कोरोनाच्या संकटाने पिण्याच्या पाण्याच्या व्यवसायाची कंबर तोडल्यानंतर देखील अतिशय जोमाने आणि पूर्ण जिद्दीने एका नव्या व्यवसायासकट उभे राहिलेल्या पंजाबातील या दोन्ही बंधूंबाबत आणि त्यांच्या भन्नाट ग्रुवी जुसेस ह्या स्टार्टअप बद्दल आज आपण जाणून घेऊया….
“आपली सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी करू नये” वॉरेन बफे यांचा गुंतवणुकीबद्दलचा हा सल्ला अतिशय तंतोतंत खरा ठरला आहे. पंजाबातील या बंधूंबाबत. उत्तर भारतात कंपन्या व हॉटेल्सला ड्रिंकिंग वॉटर पुरविण्याचा मीटकरण सिंग आणि रजनीश शर्मा या बंधुंचा व्यवसाय होता. परंतु या कोरोना संकटामुळे त्यांचे अनेक ग्राहक तुटले. सर्व प्रकारचे उत्पन्न बंद झालेले असताना मात्र एका नवीन व्यवसायात त्यांनी आधीच गुंतवणूक करुन ठेवली होती. त्यामुळे संकटकाळातही ते भरभराटीला आले आहेत. कोट्यवधींचा व्यवसाय केवळ एकाच वर्षात करण्याची किमयाही त्यांना साधता आली आहे.
या दोन्ही बंधूंचे अनेक नातेवाईक कॅनडा व अमेरिकेसारख्या देशांमध्ये स्थायिक आहेत. हे लोक ज्यावेळी भारतात परत येतात, तेव्हा इतर देशांप्रमाणे भारतात ताजा व उत्तम दर्जाचा फळांचा ज्यूस सहज उपलब्ध होत नाही. तशी तक्रार ते वारंवार या दोघांकडे केली होती. खासकरून द्वितीय किंवा तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये व ग्रामीण भागात तर फळांचा ज्यूस मिळणं म्हणजे अगदी दुर्लभ बाब. या गोष्टीवर खरोखर व्यावसायिकदृष्ट्या या दोन्ही बंधूंनी विचार करण्यास सुरुवात केली होती. यात केवळ प्रश्न सोडवणे नसून एका मोठी व्यवसायाची संधी या दोघांनी पाहिली. म्हणूनच ऑगस्ट २०१९ साली फळांचा ताजा ज्यूस काढणारे व त्याचे पॅकेजिंग करणारी मशिनरी केवळ दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून त्यांनी मागवली होती. ही सर्व मशिनरी चीनमधून आयात करण्यात आली.
जानेवारी महिन्यात मशिनरी येऊन पोहोचल्यानंतर फेब्रुवारी अखेर किंवा मार्चमध्ये चीन मधील काही इंजिनीअर्स त्याचे इन्स्टॉलेशन व त्याची कार्यप्रणाली समजावून सांगणार होते. परंतु २०२० मध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असल्याकारणाने परदेशातून भारतात येण्या-जाण्यावर बंधने आली. त्यामुळे चीनमधून येणारे सर्विस इंजिनिअर्स यांचे येणे अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आले.
मशिनरी येऊन पडलेली असताना देखील तिचा उपयोग करता येत नाही, ही खंत दोन्ही बंधूंना फारच त्रास देत होती. मशिनरी सोबत आलेले माहिती पुस्तक देखील संपूर्णपणे चिनी भाषेतील असल्यामुळे ते वाचताही येत नव्हते आणि मशिनरीचे इन्स्टॉलेशन किंवा कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी काहीही उपयोग होत नव्हता. चीनी कंपनीशी फोनवरून व ई-मेलद्वारे संपर्क करण्याचा त्यांनी भरपूर प्रयत्न केला. परंतु ई-मेल व फोन द्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांना विशिष्ट मर्यादा असतातच.
तेव्हा या दोन्ही बंधूंनी आपणच आपला मार्ग शोधण्याचा निश्चय केला. त्या मशिनरीचे फोटो व सोबतते माहिती पुस्तक घेऊन उत्तर भारतातील अनेक इलेक्ट्रॉनिक्स व प्रोग्रामिंग कंपन्यांमधील इंजिनिअर्सच्या भेटी घेतल्या. प्रत्येकाकडून त्यांना थोडी-थोडी माहिती मिळत होती. तंत्रज्ञान कसे काम करते या बद्दलचे ज्ञान देखील प्राप्त होत होते. तब्बल १०० हून अधिक कंपन्यांचे उंबरठे झिजवल्यानंतर यांच्याकडे जी माहिती प्राप्त झाली ती अनेक अपूर्ण तुकड्यांसारखी होती. अशा पद्धतीने गोळा केलेल्या माहितीची जुळवाजुळव आणि हे छोटे मोठे तुकडे जोडून त्यांनी संपूर्ण आराखडा तयार केला. व भारतीय इंजिनिअर्स आणि स्वतःची बुद्धिमत्ता यांच्या जोरावर त्यांनी आयात केलेल्या या संपूर्णपणे चायनीज मशीनचे कोडींग व प्रोग्रामिंग स्वतः केले व अवघ्या काही दिवसांमध्येच ते उत्पादनासाठी सज्ज झाले.
पूर्वीचा व्यवसाय हा जरी पाण्याचा असला तरी त्यात सर्व ग्राहक हे कारखानदारच होते. परंतु या कोरोनाच्या परिस्थितीमुळे कारखान्यांकडून येणारी मागणी जवळजवळ थांबली होती. त्याचवेळेला या बंधूंना असं लक्षात आलं की, जर तुमचं प्रॉडक्ट हे सरळ थेट ग्राहकापर्यंत पोहोचणार असेल तर नफा जरी कमी मिळाला किंवा खर्च जरी जास्त झाला तरी व्यवसाय थांबत नाही. कारण लोकसंख्येच्या हिशोबाने तुमचा खप कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने घडत असतो. म्हणूनच अॅडमिट परिस्थिती असताना देखील त्यांनी आपला हा व्यवसाय जोमाने पुढे नेण्याचं ठरवलं.
एकीकडे मशीन जुळवाजुळव करण्यासाठी यांचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र फळांची खरेदी कुठून करायची, कशा पद्धतीने कंपनीपर्यंत आणायचे, किती भावामध्ये, कुठल्या शेतकऱ्यांकडून कसे मिळवायचे, या गोष्टींचा देखील संपूर्ण अभ्यास आणि तशी योजना या दोन्ही बंधूंनी आधीच लावून ठेवली होती. त्यामुळे मशीन तयार झाल्यानंतर त्यांना लगेच उत्पादन व विक्री सुरू करता आली. १ एप्रिल २०२० मध्ये ग्रुवी ज्यूस या नावाने त्यांनी ताज्या फ्रूट ज्यूसचा ब्रँड लॉन्च केला.
सर्वच स्टार्टअप्स या ऑनलाईन पद्धतीनेच आपला व्यवसाय मोठ्या करण्याच्या मागे असतात. परंतु ग्रुवी ज्यूस यांनी सुरुवात ही संपूर्णपणे ऑफलाईनच केली. हे ज्यूस विकण्यासाठी त्यांनी दिल्ली, मुंबई, बंगळुरु सारख्या बड्या शहरांना टार्गेट अजून देखील केलेले नाही. त्यांना हे ज्यूस लहान शहर व ग्रामीण भागामध्ये अतिशय माफक दरात उपलब्ध करून द्यायचे आहेत. म्हणूनच त्यांनी ऑफलाईन मोड निवडला. दोन्ही बंधू स्वतः व आपले डिस्ट्रीब्युटर्स यांना उत्तर भारतातील गावोगावी पाठवले. त्यांनी आपले प्रॉडक्ट सगळ्यांच्या दृष्टीस आणून दिले. सतत फॉलोअप घेऊन विक्री करण्यास प्रवृत्त केले.
एकूण २७ विविध फ्लेवर्स पैकी पाच प्रमुख व लोकप्रिय फ्लेवरची निवड करण्यात आली. सुरुवातीला केवळ या पाचच प्रॉडक्टचे उत्पादन सुरू केले. मध्यम, लहान शहर व ग्रामीण भागात हे प्रॉडक्ट सगळ्यांना परवडणारे असावे म्हणून १५० मिली चे पाऊच केवळ दहा रुपये किंमतीत त्यांनी विक्रीस आणले. शुद्ध फळांचा ताजा रस व केमिकल विरहित मिश्रण या आपल्या वैशिष्ट्यांवर त्यांनी आपले प्रॉडक्टचे मार्केटिंग देखील याच भागांमध्ये केले. अवघ्या काहीच महिन्यात त्यांचा हा व्यवसाय पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान व काही अंशी गुजरात पर्यंत येऊन पोहचला. आपल्या सर्वच डिस्ट्रीब्युटर्सकडे त्यांनी स्वतः भेटी दिल्या. त्यांचा प्रॉडक्टबद्दलचा विश्वास संपादन केला. कारण त्यांच्या मते जर तुमच्या विक्रेत्याचा तुमच्या प्रॉडक्टवरच विश्वास नसेल तर तो ते प्रोडक्ट कधीही विकू शकत नाही.
केवळ १० लाख रुपये गुंतवणुकीतून सुरू केलेला हा व्यवसाय फक्त १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल १५ कोटी रुपयांच्याही पुढे गेला आहे. पहिल्याच वर्षी नफ्यात असलेल्या या कंपनीला साधारण पंधरा ते वीस टक्के मार्जिन देखील प्राप्त होत आहे. आज जरी हे प्रोडक्ट ऑनलाइन उपलब्ध नसले तरी नजिकच्या काळामध्ये ऑनलाईन जाण्याचा त्यांचा मानस आहे. लोकप्रियता वाढावी व लोकांनी एकदा तरी अनुभव घ्यावा म्हणून त्यांनी दहा रुपयांचीच किंमत ठेवली आहे. हळूहळू मोठ्या पॅकेटमध्ये व जास्त किमतीचे प्रॉडक्ट बाजारात आणण्याचा त्यांचा विचार आहे. तसेच हळूहळू मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये व भारतभर आपल्या प्रॉडक्टचा विस्तार करण्याचा कंपनीचा मानस आहे. या सर्व विस्तारा करता अजूनही कुठल्या गुंतवणुकीचा धनी न झालेली ही कंपनी गुंतवणूक घेण्याचा विचार करु शकते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!