साधारण सापुतारा-हातगडापासून सुरु होणारी सातमाळा पर्वतरांग मनमाड पर्यंत धावत येते. आणि पुढे मनमाड-चाळीसगाव मार्गे थेट औरंगाबाद जिल्ह्यात जाणार्या ‘अजिंठा’ रांगेचा हात पकडते. चाळीसगावपासून पुढे औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असणार्या गौताळा अभयारण्याच्या दाट वनराईत या अजिंठा रांगेचे भक्कम, बळकट, रांगडे, श्रीमंत आणि गडावषेशांचे अलंकार लेवून नटलेले महत्त्वाचे किल्ले लपलेले आहेत. त्यात प्रथम मान जातो तो अंतुर किल्ल्याला.
औरंगाबाद जिल्हा ऐतिहासिक वारशांसाठी जगप्रसिद्ध. भारतातील सर्वात देखण्या लेणी आणि वास्तूंबरोबरच हा जिल्हा देखणे किल्लेही बाळगून आहे. या किल्ल्यांमध्ये प्राधान्याने नाव घ्यावं लागेल ते अंतुरचं. अंतुरला जाण्यासाठी नाशिकहून अगदी सोपा मार्ग आहे. नाशिकहून चाळीसगाव गाठावं. तिथून २० कि.मी. अंतरावर असलेल्या नागद हून सायगव्हाण – औट्रम घाट – नागापूर – कोलापूर – अंतुर असा रस्ता आहे. या प्रवासात औट्रम घाटाची चढाई सुरु होते तिथे गौताळा अभयारण्याचे प्रवेशद्वार आहे.
गर्द अशा वनक्षेत्रातून वळणावळणांच्या रस्त्यावरून जातांना मधूनच वन्यपशूंचे अस्तित्त्व जाणवत राहते. पावसाळ्याच्या या दिवसांत तर या परिसरात जणू स्वर्गच अवतरलेला असतो. नागद ते अंतुर हे अंतर अंदाजे ३० कि.मी. भरतं.
कोलापूर गावातून पुढे डाव्या हाताने जाणारा कच्चा पण चांगला असा गाडी रस्ता थेट अंतुर किल्ल्यापर्यंत जातो. या कच्च्या रस्त्यात एका ठिकाणी एक उभा कोरीव स्तंभ दिसतो. त्यावर चारही बाजूंना फारशी भाषेतून मजकूर कोरलेला आहे. हा स्तंभ म्हणजे त्याकाळातला मैलाचा दगड आहे. त्यावर अंतुरपासूनचे चारही दिशांना असलेल्या मुख्य गावांची अंतरं दिलेली आहेत. हा बहुदा भारतात अस्तित्वात असणार्या मैलाच्या दगडांपैकी सर्वांत प्राचीन असावा.
पुढे एका चौथर्यावर अंजनीसूत हनुमंत आपल्याला दर्शन देतात. पुढे गाडी थेट किल्ल्याला जाऊन भिडते. आता आपल्याला कुठलीही चढाई न करता थेट किल्ल्यात शिरायला मिळतं. त्यामुळे अगदी सर्व कुटूंबासकट आपण अंतुरला येऊ शकतो. रस्त्यात वनविभागाने निरीक्षणासाठी पॅगोडे बनविले आहेत. यातून लांबवरचा परिसर न्याहाळतांनाच खालची दरी आणि त्या दरीतून वर उठावलेला, नखशिखांत वृक्षराजीचे हिरवे वस्त्र परिधान केलेला अंतुर डोळ्यांचं पारणं फेडतो. त्याच्या माथ्यावर असलेली सलग तटबंदी आणि गडावशेष लांबूनच मोहून टाकतात.
अंतूर किल्ला पूर्व-पश्चिम आणि उत्तर बाजूने खोल दरीमुळे दुर्गम बनलांय तर दक्षिण दिशेने सलग असलेल्या पठारापासून भला मोठा खंदक करून पठारापासून वेगळा करण्यात आला आहे. हे भले मोठे खंदक अभ्यासण्यासारखे आहे. खंदकाच्या अलिकडून उजव्या हाताने थोडं पुढे जात पूर्व भागातून किल्ल्यात जाण्यासाठी पहिलं प्रवेशद्वार लागतं.
इथे पहिल्या प्रवेशद्वाराला लागूनच दुसरं आणि तिसरं प्रवेशद्वारही उभे आहेत. या तीनही दरवाजांतून विविध दिशांनी वळणं घेत गेलो की आपल्याला किल्ल्यात प्रवेश मिळतो. आपल्या लक्षात आलंच असेल की, प्रवेशद्वारांची ही रचना शत्रूला भेदणं सहजासहजी शक्य नव्हती. त्यात प्रत्येक प्रवेशद्वारावर आडवे बांधलेले चिलखती बुरूज, तटबंदी आणि पहारेदाराच्या भव्य खोल्या हा प्रवेशमार्ग अधिकच संरक्षित बनवितात.
पहिल्या प्रवेशद्वारावर वर दोन कोनाडे बनवून त्यात शरभ शिल्प ठेवलेले आहेत. पैकी एक शरभ आता अस्तित्त्वात नाही. दुसर्या प्रवेशद्वार कमलपुष्पे, शिल्पाकृती आणि तोफगोळे भिंतीत बसवून सजविलेले आहे तर तिसर्या प्रवेशद्वारावर फारशी भाषेतला अगदी ठसठशीत शिलालेख आहे. किल्ल्यात प्रवेश करताच संपूर्ण गडमाथ्यावर अनेक वास्तू पसरलेल्या दिसतात. साधारण उत्तरेकडे एक भली मोठी वास्तू नजरेत येते. प्रचंड मोठी असलेली ही वास्तू कदाचित अंबारखाना म्हणून वापरली जात असावी. त्यात दोन तीन मोठी दालनं आहेत.
अनेक कमानी, झरोके आणि छत विशेष बघण्यासारखे आहे. थोड्याशा उंचावर एक चौकोनी टेहाळणीची इमारत बनविलेली आहे. आतून भरीव असलेल्या या इमारतीवर चहू बाजूने सुंदर कोनाडे काढलेले आहेत तर वर जाण्यासाठी जीना आहे. छतावर तोफ लावता येतील असे दोन गोलाकार बांधकाम केलेले दिसते. या ठिकाणाहून संपूर्ण अंतुर किल्ल्यावर नजर ठेवता येते. या इमारतीच्या खालच्या बाजूला एक दर्गा असावा अशी वास्तू आहे. ह्यावरही कोरीव काम दिसून येते.
थोडं खालच्या बाजूला मध्यभागात भलेमोठे पाण्याचे तळे आहे. तळ्याच्या काठावर एक मशिद असून त्यात दोन शिलालेख कोरलेले आहेत. बहुदा ह्या कुराणातल्या आयत असाव्यात. तळ्याच्या दक्षिणेला एक भले मोठे प्रवेशद्वार असून त्यापूढे उद्ध्वस्त असे वाड्याचे अवशेष आहेत. परंतु ह्या भव्य वाड्याला आताशा वृक्ष वेलींनी घेरून पाडून टाकलंय. अंतुरच्या पश्चिम बाजूला सलग तटबंदी, त्यात सुंदर अश कमानी, पाण्याची बांधीव आणि खांब टाकी तसेच काही उद्ध्वस्त वास्तू आहेत. एकंदरीतच किती बघावं आणि किती वर्णन करावं अशी स्थिती असतांना अंतुर किल्ल्याचा भरभक्कम दक्षिण भाग खुणावत असतो.
किल्ल्याच्या दक्षिणेकडे जातांना एका प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर एक पूर्व-पश्चिम पसरलेली सलग भिंत दिसते. या भिंतीच्या मध्यभागी असलेल्या प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर मागे वळून पाहिलं की आपण स्तिमित होऊन जातो. सलग असा भक्कम तट आणि त्याचे दोन अतिभव्य बुरूज, त्या बुरूजांच्या बाहेरच्या बाजूला प्रत्येकी एक छोटा दरवाजा तर मध्यभागी ज्यातून आपण आलो ती प्रवेशद्वाराची भव्य कमान… सर्व आजही अगदी सुस्थितीत.
दक्षिणेकडे असलेल्या खंदकाच्या वरच्या टोकावर आपण पोहोचतो. इथे भरपूर जटील असे बांधकाम आहे. उभ्या अशा जाडजूड भिंतीमधून बोळीसारखे मार्ग आहेत. त्यात एक सुंदर अशी मशिद आहे. पलिकडे टेहाळणीसाठी असणार्या सज्जासारख्या भागातही इथून जाता येतं तसंच इथल्या विविध रचनांमधून पाहिजे तसं हिंडत ही अनोखी रचना अभ्यासता येते.
थेट गाडी मार्ग झालेला असल्याने अंतूर आता पूर्वीसारखा दुर्गम राहिलेला नाही. इथे पर्यटन, वन आणि पुरातत्त्व विभागातर्फे गड संवर्धनाचे उत्कृष्ट काम सुरू आहे. अंतुरच्या माथ्यावरून अजिंठारांगेचे गर्द वृक्षराजीने नटलेले पदर आणि बाकी गौताळा अभयारण्याचा हिरवा नजारा प्रफुल्लित करतो. एकाच किल्ल्यावर जवळपास सर्व प्रकारच्या गडवास्तूंचा खजिना असल्याने ‘अंतुर’ भेट कायमस्वरूपी स्मृतीपटलावर कोरली जाते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!