गाड्यांवरील प्रेमापोटी त्याने व्यवसाय म्हणून हेच क्षेत्र निवडले. आणि पाहता पाहता त्याचे हे स्टार्टअर अतिशय यशस्वी झाले. आज त्याच्या या उद्योगाचा चांगलाच बोलबाला आहे. कसं घडलं हे सगळं हे सांगणारी ही यशोगाथा…
जतीन अहुजा ला वयाच्या दहाव्या वर्षापासूनच कारची फारच हौस. त्याच्या लहानपणी त्याचे खेळणे म्हणजे केवळ कारच. आणि ह्याच गाड्यांच्या प्रेमापोटी त्याने बारावी सायन्स केल्यानंतर बी टेक मेकॅनिकल ला ऍडमिशन घेतली. वडील दिल्लीतच नावाजलेले चार्टड अकाऊंट आहेत. त्यामुळे दिल्लीतच त्याने आपले बीटेक चे शिक्षण पूर्ण केले. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिल्लीतूनच त्याने पुन्हा एमबीएसाठी प्रवेश घेतला. एमबीएला प्रवेश मिळवला असला तरी त्याच्या गाड्यांबद्दलचे प्रेम काही कमी होत नव्हतं.
किंबहुना बीटेक नंतर त्याने गाड्यांच्या डिझायनिंग आणि त्यांच्या अंतर्गत मशिनरी बद्दल जाणून घेण्यासाठी काही ॲडिशनल कोर्सेस देखील केले. आणि आपलं करिअर हे गाड्यांमध्ये करायचं हा निर्णय त्यांनी अवघ्या वयाच्या बाराव्या वर्षीच घेऊन टाकला होता.
आपले बीटेक चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने वडिलांकडून ७० हजार रुपये उसने घेऊन आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली होती. २००२ मध्ये त्याने फियाट पोलो या नावाची सेकंड हॅन्ड कार अवघ्या ७० हजार रुपयात विकत घेतली. त्यावर बराच खर्च करून ती अगदी नव्यासारखी केली. पण बाजारात ती गाडी विकण्यासाठी गेले असता नुकसनात विकावी लागणार, अशी परिस्थिती होती. म्हणून त्याने ती गाडी स्वतःसाठीच ठेवून घेण्याचा निर्णय घेतला. हा अनुभवाचा चटका घेऊनच त्याचा एमबीएचा प्रवास सुरू झाला होता. आणि त्यामुळे एमबीएचे व्यवसायिक शिक्षण घेत असताना आपला व्यवसाय नेमका काय असावा व कसा असावा याकरता त्याने सतत ज्ञान मिळवले.
एमबीए चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचा व्यवसाय क्षेत्र जरी नक्की होतं तरी नेमकं सुरुवात कुठून आणि कशा पद्धतीने करावी याचा मार्ग मात्र दिसत नव्हता. त्यात २००५ मधील महाभयंकर पाऊस व त्यामुळे मुंबई शहरात आलेला महापूर हे सर्व जतीनने जवळून पाहिलं. आणि याच पुरातून जतीन ला एक संधी चालून आली. मुंबईतील या पुरामध्ये खराब झालेली एक मर्सिडीज त्याला मिळाली. जतिन ने आपल्या सर्व कसब आता पणास लावले आणि त्या मर्सिडीज ला अगदी नव्या गाडी सारखा करून टाकलं. आणि ही गाडी ज्या वेळेला त्याने विकायला काढली तर त्याला ह्या गाडीमागे तब्बल २५ लाख रुपये नफा मिळाला.
यातून त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याने कुठे काही पैसे जमा होऊन मॅग्नस कार्स नावाची कंपनी सुरू केली. या कंपनी अंतर्गत त्याने विदेशी गाड्या इम्पोर्ट करून भारतीय ग्राहकांना विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याला चांगला नफा मिळत होता पण लवकरच या क्षेत्रात प्रत्यक्ष फॉरेन कंपन्यांचे डीलर उतरल्यामुळे याच्या व्यवसायावर फार मोठा परिणाम झाला. त्यामुळे हा व्यवसाय देखील त्याला लवकरच बंद करावा लागला.
पुन्हा मार्ग दिसत नसल्याने त्यांनी इतर व्यवसायात धुंडाळण्यास प्रारंभ केला. हे करत असताना फॅन्सी मोबाइल नंबर बद्दल लोकांना असलेले आकर्षण त्याला लक्षात आले आणि वोडाफोन कंपनी कडून स्पेशल नंबर असलेले बाराशे सिम कार्ड त्याने विकत घेतले. आणि केवळ हे सिम कार्ड विकुन त्याने 24 लाख रुपये कमावले. यातून त्याच्या डोक्यात असलेली कल्पकता आणि वेगळ्या पद्धतीने व्यवसाय करण्याची हातोटी आपल्याला लक्षात येते.
नवीन कार विकण्याचा व्यवसाय त्याला फार यश देऊ शकला नाही म्हणून निराश न होता नेमकी अडचण काय आहे व आपण ती कशी सोडवू शकतो यावर तो विचार करू लागला. या नवीन कारच्या व्यवसायामध्ये त्याला सगळ्यात मोठी अडचण येत होती की येणारा ग्राहक हा आपली जुनी कार एक्सचेंज करू इच्छित होता.
या विचारात असताना त्याला आपल्या २००५ मधील मर्सिडीज कार विक्रीतून आलेला अनुभव आठवला. आणि इथूनच त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली आणि ती कल्पना होती महागड्या कार्स सेकंड हँड विकण्याची. आणि यातूनच उगम झाला ‘बिग बोय टॉईज’चा. दिल्लीत त्याने आपलं पहिलंवहिलं महागड्या गाड्या सेकंड हॅन्ड विक्री करण्याचा दालन उघडलं. अनेक श्रीमंतांकडे असलेल्या जुन्या गाड्या एक्सचेंज करून त्यांना नवीन गाडी घ्यायची असते परंतु जुनी गाडी विकत घेण्यासाठी बाजारपेठ तशी उपलब्ध नव्हती. आणि म्हणून या व्यवसायातून अनेक मोठ्या कार धारकांचा मोठा प्रश्न मार्गी लागणार होता. सुरुवातीला मोजकेच पण तज्ञ मेकॅनिक घेऊन त्याने आपल्या व्यवसायाचा मुहूर्त केला. या कंपनीमध्ये मर्सिडीज ऑडी बेंटले रोल्स रॉयस फरारी व इतर सर्व आंतरराष्ट्रीय ब्रँडेड कार्स चे डिलिंग केलं जातं.
बिग बोय टॉईज मध्ये जुन्या महागड्या गाड्या विकत घेतल्या जातात आणि त्या रिफर्बिष करून म्हणजे त्याचे व्यवस्थित डागडुजी करून त्या पुन्हा विकल्या जातात. गाडी विकत घेतानाच या कंपनीचे काही निकष ठरले आहेत. १५१ प्रकारच्या विविध टेस्टमधून या गाडीला जावं लागतं. वीस हजार किलोमीटरपेक्षा गाडी जास्त फिरलेली नसावी व पाच वर्षापेक्षा जुनी गाडी नसावी. त्यामुळे सेकंड हॅन्ड गाड्यांच्या परफॉर्मन्स ची देखील गॅरंटी या कंपनीकडून दिले जाते.
जतीन च्या म्हणण्याप्रमाणे भारतात २५ लाख कोट्याधिष लोक आहेत. आणि या सगळ्यांसाठीच ब्रँडेड महागड्या गाड्या आजकाल चैनीची गोष्ट राहिली नसून ती एक गरज झालेली आहे. आणि म्हणून सतत गाड्या बदलत राहणे ही देखील एक हीदेखील एक स्टेटस ची खूण निर्माण झाली आहे. म्हणून केवळ एक दीड वर्षात गाडी बदलत राहणे हा ट्रेंड भारतभरातील श्रीमंतांमध्ये आलेला आहे. आणि ह्याच गोष्टीचा फायदा या कंपनीला होत आहे.
आपल्या पहिल्याच वर्षात या कंपनीने तब्बल सहा कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले होते. केवळ सात वर्षांमध्ये या कंपनीने अडीचशे कोटीची उलाढाल तर आजपर्यंत ५०० कोटी रुपयांच्या उलाढाली केव्हाच पार करून चुकली आहे. दिल्ली बंगलोर चेन्नई हैदराबाद मुंबई पुणे अशा मोठमोठ्या शहरांमध्ये या कंपनीने आपले शोरूम्स प्रस्थापित केले आहेत. या प्रत्येक शो रूम मधील गाड्यांच्या किमती या ५० लाख रुपयांपासून ४ कोटी रुपयांपर्यंतचा आहेत. सिनेजगतातील क्रिकेट विश्वातील आणि मोठमोठ्या उद्योजकांना पैकी अनेक जण हे या कंपनीचे रेग्युलर ग्राहक आहेत. रोहित शर्मा आयुष्या टाकिया विराट कोहली व अनेक बडे उद्योजक यांची नावे या कंपनीच्या ग्राहकांमध्ये आहेत.
कंपनीशी एकदा जोडला गेलेला ग्राहक हा पुन्हा पुन्हा आपली गाडी बदलून दुसरी गाडी घेण्यासाठी येत असतो. कंपनीचे कस्टमर पुन्हा याच कंपनीकडे येण्याचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक आहे. आणि यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे कंपनी आपण विकलेल्या गाड्या ह्या विक्री किमतीपेक्षा ६० टक्के किमती मध्ये विकत घेते. त्यामुळे पुढील गाडी घेण्यासाठी लागणारे अर्ध्याहून अधिक भांडवल हे ग्राहकाकडे तेथेच निर्माण होते. नजिकच्या काळात भारतातील इतर मोठ्या शहरांमध्ये प्रवेश करणे व त्यासोबतच आशिया खंडातील इतर देशांमध्ये आपला व्यवसाय विस्तार करण्याचा मानस या कंपनीचा आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!