इंडिया दर्पण विशेष – भन्नाट – रिव्हिगो
“ट्रक ड्रायव्हर देखील सकाळी कामावर जाऊन संध्याकाळी आपल्या घरी परत येऊ शकतो” विश्वास बसत नाही ना, पण ही गोष्ट खरी करून दाखवली आहे रिविगो यास स्टार्टअप कंपनीने आणि यातून शेकडो कोटींचा व्यवसाय देखील यशस्वीरित्या उभा केला आहे दीपक गर्ग आणि गझल कालरा यांनी. याच अनोख्या स्टार्टअपची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत.

(लेखक व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आहेत)
दीपक गर्ग मॅकेंझी कन्सल्टन्सी या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये एका दशकापासून अधिक काळ काम करत होता. भारतीय अर्थव्यवस्थेचा त्याचा बारकाईने अभ्यास होता आणि त्यातच दळणवळण व ऑटोमोबाइल क्षेत्र या संबंधित संशोधनाचे काम त्याच्याकडे असत. आणि असेच संशोधन करत असताना त्याच्या एक लक्षात आलं की भारतीय अर्थव्यवस्था ज्या पटीने वाढते आहे त्याच गतीने ट्रक ची विक्री होत नाही. हे त्याच्या साठी आश्चर्यकारक होतं. करण गतिमान पद्धतीने वाढती अर्थव्यवस्था व दळणवळणाच्या वाढत्या गरजा असून देखील ट्रकच्या मागणीमध्ये वाढ का होत नाही याचा अभ्यास करू लागला.
यासाठी त्याने अनेक ट्रक मालकांची भेट घेतली तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं मागणी असून देखील ट्रक ड्रायव्हर उपलब्ध होत नसल्याने नवीन ट्रक विकत घेण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही. एकीकडे जनसंख्या सोबतच वाढती बेरोजगारी आहे तर दुसरीकडे ड्रायव्हिंग कौशल्य असलेले ट्रक ड्रायव्हर मिळत नाही हा विरोधाभास का? आणि या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्याने आपल्या नोकरीतून काहीकाळ रजा घेऊन स्वतः प्रवास करण्याचं आणि ट्रक ड्रायव्हर ची प्रश्न समजावून घेण्याचा निर्णय घेतला.

त्याच दरम्यान दीपक च्या मित्राची पत्नी गझल कालरा ही व्यवस्थापन व समाज धोरणे या विषयात उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेतून भारतात परतली होती. दीपक असं काही करणार आहे हे आपल्या पतीकडून समजल्यानंतर तिने दिपकची भेट घेण्याचा निर्णय घेतला. आणि दोघांचेही विचार आणि संशोधनाच्या अभ्यासाचे विषय जुळतात असे लक्षात आल्यावर दोघांनीही अभ्यास सोबत करण्याचं ठरवलं. दोघेही भारतीय हायवे वरील ट्रक ड्रायव्हर्स च्या भेटी घेऊ लागले. आणि त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी जाणून घेऊ लागले. यासोबतच गावोगावच्या तरुण बेरोजगारांना भेटून ट्रक ड्रायव्हर चे काम का करत नाही असा देखील प्रश्न त्यांनी विचारला. यावर मिळालेले उत्तर फारच निराशाजनक होते. अनेकांच्या मते ट्रक ड्रायव्हर होणे म्हणजे आपले आयुष्य रस्त्यांवरच काढणे होय तर काहींच्या मते ट्रक ड्रायव्हर चे काम करणे हे अतिशय हलके समजले जाणारे काम आहे.
ट्रक ड्रायव्हर्स चे प्रश्न जाणून घेत असताना काही प्रमुख आढळलेले मुद्दे पुढील प्रमाणे. ट्रक ड्रायव्हर वर्षातून केवळ तीन-चार वेळेलाच आपल्या घरी येऊ शकतात, ट्रक ड्रायव्हरच्या आयुष्यात जोखीम फार मोठ्या प्रमाणात असते, ट्रक ड्रायव्हर्स विवाह साठी मुलगी कोणी देत नाही, एच आय व्ही सारख्या संसर्गजन्य रोग आणि मुळे अनेक ट्रक ड्रायव्हर्स त्रस्त असतात, जास्त अंतर कमी वेळेत प्रवास करण्यासाठी मालकांकडून दिले जाणारे प्रेशर आदी.
समाजातील बेरोजगारांचे आणि ट्रक ड्रायव्हर प्रश्न समजून घेतल्यानंतर गझल आणि दीपक यांनी ट्रक ड्रायव्हर्स च्या जीवनात आमूलाग्र व मानवी बदलण्याचा निर्णय घेतला. आणि यातूनच आपला स्वतःचा व्यवसायदेखील उभा करण्याचा मार्ग शोधला.

यांच्या मते जर आपण ट्रक ड्रायव्हरला त्याच दिवशी घरी पाठवू शकलो तर त्याच्या आयुष्यातील बहुतांश प्रश्न सुटतील ट्रक ड्रायव्हर देखील एका सामान्य माणसा प्रमाणे आपले जीवन व्यतीत करू लागतील. आणि यातून उभी राहिली रिविगो नावाची लॉजिस्टिक्स स्टार्टअप कंपनी.
2014 साली स्थापन झालेल्या या कंपनीचे पहिले उद्दिष्ट म्हणजे ट्रक ड्रायव्हर एका टप्प्यात जास्तीत जास्त चार ते पाच तासांचा प्रवास करेल. याकरता एका ट्रकच्या पुर्ण प्रवासाला एक ड्रायव्हर अशी व्यवस्था न लावता संपूर्ण रूट वर प्रत्येक साडेचार तासाच्या अंतरावर म्हणजेच सुमारे 70 किलोमीटर अंतरावर रिविगोचे सेंटर असेल. या सेंटरला पोहोचल्यानंतर ड्रायव्हर बदली होतील आणि पहिला ड्रायव्हर 45 मिनिटांची विश्रांती घेऊन पुन्हा दुसऱ्या ट्रकवर आपल्या घराकडे परत येईल. म्हणजे दोन्हीकडचा प्रवास गृहीत धरता दहा तासांपेक्षा जास्त दिवसाला घराबाहेर राहावे लागणार नाही. आणि यामुळे ड्रायव्हरच्या आयुष्यातील बहुतांश प्रश्न सुटतील या विश्वासावरच या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
रिविगो यांच्यासमोर इतर ट्रक्स भाड्याने घेऊन त्यांचा वापर करण्याचा देखील मार्ग उपलब्ध होता. परंतु दुसऱ्याच्या ट्रक्सवर दुसरे ड्रायव्हर्स आणि तेही वेगवेगळ्या ठिकाणाहून येतील. यामुळे कंपनीला भांडवल कमी झाले असते परंतु ड्रायव्हरची जीवन सुधारण्याचा मूळ उद्देश पूर्ण झाला नसता. आणि म्हणून कंपनीने स्वतःच्या ट्रक्स विकत घेण्याचा निर्णय घेतला.










