अस्पर्शित आणि पिटूकला लोंझा किल्ला
गौताळा अभयारण्याच्या गर्द छायेत विसावलेल्या अंतुर किल्ल्याच्या प्रभावळीमध्ये एक पिटूकला अस्पर्शित असा ‘लोंझा’ किल्ला काही वर्षापूर्वीच प्रकाशझोतात आला आहे. नाशिकमधील हेमंत पोखरणकर आणि ठाण्यातील राजन महाजन या अभ्यासू गिर्यारोहकांना मराठवाडय़ातील अंतुर किल्ल्याच्या माहितीसाठी मध्यंतरी ‘गुगल’वरुन ‘सॅटेलाईट’ नकाशा बघत असताना अंतुरच्या पश्चिमेला, अजिंठा – सातमाळ डोंगररांगेपासून सुटावलेल्या एका गोलाकार डोंगरावर आयताकृती टाक्यांसदृश्य काही आकृत्या आढळल्या. या आकृत्या काय असाव्यात या कुतूहलातून, त्याचा पाठपुरावा सुरु झाला आणि एका या नव्या किल्ल्याचाच शोध लागला. या गिर्यारोहक मित्रांनी अधिक संशोधन करून ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’, ‘गिरिमित्र संमेलन’ आणि ‘एशियाटिक सोसायटी जर्नल’ मध्ये शोधनिबंध प्रसिद्ध करून याला अधिकृत मान्यता प्राप्त करून दिली. या किल्ल्याचं नांव आहे ‘लोंझा’…
अजिंठा पर्वतरांग कण्हेरगड, अंतुर, सुतोंडा, वेताळवाडी, वैशागड अशा दिग्गज किल्ल्यांना डौलाने मिरवते तर पितळखोरा, रूद्रेश्वर, घटोत्कच आणि अजिंठा अशा लेणी लेवून नटलेली आहे. चाळीसगावहून औट्रमघाट मार्गे गौताळा अभयारण्याच्या अलिकडे, अंतूर किल्ल्याला लागून असलेल्या सलग अशा पठाराच्या खालच्या बाजूला छोटा आणि टूमदार दुर्ग लोंझा उभा आहे.
लोंझा गाठण्यासाठी चाळीसगांव- सिल्लोड रस्त्यावरील नागद गाव गाठायचं. नागदहून बनोटी गावाच्या रस्त्याला लागताच अगदी एक कि.मी. अंतरावर ‘शंभू ध्यान योग आश्रम – महादेव टाका’ असा बोर्ड दिसतो तिथून वळायचं आणि सहा-सात कि.मी. अंतरावर या लोंझा किल्ल्याच्या पायथ्याला वाहन पार्क करायचं. या संपूर्ण परिसरात ‘किल्ला’ किंवा ‘लोंझा किल्ला’ कुणालाही माहिती नाही. तिथे चौकशी करतांना ‘महादेव टाका’ या नावानेच विचारणा करावी. कारण, स्थानिकांच्या भाषेतला महादेवटाका म्हणजेच लोंझा किल्ला. नासिक – चाळीसगांव (व्हाया मालेगांव) – कजगाव – नागद – महादेव टाका डोंगर असे हे अंतर १९१ किलोमीटर आहे.
अजिंठा रांगेत भ्रमण करण्यासाठी वर्षा ऋतू सर्वांत योग्य. गाडीतून खाली उतरताच आपण अतिशय शांत आणि गर्द झाडोऱ्याने अच्छादित अशा अस्पर्शित ठिकाणी आलो आहोत असा फिल मिळतो. समोर डोंगराककडे बघितलं तर लोंझा एकदम पिटूकला आहे. लोंझा किल्ल्याचा अर्धगोलाकृती आकार आणि त्यावरची झाडी पाहून सुतोंडा, दुंधा आदि किल्ल्यांची आठवण येते. सॅटेलाईट नकाशातील समुद्रसपाटीपासून उंची अंदाजे ४८५ मीटर तर पायथ्यापासून अंदाजे ८५ मीटर! कुर्मगतीने रमत गमत चढलो तरी पंधरा-वीस मिनिटांत गडमाथा गाठू शकतो.
मागच्या मुख्य डोंगररांगेतून पुढे आलेली सोंड व महादेव टाक्याचा डोंगर यांच्या खिंडीतून वर जायला सिमेंटच्या पायऱ्यांचा सोपा सोपान आहे. या पायऱ्या संपतात तिथे पूर्वीच्या खोदीव पायऱ्यांचे अवशेष दिसतात. नजीकच्या काळात याही सिमेंटने झाकल्या गेल्या आहेत. पुढे प्रवेशद्वाराच्या जोत्याचे दगडही दिसतात त्यावरून डोंगर नसून एक किल्लाच असल्याची खात्री होते. या पडक्या जोत्यावरून हे प्रवेशद्वार किती सुंदर असेल याची कल्पना करत पुढे सरकावं. इटुकला लोंझा किल्ला आता त्याच्या जवळचा पाणीसाठा, कोरीव गुफांचा अविष्कार दाखवणार असतो.
समोरच वरच्या अंगाला डावीकडे, आतून लालसर रंग असलेले, लेणे खोदलेले आहे. त्यात अगदी असष्ट असं नक्षीकाम आणि कोरीव काम आहे. अभ्यासकांच्या मते ते हिनयान काळातील लेणं आहे! किल्ल्याबरोबरच एक लेणंही उजेडात येतं. पश्चिमेसच थोडे खाली, ४० फूट रुंद, रुंद ३८ फूट लांब आणि ६ फूट उंच अशी प्रशस्त गुहा आहे. सध्या तिथे एक बाबाजी वास्तव्यास आहेत. गुहेत अलीकडच्या काळातील शिवलिंग आहे. श्रावणात आणि महाशिवरात्रीला या महादेवाच्या दर्शनासाठी डोंगरावर गर्दी असते.
या गुहेच्या मध्यभागी ४ खांब आहेत. गुहेचा प्रवेशमार्ग कातळ खोदून कल्पकतेने तयार केलाय. या गुहेच्या डावीकडे, ५ खांब असलेले आणखी एक टाके आहे. आत उतरण्यास चार पायऱ्या आहेत. सध्या डोंगरावर पिण्यालायक पाण्याचा हा एकमेव साठा आहे. अभ्यासकांच्या मते हेही पूर्वी लेणे असावे. या टाक्याच्या डावीकडे, काही अंतरावर १ टाके आहे. पुढे असेच प्रचंड आकाराचे (९८ फूट रुंद, ११फूट लांब आणि २ फूट उंच) पण अर्धवट खोदलेले खांबटाके आहे. त्यातील कोरीव खांब स्पष्ट नजरेस पडतात.
वायव्येकडील नागदच्या बाजूस जवळपास ४५ खोदीव पायऱ्या आहेत. या पायऱ्यांलगत एका देवीच्या मूर्तीची स्थापना केलेली आढळते. पण ती अलिकडील असावी. पूर्वेला एक खांबटाके आहे. सध्या ते मातीने बुजलेले आहे. दक्षिणेला व नऋत्येला तब्बल १० टाक्यांचा समूह आहे. पैकी एक खांब टाके आहे. या समुहातील सर्वात मोठ्या टाक्याची रुंदी ५८ फूट तर लहान टाक्याची रुंदी २० फूट आहे. दोन दक्षिणोत्तर आणि इतर पूर्व-पश्चिम पसरलेली आहेत. माथ्यापासून थोड्या खालच्या भागात किल्ल्याच्या परीघावर पसरलेले हे टाक्यांचे जंजाळ पाहून वर गडमाथ्याकडे चाल करायची.
माथ्यावर जाताना दक्षिण बाजूस जोत्यांचे अवशेष दिसतात. यामध्ये एक जोतं मोठय़ा वाडय़ाचे आहे. वाडय़ाच्या कोपऱ्याकडील दगडाच्या भिंती अजूनही तग धरुन आहेत. या साऱ्याच कधीकाळच्या गडकोटाच्या खुणा! येथेच एका पीराची स्थापना केलेली आहे. पीराच्या स्थानामुळे याला पीरबर्डी असेदेखील म्हणतात. बर्डी म्हणजे छोटा डोंगर. या माथ्यावरच अलिकडे स्थापन केलेली हनुमानाची मूर्तीही दिसते. माथ्यावरुन पूर्वेस अंतुर, दक्षिणेस अजिंठा डोंगररांग, उत्तरेस नागद परिसर तर पश्चिमेला वडगांव धरणाचा विहंगम परिसर दिसतो.
टाकीसमुहापासून खालच्या टप्प्यावर पूर्व बाजूपासून पश्चिमेपर्यंत सलग तटबंदीचे अवशेष दिसतात. तटाचा बराचसा भाग मातीमुळे झाकला गेला आहे. दक्षिण बाजूस तटात उपद्वाराचे (चोरदरवाजा) बांधकाम आढळते. तटबंदीचा दगड घडीव आहे. तटबंदीचे अवशेष, दरवाजे, खोदीव पायरी मार्ग, टाक्या, खोदीव लेण्या, शिबंदीच्या घरे-वाडय़ाची जोती या साऱ्या गोष्टींवरून हा किल्ला तर नक्कीच होता. हे बांधकाम पाहता ते मुस्लिमपूर्व राजवटीतील आहे हेही नक्की. मग हा किल्ला कुठला, त्याचा इतिहास काय? असा प्रश्न आपल्याला पडतो.
या परिसरातील लोक या डोंगराला ‘महादेव टाका’ या नांवानेच ओळखतात. इथला पत्रव्यवहाराचा पत्ता विचारल्यावर – लोंझा शिवार- नागद, ता. कन्नड जि. औरंगाबाद, असा पत्ता मिळाला. आणि हाच पत्ता दुर्गाचे नांव निश्चित करण्यास सहाय्यभूत ठरतो. ‘औरंगाबाद गॅझेटीअर’मध्ये या दुर्गाचा ‘लोंघा’ असा नाममात्र उल्लेख आहे आणि गावांच्या यादीत ‘लोंझा’ असे नाव आहे. लोंझा किल्ला इतिहासाच्या बाबतीत थेट काही बोलत नाही परंतु नजीक असलेल्या नागद गावाचा इतिहास थोडाफार बोलतो. नागद गावात इ.स. 655 चा ताम्रपट मिळालेला आहे. यावरून सेंद्रक नृपती निकुंभाल्लशक्ती याने पुण्य मिळविम्यासाठी ब्राह्मणास गाव दान देण्याचा उल्लेख आहे. त्यानंतर कलचुरी (हैहय) राष्ट्रकूट यादव यांची राजवट नागदला होती. दुर्ग लोंझा नागदपासून हाकेच्या अंतरावर असल्याने या राजवटींचा लोंझावर ताबा असण्याची शक्यता असावी.
भटकंती करतांना सर्वात प्रामुख्याने भुगोलाची आवश्यकता असते. ज्याचा भुगोलाचा अभ्यास पक्का त्याला कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करणे सोपे असते. एका ‘सॅटेलाईट’ नकाशाच्या पाहण्यातून एक अज्ञातवासात गेलेला किल्ला पुन्हा प्रकाशात आला. किल्ला प्रकाशझोतात आल्यापासून अगदी मोजकेच गिर्यारोहक लोंझा भेटीला जावून आलेले आहेत. एकांतात असलेल्या अस्पर्शित लोंझा किल्ला भेटीसाठी तुम्ही कधी निघतांय?