शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – भटकूया आनंदे – आड बाजूचा आड दुर्ग

एप्रिल 24, 2021 | 7:11 am
in इतर
0
IMG 3173 scaled

आड बाजूचा आड दुर्ग

चैत्रातही वैशाख वणव्याचा भलताच हॉट फील येतो आहे. त्यात दुष्काळाचीही भर पडलेली दिसते आहे. सर्व लोक पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. पण तरीही मुरब्बी भटक्यांचे सळसळणारे पाय मात्र त्यांना एका ठिकाणी बसू देत नाहीत. अशा वेळी सुटसुटीत आणि छोटेखानी ट्रेकसाठी शोधाशोध होत असते. भल्या पहाटे लवकर निघून दुपारच्या वामकुक्षीला घरी परतायचा बेत आखायचा असेल तर ‘आड’ किल्ला हा नाशिकरांसाठी आयडीयल ठरतो…
कुलथे e1610123297171
सुदर्शन कुलथे
गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक
‘आड’ म्हणजे ‘एकाबाजूला असलेला’ किंवा ‘पाणी साठविण्याची जागा’ असे दोन अर्थ निघतात. आड किल्ल्यावर पाण्याची सुमारे आठ-दहा मोठी टाकी आहेत. तसंच आड किल्ला हा काहीसा आडमार्गावर उभा असल्याने बहुदा त्याचं नामकरण ‘आड’ असं झालं असावं. आड किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाचं नाव आडवाडी. आडवाडीपर्यंत पोहोचण्यासाठी नाशिकहून सिन्नर-ठाणगाव-आडवाडी असा ५८ कि.मी. चा मार्ग आहे. घोटीकडून जायचं असेल तर भंडारदरा मार्ग पकडायचा. तिथून टाकेद फाट्यावरून वळत टाकेद-कोकणवाडी-पट्टेवाडी-तिरडे मार्गे आडवाडी असा वळणदार रस्ता आहे. स्वतःचं वाहन असेल तर उत्तम नाहीतर सिन्नरहून आडवाडीसाठी थेट एस.टी. बसेस आहेत.
ठाणगावकडे उठावलेल्या औंढा किल्ल्यापासून ते थेट भंडारदरापर्यंत उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या बुलंद रांगेवर पूर्व-पश्‍चिम वाहणार्‍या वार्‍यावर पवनचक्क्यांचे पंख फिरवले जात आहेत. जिथे जिथे उंचावर पवनचक्की दिसेल तिथे पोहोचण्यासाठी रस्ते झाले आहेत असं समजावं. याच पवनचक्क्यांसाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्याचा फायदा आडवाडी गावाला झालेला आहे.

IMG 3046

ठाणगावपासून साधारण आठ कि.मी. अंतरावर असलेल्या या गावी आधी तंगडतोड करून जावं लागे. आता हा वळणावळणांचा रोमांच भरणारा रस्ता आपल्याला सहज आड किल्ल्याच्या पायथ्याशी नेऊन सोडतो. समुद्रसपाटीपासून ४०५० फूट (१२३५ मी.) उंच असलेला आडदुर्ग पायथ्यापासून फार उंच नाही. आडवाडी दोन-तीन वाड्यांमध्ये विखूरलेले आहे.
आडगडावर जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. आपण थेट वरच्या वाडीतून वर चढू आणि पहिल्या वाडीच्या दिशेने खाली उतरू या. वरच्या आडवाडीत रस्त्याला लागूनच महानुभाव पंथाचा आश्रम आहे. इथेच आपले वाहन पार्क करून वर चढायला सुरुवात करायची. आडगडाच्या दक्षिण भागातून वर जाणारी ही ठळकपणे वर जाणारी पायवाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा प्रश्‍न नाही. मध्यम गतीने जरी चाल ठेवली तरी साधारण अर्ध्या तासात आपण गडमाथ्यावर पोहोचतो.
पाच-सात कातळ कोरीव पायर्‍यांवरून गडमाथ्यावर प्रवेशताच मागे वळून खाली पाहीलं तर भल्यामोठ्या दिसणार्‍या पवनचक्की भिंगरीसारख्या छोट्या दिसू लागतात. इकडून लांबवर बितन गडासकट कळसूबाईपर्यंतची अनेक पर्वत शिखरं नजरेत भरतात. सपाट आणि विस्तृत पसरलेल्या आड किल्ल्याच्या माथ्यावर सावलीसाठी एकही मोठे झाड नाही. काही छोटी खुरटी झाडं सोडली तर बाकी गवताळ माळावर अनेक अवशेष आहेत.

IMG 3146

आपण जिथून वर आलो त्या भागात काही पाण्याची टाकी आहेत. तिथून थोडं मध्यभागावर गेलो की ओळीने गोल रचलेल्या दगडांच्या जोत्यामध्ये एक समाधी दिसते. चौकोनी दगडावर मानवाकृती कोरलेली असून त्यावर गोलाकार दगड घुमटीसारखा बसवलेला आहे. ही समाधी कोणाची आहे ते मात्र कळत नाही. गडफेरी चालू ठेवत पश्‍चिमेकडे गेल्यावर तिथेही पाणटाक्यांचा एक समुह दिसतो. आकाराने मोठ्या असलेल्या या टाक्यांमध्ये भरपूर पाणी असून त्यात पाणी ओघळून येण्यासाठी त्यावरून पन्हाळीसारखे चरे मारलेले आहेत. त्यातल्या एका टाक्याच्या आतल्या भिंतीवर सुंदर असे शरभ शिल्प कोरलेले आहे.
शरभ त्याच्या पुढच्या पायांखाली एक मोठा हत्ती तुडवतांना दिसतो. या टाक्यामध्ये जर काठोकाठ पाणी भरले गेले तर मात्र हे शिल्प दिसत नसणार. या पश्‍चिम टोकावरून दूर बघतांना शेजारी असलेला म्हसोबा डोंगर पलिकडच्या औंढा सुळक्याला झाकून टाकतो. पश्‍चिमेकडून उत्तर टोकाकडे जातांना पुन्हा समाधीसारखा शेंदूर लावलेला कमानीदार दगड दिसतो. तिथेच त्या टोकाला पहारेदाराच्या चौकीचे जोते दिसते. तिथूनच उत्तरेकडे खाली उतरण्यासाठी खाचेत काही पायर्‍या आणि प्रवेशद्वार आहे. दुर्दैवाने प्रवेशद्वाराची चांगलीच पडझड झाली आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीचे सर्व कोरीव दगड खाली विखरून पडलेले आहेत.

IMG 3070

गडफेरी करत असतांना अनेक ठिकाणी मोठमोठ्या भग्न वाड्यांचे चिरे आणि ओळीने रचलेल्या दगडांचे अनेक जोते दिसतात. हे सर्व बघत असतांना हा किल्ला त्याच्या नांदत्या काळात किती समृद्ध असावा याचे कल्पनाचित्र डोळ्यांसमोर उभे राहते. पूर्व पठारावर ही ओळीने कोरलेले सात- आठ पाणटाके आहेत. इतक्या दुष्काळातही पाण्याने भरलेले आहेत. भर उन्हात या पाण्याकडे बघूनच गारवा मिळतो. इथे पूर्वेकडील भागात ठळक असा भगवा झेंडा उभा केलेला आहे तिथून खाली उकरण्यासाठी वाट आहे.
जर पूर्वेकडून वर चढायचे असेल तर खालून दिसणारा माथ्यावरचा हा झेंडा लक्ष्य ठेवून चढाई करायची. इथून खाली बघतांना दूरपर्यंत पसरलेले विस्तृत पठार आपल्या अंगाखांद्यावर भिरभिरणार्‍या पवनचक्क्यांमुळे विलोभनिय भासते. अंग उन्हाने तापायला सुरुवात झालेली असते पण अवतीभवती फिरणारे हे पंखे जणू आपल्याला हवा घालण्यासाठीच कुणीतरी चालू केलेले आहेत की काय असं वाटतं. उन्हाळ्याच्या या दिवसांत सोनेरी शाल पांघरून झोपी गेलेले हे पठार वर्षाऋतूत हिरवे वस्त्र परिधान करून जागं होतं!

IMG 3145

झेंड्याखालचा टप्पा हळूच उतरायचा कारण इथे कातळात कोरलेल्या पायर्‍या अगदी उभ्या आहेत. पायर्‍या संपल्या की उभा ताशीव असा कातळकडा उजव्या हाताला ठेवत थोडं पुढं जायचं. इथे नैसर्गिक अशा गुहेत दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केलेली आहे. मूळ तांदळा स्वरूपातली ही मुर्ती स्थानिक लोक ‘आडूदेवी’ म्हणून संबोधतात. फार उंच नसलेल्या गुहेच्या एका बाजूला दगड रचून त्याला दरवाजा लावलेली एक खोली दिसते. सावली आणि थंडावा असलेल्या या गुहेच्या तोंडासमोर तग धरून उभे असलेल्या चाफ्याच्या झाडाचं मात्र कौतुक वाटतं. हा चाफा तुटून अगदी आडवा झालेला असेल पण त्याने त्याची मूळं पुन्हा जमीनीकडे वळवून बहार धरलेला आहे.
इथल्या थंडाव्यात शांत झालेल्या डोक्यात किल्ल्याचा इतिहास काय असेल? असा प्रश्‍न पडतो. पण इतिहास आडकिल्ल्याबाबत अद्यापतरी काही भाष्य करत नाही. पण आडदुर्ग याभागातल्या घाटमार्गांवर पहारेदार चौकीचे काम करत असावा. थोडा आराम करून पुन्हा पायर्‍यांच्या जागी येत खाली उतरण्याचा मार्ग धरायचा. ही वाट थेट खालच्या वाडीच्या दिशेने जाते. खाली पोहोचल्यावर आडवाडी कडे जातांना हनुमंताचे टूमदार मंदिर आहे. अडीच फूट उंचीच्या हनुमानाच्या बरोबरीने अनेक शिल्पं आणि वीरगळीचे दगड ओळीने मांडलेले आहेत. त्यांचे दर्शन घेऊन आपल्या घराकडे सुखरूप परतण्यासाठी मार्गस्थ व्हायचं.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हिअरिंग एड

Next Post

सुजय विखेंनी दिल्लीहून नगरला गुपचूप आणला रेमडेसिविरचा मोठा साठा (व्हिडिओ)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post

सुजय विखेंनी दिल्लीहून नगरला गुपचूप आणला रेमडेसिविरचा मोठा साठा (व्हिडिओ)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011