेताळवाडीचं उत्तर महाद्वार आहे. दणकट, भक्कम, अभेद्य अशी विशेषणं या महाद्वाराला द्यावीशी वाटतात. या महाद्वाराच्या एका बुरूजावर समोरासमोर तोंड केलेले शरभ आणि त्या शरभांकडे बघणारे दुतोंडे गंडभेरूंड शिल्प कोरलेले आहे. महाद्वाराच्या भक्कम बुरूजांवर जाण्यासाठी मार्ग आहे. वेताळवाडी गावातून जर चढाई केली तर या महाद्वारातून आपल्याला किल्ल्यात प्रवेश मिळतो. किल्ल्याच्या उत्तर भागातली हे स्थापत्य बघून आपण खाली वेताळवाडीत उतरू शकतो किंवा पुन्हा तोफेकडे येवून मधल्या माचीच्या तटबंदी मार्गावरून दक्षिण महाद्वारातून घाटात पार्क केलेल्या गाडीकडे येवू शकतो.
तटबंदीतील जवळपास प्रत्येक बुरूजातून देखरेखीसाठी सज्जा बाहेर काढण्यात आलेला आहे. काही बुरूजांत गोलाकार तर काही ठिकाणी चौकोनाकृती आकाराचे हे सज्जे वेताळगडाच्या वैशिष्ट्यांपैकी एक. संपूर्ण किल्ल्याभोवती फिरवलेली अभेद्य तटबंदी, दणकट बुरूज, भक्कम महाद्वारं, उपद्वारं, तोफ, जलव्यवस्था, बारादरी, वाडे, धान्यकोठार, तुपाचं टाकं अशा सर्व गोष्टी वेताळगडाला परिपूर्ण किल्ला बनवितात. अर्थातच वेताळगडाची भेट त्यामुळेच एक परिपूर्ण गडयात्रा ठरते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!