चाळीसगाव-औरंगाबाद दरम्यान पसरलेल्या अजिंठा रांगेने अंगाखांद्यावर गर्द वृक्षराजीने नटलेल्या गौताळा अभयारण्याची शाल पांघरलेली आहे. अजिंठा पर्वतरांग भुगोल आणि इतिहास दोन्ही अंगांनी महत्त्वाची. सहाजिकच भक्कम, बळकट, रांगड्या आणि श्रीमंत किल्ल्यांची मालिकाच इथे बघायला मिळते. अंतुर, लोंझा, सुतोंडा, वेताळवाडी या किल्ल्यांच्या पुढे अजिंठा लेण्यांच्या अलिकडे येतो तो जंजाळा किल्ला…
धनुदुर्गं महिदुर्गमब्दुर्गं वार्क्षमेव वा |
नृदुर्गं गिरिदुर्गं वा समाश्रित्य वसेत्पुरम ॥
सर्वेण तु प्रयत्नेन गिरदुर्गं समाश्रयेत् |
एषां हि बाहुगुण्येन गिरिदुर्गं विशिष्यते ॥
– मनुस्मृती (७ : ७०,७१)
प्राचीन स्मृतीतील या वर्णनात सहा प्रकारचे दुर्ग उल्लेखलेले आहेत. त्यापैकी ‘वार्क्षदुर्ग’ म्हणजे अतिशय दाट झाडीत लपलेला किल्ला. त्यातील काटेरी झाडी, वृक्षलतांच्या जाळ्या, मोठे वृक्ष यापासून किल्ल्यातील माणसांना एक प्रकारे नैसर्गिक संरक्षण मिळत असे.
औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील जंजाळा गावात गेल्यावर ‘जंजाळा’ या नावाबद्दल विचारल्यावर स्थानिक लोक सांगतात की, ‘यहॉं पर झाडी बहोत ही ज्यादा थी. झाडीयोंका इतना जंजाल था… उसके अंदर जाने को भी डर लगता था…’ मुस्लीम बहुल लोकसंख्येचं हे जंजाळा गाव जगप्रसिद्ध अजिंठालेण्यापासून जवळ येते.
चाळीसगावहून गेलो तर सोयगाव – वेताळवाडी किल्ला – हळद्या घाट चढून – उंडणगाव – अंभई – जंजाळे असा रस्ता आहे. अजिंठ्याप्रमाणेच जंजाळ्याला देखिल अनेक परदेशी पाहुणे भेटीला येतात कारण, इथे ‘घटोत्कच’ ह्या अजिंठ्याच्या समकालीन लेणी आहेत. संख्येने फार नसल्या तरी लयनशास्त्राच्या दृष्टीने त्या महत्त्वाच्या आहेत. गावात गेलो की, इथली चाचामंडळी विचारतात, ‘कहॉं जाना है? गुफॉं या किला?’…
गावातून किल्ल्याकडे जाण्यासाठी उत्तर दिशेकडे चालायला सुरूवात करायची. विस्तृत अशा सपाट भागावर शेती केली जाते. शेतांच्या काठांवरून जाणारी पायवाट किल्ल्याकडे जाते. किल्ल्याची उंची ९१४ मी. (३००० फूट) एवढी आहे पण किल्ला तर कुठे दिसत नाही. हेच जंजाळ्याचे वैशिष्ट्य आहे. हा किल्ला जंजाळा गावाच्या दिशेने भूदुर्ग आहे तर इतर तीन बाजूने डोंगरी किल्ला आहे. पुर्वी या विस्तृत पठारावर दाट झाडी असावी परंतु आता शेती शिवाय काहीच दिसत नाही.
गावातून साधारण वीस मिनीटं चालत गेल्यावर भले मोठे बुरुज असलेली भिंत आपल्याला आडवी येते. अचानक जंजाळा किल्ला त्याचं अस्तित्व दाखवतो. प्रवेशद्वार तर ढासळलंय पण बुरूज प्रचंड आकाराचे आहेत. इथून आंत गेल्यावर उजव्या बाजूला सलग तटबंदी आहे. त्यात एक कमानीदार प्रवेशद्वार आहे. थोडं पुढे गेलं की, उजव्या बाजूच्या तटबंदीच्या शेवटी एका गोमुखी प्रवेशद्वाराची रचना दिसून येते. स्थानिक लोक याला ‘बोलती दरवाजा’ म्हणतात. या दरवाजावर सुंदर नक्षी असलेल्या आकृती आहेत.
हा दरवाजा पाहून पुढे गेल्यावर पाण्याचा एक मोठा तलाव आहे. तलावाला दोन बाजूने बंधारा घातल्याच्या खुणा आजही बघायला मिळतात. जंजाळा किल्ल्याच्या विस्तृत सपाटीवर पाण्याचे मोठे असे तीन ते चार तलाव आहेत. डाव्या बाजूला म्हणजेच पश्चिमेकडे अजून एक प्रवेशद्वार आहे. खाली असलेल्या जरंडी गावातून वर येण्याच्या दिशेने असल्याने याला ‘जरंडी दरवाजा’ म्हणतात. या द्वारातून वर आल्यावर समोर अनेक वास्तुंचे जोते नजरेस पडतात.
पुढे साधारण किल्ल्याच्या मध्यभागात गडाच्या प्राचीन वास्तु आणि दाट झाडी यांचे ‘जंजाळ’ आढळतं. इथे मध्यभागात एक बुरूज युक्त दरवाजा आहे. या बुरुजावर अतिशय देखणे असे शरभशिल्प आहे. महाराष्ट्रातल्या तमाम किल्ल्यांवरील शरभ शिल्पांत सर्वांत सुंदर म्हणता येईल असा हा शिंग असलेला ‘शृंगी शरभ’ बघण्यासाठी तरी या किल्ल्यावर नक्की यायला हवं.
धारदार नखं, अंगावर झूल, पायात घुंगूरवाळा उन्मत्त होऊन हत्तीला भिरकवणारा हा शरभ मोहून टाकतो. या शृंगीशरभा व्यतिरिक्त अजून दोन शरभ शिल्प इथे दिसतात. हे दोन्ही खाली पडलेले असून त्यातील एका शरभाचे दोन तुकडे झालेले आहेत. आजुबाजुला पुन्हा उद्ध्वस्त वास्तू, वाडे, राणीचा महाल, पीर बाबाचे ठिकाण, प्राचीन धाटणीची देखणी मशिद, गुप्त दरवाजा, बुरूज आणि अनेक जोती दिसून येतात. यातील पीराच्या स्थानावर आणि राणी महालावर फारसी भाषेत कोरलेले शिलालेख आहेत.
कबर ही सय्यद-अल्-काबीर काद्री या पीराची आहे. बाकी जंजाळा किल्ल्याचा गडमाथ्याच्या विस्तार हा एक कि.मी. बाय एक कि.मी. एवढा प्रचंड असून त्याच्या प्रत्येक टोकावर बुरूज उभारलेले आहेत. चढाई नसली तरी संपूर्ण गडमाथा भटकायला भरपूर पायपीट करावी लागते. पूर्वेकडील भागात जिथून घटोत्कच लेणी समोर दिसतात तिथल्या टोकावर तटबंदी युक्त एक बुरूज पुढे आलेला आहे. हा लांबून नाकाच्या आकाराचा दिसत असल्याने स्थानिक लोक याला ‘नकटा बुरुज’ म्हणतात. संपूर्ण गडफेरी करायला दोन ते तीन तास लागतात. दूरवर पूर्वेकडे वेताळवाडीचा किल्ला नजरेच्या टप्प्यात येतो. घटोत्कच उर्फ घटुरथ ही ऐतिहासिक लेणी, विस्तृत पठाराचा गडमाथा आणि गर्द झाडी तसंच गडावशेषांचं ‘जंजाळ’ बघण्यासाठी ‘जंजाळा’ किल्ल्याला अवश्य भेट दिली पाहिजे.
जंजाळा किल्ल्याला वैशागड किंवा तलतम किल्ला अशीही नावं आहेत. किल्ल्याला लागून असलेल्या दरीत घटोत्कच लेणी इ.स. च्या पाचव्या शतकात कोरली गेली आहेत. वाकाटकांचा मंत्री वराहदेव याने ह्या लेणी खोदल्या आहेत असं अभ्यासातून पुढे आलं आहे.
लेण्यांमधील शिलालेखात अश्माकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. तसंच त्यामुळे किल्ला त्यावेळेपासून अस्तित्वात असावा किंबहूना हे पठार वस्तीसाठी वापरले जात असावे असा अनेक लोक निष्कर्ष काढतात. किल्ल्यावरील शरभ शिल्प हे यादवकाळात कोरले गेले असण्याची शक्यता काही इतिहासतज्ञ सांगतात. इ.स. १५५३ मध्ये अहमदनगरच्या बुरहान निजामशहाच्या ताब्यात हा किल्ला होता. त्यानंतर इ.स. १६३१ मध्ये शहाजहानने हा किल्ला जिंकल्याचा उल्लेख आढळतो.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!