श्रावण महिन्यात प्रदक्षिणा करण्यासाठी त्र्यंबकला लाखो भाविकांची गर्दी होते. या प्रदक्षिणा दोन आहेत. एक ब्रह्मगिरी प्रदक्षिणा (छोटी फेरी). जी फक्त त्र्यंबकच्या ब्रह्मगिरी पर्वताभोवती फिरते. तर दुसरी म्हणजे हरिहर प्रदक्षिणा (मोठी फेरी). या हरिहर प्रदक्षिणेत ब्रह्मगिरी आणि हरिहर किल्ल्यासोबत अनेक छोट्या मोठ्या टेकड्या आणि डोंगरदेखिल येतात. त्यातच त्यातच ब्रह्मगिरी आणि हरिहर यांच्या मधोमध ब्रह्मा डोंगर उभा आहे. तसं बघायला गेलं तर मोठ्या प्रदक्षिणेत आपण ब्रह्मा, विष्णू, महेश यांना प्रदक्षिणा करत असतो. भगवान शंकराचा ब्रह्मगिरी, हरि म्हणजेच विष्णूचा हरिहर तर ब्रह्मदेवाचा हा ब्रह्मा डोंगर….
ब्रह्मगिरी आणि हरिहर या किल्ल्यांवर भटक्यांची भटकंती नेहमीचीच. पण कधीतरी आडवाटेवरच्या ब्रह्मावरही जाऊन यायला हवं. ब्रह्मा डोंगराकडे जाण्यासाठी त्र्यंबकहून सापगावकडे निघायचं. सापगावहून दुगारवाडीकडे जाण्याचा रस्ता लागतो. या रस्त्यानं पुढे काचुर्ली हे गाव येतं. या गावाच्या पुढे मोठ्या प्रदक्षिणेचा मार्ग दिसतो. या मार्गात आपल्याला लेकुरवाळी देवीचं मंदिर लागतं. तिथेच मंदिराच्या अलिकडे एक टोकदार टेकडीची डोंगरधार रस्त्याशी येऊन मिळते.
तिथूनच वर इथं चढायला सुरूवात करायची. इथपर्यंत आपलं चारचाकी वाहनही पोहोचू शकतं. काचुर्ली पर्यंत चांगला टार रोड आहे. वळावळणांच्या या रस्त्यावर रायडिंगचा रोमांचही अनुभवायला मिळतो. या रस्त्यानं स्थानिक गावकर्यांचा दिवसभर राबता असतो. इथून दुगारवाडी गाव, धबधबा जिथून खाली पडतो ती खिंड आणि दाट जंगलाचा परिसर पाहून आपण आवाक् होतो.
डोंगरधारेवरून डोंगराच्या टोकाशी जायला निघायचं. चढाई फारशी खडी नसल्याने दमछाक होत नाही. अगदी काही वेळातच आपण त्या छोट्या टेकडीच्या टोकाशी आलेलो असतो. तिथून लांबलचक आडवा पसरलेला ब्रह्मगिरी अगदी हत्तीमेटेपासून ते दुर्गभांडारपर्यंत आख्खा नजरेत येतो. त्याखाली पसरलेला जलाशय आणि ब्रह्मगिरीवरची टिपक्यासारखी मंदिरंही सुंदर दिसतात. आपण ज्या ठिकाणी आलो आहोत त्या टेकडीच्या पलिकडे एक पायवाट समोरच्या आडव्यतिडव्या दिसणार्या डोंगराकडे जाते. तोच ब्रह्मा डोंगर.
पायवाटेने खाली उतरत जाऊन ब्रह्माकडे कुच करायची. समोर डोंगरात काही घळी दिसतात. त्यातून सर्वात उजवीकडच्या मोठ्या घळीतून वर जाण्याचा मार्ग आहे. डोंगराला भिडायचं आणि उडवीकडे तिरपं फिरत मोठ्या घळीच्या तोंडापाशी यायचं. या घळीत पडलेल्या अनेक दगडांवरून वाट वर जाते. या दगडगोट्यांतून पावसळ्याच्या दिवसात स्वच्छ पाण्याचे झरे वाहत असतात.
आपण जर गाणं गुणगुणत ट्रेक करत असू तर हे झुळझूळणारे झरे आपल्या गाण्याला बीटस् देत असतात. या झर्यांचं गोडचटक थंडगार पाणी प्यायलो तर आपला आवजही खुलतो. या दगडांवर पाय देत नागमोडी वळणं घेत वर निघायचं. वर गेल्यावर उजवीकडे वळत आपण एका सपाटीवर पोहोचतो. तिथे पोहोचताच डोंगराच्या पलिकडचा भव्य आणि मोहक लँडस्केप अचानक डोळ्यांपुढे उभा ठाकतो. हरिहर किल्ला तर एका वेगळ्याच अँगलमधून आपल्याला बघायला मिळतो.
हरिहरवरचं जंगल, गणेश तलाव, मोठ्या फेरीचा हरिहरवरून येणारा आणि ब्रम्ह्याला लगटून जाणारा संपूर्ण मार्ग, फणीचा डोंगर, बसगड, उतवड, आदी पर्वत रांग हे सगळं तासन्तास न्याहळत बसावसं वाटतं. हे सगळं पाहून अजून वर डोंगर माथ्यावर जाता येतं किंवा लांबलचक पसरलेल्या डोंगरमाथ्याच्या खालून त्याला चिकटून जाणार्या पायवाटेने ब्रम्ह्याच्या पलिकडच्या बाजूस म्हणजे जिथे हरिहर मिळतो त्या दिशेने निघायचं. या सपाटीवरून चालत जातांना फार मजा येते. पावसाळ्याच्या दिवसांत छोटीछोटी पानथळं साचलेली असतात. इथं विविध प्रकारच्या रानवनस्पतींचं दर्शन आपल्याला होतं.
देवाला वाहिली जाणारी जाड देठाची कमळसदृश्य फुलं तर इथे पावसाळ्यात भरपूर पहायला मिळतात. खरंतर याला रानहळद किंवा काचोरा असं शास्त्रिय नाव आहे. एक-दो करत आपण त्या टोकाला जाऊन पोहोचतो. इकडे डोंगरापासून अलग झालेलं एक टेपाड दिसतं आणि त्याच्या टोकावर टुमदार मंदिरही दिसतं. इतक्या दुर्गम ठिकाणी इतकं सुंदर मंदिर कुणी बांधलं असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. मंदिराकडे जाण्यासाठी किंचितसं खाली उतरून थोडंसं वर चढावं लागतं.
आदिवासी बांधवांचं श्रद्धास्थान असलेलं हे ब्रह्मादेवीचं मंदिर. कुणी भवानीमाताही म्हणतात. विटा आणि मातीच्या बांधकामातून उभारलेल्या या मंदिरावर कौलं आणि पत्र्यांचं छतही आहे. त्यात शाळुंकेच्या आकाराची देवीची मुर्ता सुंदर दिसते. तिथंच देवीभक्तांनी वाहिलेल्या चुडा आणि खणांचा खच दिसतो. काही लाकडी कोरीव शिल्पही या मंदिराजवळ ठेवलेली आढळतात. स्थनिक आदिवासी भाताच्या पहिल्या पिकाचा नैवेद्य या देवीला अर्पण केल्याशिवाय ना विकतात न खातात.
नवरात्रात दररोज दर्शनाला भोळ्या आदिवासी बांधवांची इथं गर्दी असते. तसं वर्षभर भरपूर लोक दुर्गम भागातून इथं येत असतात. पण, शहरी लोकांचा तसा राबता कमीच. त्यात आपण इथे पोहोचल्याची भावना थोडी वेगळीच असते. या मंदिरापासून हरिहरच्या माथ्यावरचा सर्व पसारा खुपच छान दिसतो. टायटॅनिक जहाजासारखा हरिहरचा इथून दिसणारा आकार अन्यत्र कुठूनही दिसणे नाहीच. या एका झलकेसाठीही जातिवंत दुर्गभटक्यांनी ब्रह्माभेट दिली तरीही ही भेट वसुल !
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!