कंक्राळा किल्ला
मालेगावच्या उत्तरेरडच्या भागात गाळणा टेकड्या पसरलेल्या आहेत. थेट धुळ्यापर्यंत पसरलेल्या या टेकड्यांवरच या परिसरातले काही मोजके किल्ले बांधलेले दिसून येतात. ऐतिहासिक वास्तूंनी सजलेल्या गाळणा किल्ल्याच्या नैऋत्तेला कंक्राळा किल्ला उभा आहे. मालेगावच्या या माळमाथा भागातल्या भटकंती दरम्यान गाळण्याच्या किल्ल्यासोबतच कंक्राळ्याची भेट अनोखी ठरते.
गिरिभ्रमण म्हणजे नुसती सहल अथवा पर्यटन नाही, तर गड-किल्ल्यांचं स्थान, भौगोलिक रचना, मार्ग, इतिहास यांचा सखोल अभ्यास आणि त्याचबरोबर शारीरिक फिटनेस, मौजमजा आणि आनंद देणारी एक परिपूर्ण भटकंती होय. या गिरिभ्रमण-गिर्यारोहणाचा छंद एकदा लागलं की सुटणं कठिण. मग प्रमुख गड-किल्ल्यांसोबत दुर्लक्षित, अप्रकाशित ठिकाणांचीही स्वच्छंदपणे मुशाफिरी सुरू राहते. आजच्या या धावपळीच्या सुगात आपल्या कामातून वेळ काढत, सुटीचा दिवस सत्कारणी लावत, नियोजनबद्ध रितीने केलेली मुशाफिरी तर आपल्याला आगळाच आनंद देते.
आशाच एखाद्या मोकळ्या दिवशी मालेगावच्या डोंगराळ माळमाथ्याच्या भागात धुमश्चक्रीला निघायचं. मालेगावच्या उत्तरेला गाळणा टेकड्या पसरलेल्या आहेत. त्यातच कंक्राळा हा छोटेखानी पण टूमदार असा किल्ला वसलेला आहे. या कंक्राळ्याला पोहोचण्यासाठी आपलं खाजगी वाहन घेऊन गेलेलं बरं. कारण या भागात वाहतूकीची तशी थोडी गैरसोय होऊ शकते. मालेगावहून करंजहव्हाण हे साधारण 15 कि.मी. तर करंजगव्हाणहून कंक्राळा गाव हे पाच-सात किमीचं अंतर.
रस्ते तसे चांगले असले तरी या भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्याचं जाणवतं. उजाड वाटणाऱ्या या प्रदेशात लहानशा कंक्राळा गावाची स्थिती मात्र थोडी बरी आहे. कांदा, कापूस, डाळींब अशी पीकं इथे घेतली जातात. इनमिन तीन हजार लोकसंख्या असलेल्या कंक्राळा भागातला शेतकरी हा काबाडकष्ट करून जगणारा, फारसा सधन नसलेला, सर्वसामान्य असा दिसून येतो. इकडे आल्यावर फार वेगळ्याच ठिकाणी एखाद्या वाळवंटी खडकाळ भागात आल्यासारखं वाटतं. इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली माती. ही माती बांधकामासाठी अतिशय उत्तमा असल्याचं समजतं. अगदी सिमेंटसारखी सुबक आणि मजबूत अशी ही माती आहे. गावातली काही जूनी घरं शंभर-दिडशे वर्षांपूर्वीची असली तरी आजही अगदी भक्कम स्थितीत उभी असलेली दिसतात.
सर्व गाव बघताबघता किल्ल्याचा मार्ग विचारायचा. गावातली मंडळी किल्ल्याकडजे बोट करून रस्ता दाखवतात. गावाच्या पाठीशी क्ल्ला उभा आहे. डोंगरमाथ्याकडे उभ्या कातळावर पांढरा चूना फासलेला दिसतो, त्या दिशेने किल्ल्याकडे मोर्चा वळवायचा. किल्ल्यापर्यंतचा रस्ता ठळक नसला तरी चुकत नाही. या उजाड मैदानातून कंक्राळा दुर्गाच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. चालता चालताच किल्ल्याचं निरिक्षण करायचं. कंक्राळ्याच्या माथ्यावर असलेल्या दोन टेकड्यांमधुन खाली उतरलेली एक घळ दिसते. त्या घळीतूनच किल्ल्यावर चढायचा मार्ग आहे. या घळीच्या दिशेने कुच करत वर चढायला लागायचं. या घळीतून पडलेल्या दगडांमधून नागमोडी वळणं घेत वर चढायचं.
घळीत भरपूर झाडं आहेत. सिताफळ, डाळिंब आणि काही काटेरी झुडूपं. या झाडांवर आपण फळं शोधण्याच्या आधीच उथल्या माकडांनी ती कधीच फस्त केलेली असतात. इथं काळ्या आणि लाल तोंडाच्या माकडांचे टोळके दिसतात. वीस-पंचवीस मिनिटांतच आपण दोन टेकड्यांच्या खिंडीत येऊन पोहोचतो. खिंडीत पोहोचताच एक दगडी तटबंदी असलेली भिंत आपल्या समोर येते. ही तटबंदी डावीकडच्या टेकडीवर सलग जाऊन त्याबाजूला एक गोलाकार मोठा बुरूजही दिसतो. ही तटबंदी खिंडीतून आपलं लक्ष वेधून घेते. उजवीडच्या उभ्या कातळकड्यात काही गुंफा कोरलेल्या दिसून येतात. ही पाण्याची टाकी असून त्यात बारमाही पाणी आढळतं.
काही तर वरच्या भागात अशी कोरलेली आहेत की या टाक्यांपर्यंत जाण्यासाठी कातळातच मार्गही खोदलेला आहे. इथंच एक खुरटं असं चिंचेचं झाड दिसतं. त्याच्या जवळच कातळाला पांढरा रंग फासलेला आहे. या ठिकाणी पीरबाबाचं ठिकाण असल्याचं गावकरी मानतात. त्याला नवस बोलून कंदूरी करण्याची प्रथाही इथे आहे. कंदुरी म्हणजे बोकडबळी देऊन फेडलेला नवस. ही कंदूरीची प्रथा सटाण्याच्या अंतापूरला दर्ग्यात मोठ्या प्रमाणावर पहायला मिळते. असो. आपणही पीराला नमस्कार करून नाही बोकड, तर निदान आपल्या डब्यातली चटणी-भाकरी, पोळी भाजी चवीनं खायची आणि टाक्यातलं थंडगार पाणी पिऊन पुन्हा खिंडीत यायचं अन् गडमाथ्यावर चक्कर मारायची.
किल्ल्याच्या उजवीकडील व डावीकडील भाग थोडा उंचावलेला असल्यानं त्यामध्ये खोलगट भाग तयार झालेला आहे. इथंच दगडी तटबंदी बांधलेली आहे. इथून थोडं पुढे सरकलं, की तटबंदी असलेल्या प्रवेशद्वाराचे अवशेष दिसतात. किती सुंदर प्रवेशद्वार असेल याचा अंदाज ढासळलेल्या कोरीव दगडांवरून लावता येतो. थोडं निरखून बघत राहीलं तर भूतकाळातला भव्य चिरेबंदी दरवाजा आपल्यासमोर उभा राहतो. ‘बा अदब… बा मुलाहिजा..’ अशी हाक जरी कुणी दिली नाही तरी या प्रवेशद्वारातून आदबीने प्रवेश करायचा. इथं उजव्या रांगेत काही पाण्याचे टाके आढळतात. काही कोरडी तर काही मातीने भरलेली. त्यानंतर एक घराचं जोतं आणि त्याच्या वरच्या बाजूला म्हणजे उजवीकडील उंचवट्यावर एका घराचे अवशेष दिसतात.
घराचे अवशेष पाहून गडाच्या पूर्व बाजबने निघत गोल फिरायचं. पूर्व बाजूकडे खाली उतरून दरीच्या काठावर यायचं. इथं. पाण्याच्या पाच टाक्या खोदलेल्या आहेत. त्यापैकी काही टाक्यांतलं पाणी पिण्यायोग्य आहे. इकडून आजुबाजूचे ठेंगणे ठुसके डोंगर न्याहाळायचे. सपाट मैदानावर उठावलेल्या छोट्याछोट्या टेकड्यांमध्ये गाळणा किल्ला शोधून काढायचा. गडफेरी तशीच चालू ठेवत पुन्हा खोलगट भागाकडे म्हणजे खिंडीत परतायचं. आता डावीकडील उंचवट्याच्या भोवतालची तटबंदी बघत प्रदक्षिणा मारायची. याच्या वरच्या भागात काही जोती आढळतात. बाकी तटबंदीशिवाय काही नाही. इकडून लांबवर नजर भिरकवली तर आपल्या ओळखीचे डोंगर-किल्ले भेटतात का ते शोधायचं.
कंक्राळा दुर्गावरची तटबंदी, बुरूज, पाण्याच्या टाक्यांची रांग, घरांचे अवशेष, विखूरलेली जोती असा सर्व पसारा बघून इथं पूर्वी नक्कीच चांगला राबता असणार यात शंका नाही. पण इतिहासात मात्र कंक्राळ्याची पानं सापडत नाहीत. पण लळींग, गाळणा या परगण्यांप्रमाणे असणाऱ्या किल्ल्यांमध्ये ‘कंक्राळा’ असं बुलंद नाव घेऊन हा किल्ला मानाने उभा असलेला दिसतो.