दुर्ग सुतोंडा
सातमाळेला लागून पुढे जाणारी अजिंठा पर्वतरांग ही नाशिक जिल्ह्याला जळगाव आणि मराठवाड्यापासून विलग करते. या रांगेतला सर्वांत मुख्य किल्ला म्हणजे अंतुर आहे. अंतुरच्या भेटीला गेलं म्हणजे त्याच्या प्रभावळीत असणारे लोंझा आणि सुतोंडा या किल्ल्यांनाही आवर्जुन भेट दिली पाहिजे. तसंच पुढे दोन दमदार दुर्ग वेताळवाडी आणि वैशागड आपल्याला साद घालत असतात. एकंदरीत संपूर्ण अजिंठा रांग अस्सल भटक्यांसाठी एक परिपूर्ण डोंगरयात्रा ठरते. या यात्रेतील दुर्ग सुतोंडा म्हणजे किल्ल्यांवरील जलव्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना होय…

गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक
गेल्या वळवाटांमध्ये आपण अजिंठा रांगेतील अंतुर आणि लोंझ्याची सफर केली. अगदी त्याच्याच पुढे अनोखा सुतोंडा उभा आहे. सुतोंड्याला नायगावचा किल्लाही म्हटलं जातं. अर्थातच पायथ्याला असलेल्या नायगावमुळे. नाशिकहून चाळीसगाव-नागद-बनोटी असा सरळ रस्ता आहे. चाळीसगाव ते बनोटीगाव हे साधारण ४५ कि.मी. अंतर भरतं.
हिवरा नदीच्या काठावर वसलेलं हे बनोटी गाव तसं मोठं पण पर्यटकांना राहण्याखाण्याची सोय तशी नाही. नुकतेच काही हॉटेल्स झाली आहेत. गावाच्या थोडं बाहेर पण गावाला लागून नदीकाठावर शंकराचं अतिशय सुंदर देवालय आहे. मंदिराचा उंच कळस अतिशय देखणा असून खाली नदीच्या बाजूला पायर्यांचा जुना दगडी घाट आणि कुंड बांधलेले दिसतात. मंदिराला लागून आता गावकर्यांच्या मंगलकार्यांसाठी हॉल आणि काही रूमस् काढलेल्या आहेत. त्यात भटक्यांची झोपण्याची व्यवस्था होऊ शकते.
बनोटी गावालगत साधारण ३ कि.मी. अंतरावर नायगाव हे सुतोंडा किल्ल्याच्या पायथ्याचं गाव. बनोटी ते नायगाव रस्ता थोडा कच्चा असला तरी फार खराब नाही. नायगाव हे शेती, पशुपालन आणि दुधदुभत्याचं गाव. गाव फार मोठं नाही. भर गावात एका कडूलिंबाच्या झाडाखाली पूरातन शिल्पकलेतील एक विष्णुमुर्ती दिसते. इथे गेल्यावर ही मूर्ती अवश्य पहावी.
गावाच्या मागच्या बाजूला अजिंठारांगेचे पर्वत लगटलेले आहेत. त्यात सर्वात उंच असणारा सुतोंडा किल्ला असावा असं वाटतं, पण अर्धगोलाकार आकाराचा, सर्वात ठेंगणा आणि मुख्य पर्वतांच्या अलिकडचा असा हा किल्ला चढाईसाठी अतिशय सोपा आहे. पायथा ते माथा फार तर अर्धा तास. या किल्ल्यावर झाडोरा अतिशय चांगला आहे. लांबून बघतांना आपल्याला ह्या किल्ल्याने किती रहस्य दडवली आहेत याची बिलकुल कल्पना येत नाही.
एका समृद्ध किल्ल्यावर असावं असं तटबंदी, बुरूज, प्रवेशद्वार, खंदक, भुयारी मार्ग, चोर दरवाजा, लेणी, गुहा, वाड्याचे बांधकाम, पुरातन मशीद आणि मोजतांनाही दमछाक होईल इतके पाण्याचे टाके!
किल्ला चढाईला सोपा असला आणि वर जाण्याची वाट सोपी असली तरी किल्ल्याच्या सर्व दिशांना पसरलेला हा दुर्गपसारा व्यवस्थित बघण्यासाठी गावातून सोबतीला वाटाड्या घ्यायलाच हवा.

किल्ला चढण्यासाठी दोन वाटा आहेत. एक समोर दिसणार्या भागातून म्हणजे किल्ल्याच्या उत्तरेकडून आहे तर दुसरी वाट समोर दिसणार्या भागातून किल्ल्याला उजवीकडून वळसा घालत किल्ला डावीकडे ठेवत पलिकडच्या म्हणजेच दक्षिण बाजूने कातळ फोडून केलेल्या खंदकासारख्या भागातल्या प्रवेशद्वाराने माथ्याकडे जाते. आपण एका वाटेने वर जायचं आणि दुसर्या वाटेने खाली उतरायचं म्हणजे सर्व किल्ला न्याहाळता येतो.
किल्ल्याच्या उत्तरेकडील भागातून वर चढतांना थोडं वर गेलं की मुख्य वाटेपासून काही अंतरावर एक लेणं कोरलेलं आहे. स्थानिक लोक याला ‘जोगणामाईचं घरटं’ म्हणतात. कारण, या लेणीत बाळ मांडीवर असलेल्या एका देवीची मूर्ती आहे. त्याशेजारीच एक पुरुष मुर्तीही आहे. या लेणीत छताच्या बाजूस भगवान महावीराचं प्रभावळीसकट असं अस्पष्ट कोरीव शिल्प आहे. हे लेणं बघून पुन्हा मुख्य वाटेने चढलं की आपण एका अरूंद अशा प्रवेशद्वारात जाऊन पोहोचतो. हे तटबंदीत असलेल्या चोरदरवाजासारखं आहे. आपण माथ्यावर आलेलो असतो. इथून गडफेरीला सुरुवात करायची.
संपूर्ण गडमाथ्यावर अनेक पाण्याची टाकी आहेत. प्रत्येकाचं स्थान आणि दिशा सांगणं खरंच अवघड आहे. पण किल्ल्यांवर आढळणारी सर्व प्रकारची पाण्याची टाकी या गडफेरीत दिसून येतात. खांब टाकी, लेणीवजा दिसणारी टाकी, सलग समतल खोदलेली चौकोनी, आयताकृती अशी विविध टाकी, भुयारी टाकी, जोड टाकी, सलग ओळीने कोरलेली टाकी, उंच सखल स्तरावर एकावर एक अशी मजले असलेली टाकी, वरून झाकण झाकता येईल अशी अरूंद तोंडाची पण आतून रूंद असलेली टाकी अशी पाण्याच्या टाक्यांची जंत्री सुतोंड्यावर दिसते. त्यात सीतेची न्हाणी म्हणून एक पाणटाकं प्रसिद्ध आहे तर मोठ्या जलाशयासारखीही दोन तीन पाण्याची तळी आहेत. हे सर्व पाणीकाम बघत असतांना किल्ल्यावर पीर बाबांचे ठिकाण दिसतं.











