क्योर इट
भारतीयांना त्यांच्या बदलत्या जीवनशैलीत अत्यंत महत्त्वाची मदत करणारे हे स्टार्टअप सुरू केले दोन मित्रांनी. पाहता पाहता ते अतिशय लोकप्रिय झाले आणि या स्टार्टअपची उलाढालही कोट्यवधीत गेली आहे. आज जाणून घेऊ या भन्नाट स्टार्टअप बद्दल..
भारतीयांना हेल्दी लाइफस्टाइलची सवय पूर्वीपासूनच होती. मधल्या काळामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे लक्ष देणं कमी झालं होतं. पण आता पुन्हा नव्या पिढीने हेल्थ आणि फिटनेस याकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे. याच गोष्टीचा फायदा घेत मिंत्राचे माजी सीईओ मुकेश बन्सल आणि फ्लिपकार्टचे माजी बिझनेस ऑफिसर अंकित नागोरी यांनी क्योर फिट या स्टार्टअपची स्थापना जुलै २०१६ मध्ये केली. मुळात दोघांचाही फिटनेस हा जिव्हाळ्याचा विषय. म्हणूनच याच क्षेत्रात त्यांनी आपल्या नव्या स्टार्टअपचे स्वप्न पाहिले. भारतात फिटनेस या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली मोठी कंपनी नव्हतीच. त्यामुळे या दोघांनी सर्व प्रकारचे फिटनेस सोल्यूशन्स एकाच छताखाली देण्याचा आगळावेगळा विचार या स्टार्टअप मधून मांडला.
क्योर फिटचा ग्राहक ठरलेला होता. त्यांना कुठलेही बॉडी बिल्डर्स घडवायचे नव्हते. तर केवळ एका सामान्य माणसाला फिट व निरोगी राहण्यासाठीचे मार्गदर्शन व सर्व सुविधा पुरवायच्या होत्या. आता त्यांचा विचार सुरू झाला तो फिटनेस मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी यायला हव्यात. त्याची सुरुवात होते ती व्यायामासाठी लागणाऱ्या फिटनेस स्टुडिओ पासून. णूनच त्यांनी सुरुवातीला केवळ हेल्थ सेंटर किंवा फिटनेस क्लब वर भर दिला.
व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी स्वतःचे सगळे सेटअप उभे करण्यात फार मोठा वेळ गेला असता. त्यातील एक्सपर्टीझ डेव्हलप करण्यात खर्च आणि वेळ गुंतवावा लागला असता. म्हणून त्यांनी वेळ घालवण्यापेक्षा योग्य ती किंमत देऊन फिटनेस स्टुडिओच्या दोन चेन विकत घेतल्या. बेंगळुरू मधील सुप्रसिद्ध कल्ट आणि ट्राइब या प्रस्थापित फिटनेस स्टुडिओ किंवा जिम्नॅशियम यांनाच खरेदी केले. मालकी हक्क बदलताना त्यांनीच गेल्या काही सिस्टिम बदलल्या. परंतु तिथले ट्रेनर्स व इतर सर्व स्टाफ यांना विश्वासात घेऊन त्यात कुठलीही कपात केली नाही. या क्लब मेंबरशीपवर चालतात. केवळ जिमच्या मेंबरशीप सोबतच इतर अनेक सुविधा दिल्या जातात. जसे सोशल नेटवर्क, काही एकत्रिकरणाचे उपक्रम, एकमेकांना मदत करण्याची व एकमेकांकडून मदत घेण्याची सुविधा. यामुळे लोकांना जिम हे केवळ व्यायाम करण्याचे केंद्र राहिले नसून तिथे अनेक नवे मित्र-मैत्रिणी जोडले जातात. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढतच गेली.
अवघ्या सव्वा वर्षांमध्ये कंपनीने आपली गुंतवणूक परत मिळवली. इथून पुढे होणारे उत्पन्न केवळ नफा होता. बेंगळुरू सकट इतर मेट्रो शहरांमध्ये त्यांनी आता आपलं नेटवर्क उभं केलं. २०१७ मध्ये त्यांनी आपले ॲप लॉन्च केले. या ॲप मधून मेंबरशीप घेणे, फी भरणे, बॅच बुक करणे, या क्षणाला जिम मध्ये किती लोक आहेत त्याचा अंदाज घेणे त्याप्रमाणे गर्दीचा अंदाज घेऊन जाणे अथवा न जाण्याबद्दल निर्णय घेणे अशा अनेक सुविधा आपल्या ग्राहकांना प्राप्त करून दिल्या.
त्यांच्यामते फिटनेससाठी व्यायामा सोबतच आहार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि हे पटवून देताना त्यांनी २०१७ मध्ये क्रिस्टी किचन नावाची एक हेल्दी डाएट पुरवणारी कंपनी विकत घेतली. यासोबतच ऑपिनियो ही फूड डिलिव्हरी करणारी कंपनी विकत घेतली. इट फिट या नावाखाली त्यांनी आपले हेल्दी फूडचे काम सुरू केले. आपल्या ॲप वरूनच तुम्ही हवं तेव्हा, हवे त्या हेल्दी फूडची डिश ऑर्डर करू शकता. ताजी आणि कमीत कमी वेळेमध्ये घरपोच मिळत असल्याने ते लोकप्रिय बनले. कमीत कमी वेळेत ताजे अन्न पुरविण्यासाठी त्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात क्लाऊड किचन स्थापन केले. इट फिट जरी शहरातील सर्वांसाठी हेल्दी फूड पुरवीत असले तरीदेखील बहुतांश उत्पन्न हे त्यांच्या क्योर फिट या जिम मेंबर्सकडूनच येत होते. ताजा अन्न पुरवठा यासोबतच त्यांनी लवकरच आपले पॅकेज देखील तयार केले. विविध शहरांमध्ये ते सप्लाय करायला सुरुवात केली.
लोकांची बदलती जीवनशैली, आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे शिफ्ट टायमिंग, दीर्घकाळ ऑफिसची करावी लागणारी कामे यामुळे ठरलेल्या वेळी मध्ये जिमला येऊन सर्वांनाच व्यायाम करणे शक्य होत नाही. हे लक्षात येताच त्यांनी कल्ट फिट नावाची सेवा सुरू केली. ह्या सुविधेमार्फत ग्राहकांना घर बसल्या व्हिडिओ कोर्सेस व ऑनलाइन माध्यमातून झुंबा, कराटे, ऐरोबिक्स, योगा अशा सर्व प्रकारचे व्यायाम करता येतात. म्हणजे तुमच्या वेळेनुसार, सोयीनुसार, कामाच्या ठिकाणी किंवा घरी बसून देखील तुम्ही सर्व प्रकारचे व्यायामाचे प्रकार शिकू शकता. धिकृत ट्रेनर सोबत प्रॅक्टिस करू शकता.
केवळ शारीरिक व्यायाम व आहार यासोबतच मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन, माइंड फिट नावाची एक सेवा कंपनीकडून २०१७ मध्ये सुरु करण्यात आली. यामार्फत योगा, मेडिटेशन व तत्सम गोष्टींची सेवा सुरू झाली. माईंड फिट हे त्यांच्या जिम मध्ये देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन ॲप वरून देखील त्याचा एक्सेस मिळू शकतो. माइंड फिट सुरू करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा एका योगा शिकवणाऱ्या कंपनीला विकत घेतले. माइंड फिट हे त्यांच्या दृष्टीने अतिशय कमी खर्चामध्ये चालणारे आणि अतिशय उत्तम उत्पन्न मिळवून देणारे असे केंद्र ठरले.
उत्तम आरोग्यासाठी नियमित आरोग्य तपासणी होणे देखील तितकेच गरजेचे आहे. म्हणून त्यांनी केअर फिट नावाची शाखा २०१८ मध्ये सुरू केली. या मार्फत आपल्या ग्राहकांसाठी अतिशय माफक दरामध्ये हेल्थ चेकअप प्लॅन्स उपलब्ध झाले. केअर फिट नावाच्या या सेवेतून ग्राहकांना ठराविक कालावधीनंतर सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या करून दिल्या जातात. या सोबतच त्यांना कुठले व्यायाम उपयुक्त आहेत, कुठले नाही, कुठल्या प्रकारचा आहार घ्यायला पाहिजे, कुठली औषध, सप्लीमेंट त्यांना फिट राहण्यास मदत करतील हे सर्व मार्गदर्शनही दिले जाते. ही सेवा पुरवण्यासाठी कंपनीमार्फत डॉक्टर्स, डाएटीशियन यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कंपनीच्या उत्पन्नाचा बहुतांश भाग त्यांच्या जिम मेंबरशीप मधून येतो. त्याखालोखाल हेल्दी फूड सर्विस व इतर सर्विसेस मधून येतात. कंपनीच्या एकूण खर्चापैकी ८४ टक्के खर्च हा केवळ कर्मचाऱ्यांचे पगार करण्यातच जात आहे. कंपनीने अतिशय कमी कालावधीत वेगवेगळ्या क्षेत्रातून संपूर्ण फिटनेस या विषयाला आपले केंद्र स्थान बनवले. या सर्व सुविधा पुरविणारी कंपनी बनली आहे. कंपनीला ८०० कोटीहून अधिकची गुंतवणूक सिंगापूर मधील गुंतवणूकदारांकडून, एक्सेल पार्टनर्स यांच्याकडून १०० कोटी, यादी डेटा ऑफ आणि इतर काही गुंतवणूकदारांकडून सुमारे ५० कोटी गुंतवणूक प्राप्त झाली आहे.
टाटा ग्रुप सारखे नावाजलेले भारतीय-उद्योजक देखील या कंपनीला विकत घेण्याच्या विचारात आहे. कंपनीचे प्रमोटर मुकेश बन्सल यांना देखील टाटा ग्रुप मध्ये एका उत्तम पदावर घेण्याच्या विचारात आहेत. सर्व प्रकारच्या फिटनेस संबंधित सेवा पुरविणाऱ्या पहिल्यावहिल्या भारतीय स्टार्टअपची ही घोडदौड कोरोना काळात देखील अशीच अविरत सुरु आहे. किंबहुना डिजिटल प्लॅटफॉर्मवर २०१७ पासून असल्यामुळे कोविड सारख्या महामारीचा त्यांच्यावर फारसा परिणाम होऊ शकला नाही. यातूनच आपण तंत्रज्ञानाचे व कंपनीच्या प्रमोटर्सच्या दूरदृष्टीचे महत्त्व समजून घेऊ शकतो.