अॅडिस्टर
जाहिरातींमुळे उत्पादन किंमतीपेक्षा देखील स्वस्त किंमतीमध्ये ग्राहकाला वर्तमानपत्र मिळते. हीच संकल्पना जर वह्यांमध्ये वापरली तर! विद्यार्थ्यांना प्रत्येक वही किमान ४० टक्के स्वस्त मिळेल. त्यासोबत कंपनीला देखील नफा होईल. याच संकल्पनेवर आधारित अॅडीस्टर या भन्नाट स्टार्ट अप बद्दल जाणून घेऊयात…
आयआयटी रूर्की मध्ये २०१० साली बीटेक साठी प्रवेश मिळाल्यानंतर शुभम अग्रवाल आणि त्याचा मित्र अनुभव गोयल या दोघांची मैत्री झाली. सोबत अभ्यास आणि इतर सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेणं अतिशय उत्साहाने सुरू झालं. पण मुळातच सेंसेर असल्या कारणाने या सर्व गोष्टी समजावून देखील त्यांच्याकडे पुष्कळसा वेळ उरत असे. आणि फावल्या वेळात देखील काही तरी सृजनशील करावं असं दोघांनाही वाटत असे. याच भावनेने त्यांनी स्वतःच एक स्टार्टअप सुरू करावं असा विचार केला. याकरता त्यांनी न्यूज पेपर मॅक्झिन मध्ये येणारे विविध स्टार्टअपचे आर्टिकल सातत्याने वाचण्यास सुरुवात केली. या सोबतच विविध बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन मध्ये स्वतः आणि प्रेक्षक म्हणून सहभागी होण्यास सुरुवात केली. त्या स्पर्धांमध्ये आलेल्या स्टार्टर्स बद्दल अभ्यास करताना त्यांच्या असे लक्षात आले की, स्टार्टअपची संकल्पना केवळ इनोव्हेटिव्ह असून चालत नाही तर त्यासोबत त्यात एक व्यवसाय उभा करण्याची क्षमतादेखील पाहिजे. म्हणजेच त्या संकल्पनेचा खऱ्या अर्थाने खराखुरा व्यवसाय निर्माण होण्याची क्षमता हवी.
एके दिवशी दोघे जण वर्तमानपत्र वाचत होते. त्यातील जाहिरातींचे उत्पन्न आणि विक्री याचा विचार मनात आला. तेव्हा त्यांनी आयआयटी मध्ये बातम्या प्रसिद्ध करणारे एक ऑनलाईन न्यूज पोर्टल सुरू केलं. आयआयटी मधील सर्वच प्रकारच्या बातम्या त्या पोर्टलवर हे दोघे प्रसिद्ध करत. अतिशय कमी कालावधी मध्ये ते लोकप्रिय देखील झाले. परंतु ही बाब त्यांच्या डीनला कळल्यावर, त्यांच्याकडून मात्र या गोष्टीसाठी विरोध करण्यात आला. कारण आयआयटी मधील बातम्या या बाहेर प्रसिद्ध होऊ नयेत अशी भूमिका संस्थेची होती.
पहिला स्टार्टअपचा प्रयत्न फसला. पण त्यांच्यातली जिद्द मात्र संपलेली नव्हती. किंबहुना यातून त्यांना अधिक जोमाने कामाला लागण्याची शक्ती मिळाली. पुन्हा त्यांनी वर्तमानपत्र हातात घेऊन विविध कंपन्यांबद्दल चर्चा सुरू केली. वर्तमानपत्राच्याच व्यवसायाची ते चर्चा करु लागले. वर्तमानपत्र विक्रीस कसे परवडते यावर त्यांचा खल सुरू होता. तेव्हा असं लक्षात आलं की, एका वर्तमानपत्राचे उत्पादन व वितरण शुल्क साधारण पंचवीस रुपये असते व त्याची किंमत एक दशांश इतकीच का घेतली जाते. कारण सर्व किंमत व नफा हे जाहिरातींमधून प्राप्त होत असतो.
अर्थात संपूर्ण वृत्तपत्र कंपनी सुरू करणं हे आपल्याला न जमण्यासारखं आहे. परंतु अशाच प्रकारचा दुसरा कुठला व्यवसाय आपण करू शकतो, यावर मात्र दोघांची चर्चा चांगलीच रंगली. त्यातूनच संकल्पना आली ती म्हणजे “अॅडिस्टरची”. म्हणजेच ऍड असलेले रजिस्टर. भारतात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात नोटबुक्स व रजिस्टर्स चा वापर होतो. मग या नोटबुक आणि रजिस्टर वरच आपल्याला जर जाहिरात करता आली तर. म्हणजे नोटबुक आणि रजिस्टर हे आपण तयार करून घ्यायचे व त्यावर जाहिरातदारांकडून जाहिराती देखील मिळवायच्या. जाहिराती असल्याकारणाने वह्यांची किंमत देखील अतिशय माफक करायची. जेणेकरून त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वाढेल.
या भन्नाट कल्पनेवर त्यांचे संशोधन कार्य म्हणजेच मार्केट रिसर्च सुरु झाला. यासाठी सर्वप्रथम त्यांना नोटबुकची छपाई, किंमत, उत्पादन शुल्क हे काढणं गरजेचं होतं. कॉलेज सुटल्यानंतर उर्वरित वेळेमध्ये दोघांनीही रूर्की शहरात फिरायचं आणि विविध प्रिंटर्स कडून आणि उत्पादकाकडून किंमती काढायच्या. हा रिसर्च करताना त्यांच्या असे लक्षात आलं की या किंमती आणि बाजारभाव यात फार मोठा फरक नाही. त्यामुळे त्यांना लहान-मोठ्या प्रिंटर्स कडून वह्या घेणं परवडणारं नव्हतं. तर त्यांना आता गरज होती एका मोठ्या पेपर मिलची. सुट्टीच्या दिवशी सहारनपुर येथील मोठ्या नोटबुक उत्पादकाकडे ते गेले. तिथे त्यांना अपेक्षित असलेल्या दरामध्ये वह्या उपलब्ध होत्या.
आता गरज होती जाहिराती मिळवण्याची. केवळ महाविद्यालयीन विद्यार्थी जाहिरात गोळा करत आहेत हे पाहून यांच्यावर विश्वास ठेवण्यास कोणी तयार होईना. पण तरीही सुरुवातीला एक कापड व्यापारी तयार झाले. पहिल्या लॉटमध्ये दीड हजार वह्यांवर या जाहिराती छापून तयार झाल्या. पहिलावहिला प्रोजेक्ट असल्याकारणाने त्यांनी शहरामध्ये वह्या मूळ किंमतीच्या केवळ ४० टक्के किंमतीत विकल्या. त्यामुळे त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला. यापैकी उर्वरित वह्या त्यांनी त्यांच्या आयआयटी रूर्की मध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत वाटल्या. विशेष म्हणजे वह्या मोफत वाटूनही नफाच झाला होता.
ही बाब देखील त्यांच्या डीनला कळताच या व्यवसायावर देखील बंदी आली. आता या गोष्टीसाठीचे कारण विचारले असता तुम्ही कॅम्पसमध्ये कुठेही व्यवसायिक काम करू शकत नाही, असे उत्तर देण्यात आले. परंतु आणि वह्यांची विक्री कॅम्पस मध्ये केली नसून त्या मोफतच वाटल्या, असे सांगितल्यावरही त्यांना हे बंदच करावे लागले. त्यामुळे आता त्यांनी कॅम्पसच्या बाहेरच तेवढा हा व्यवसाय वाढवण्याचे ठरवले.
विविध व्यावसायिक व कंपन्या यांच्याकडून जाहिराती मिळविण्यास सुरुवात केली. कॉलेज जीवनामध्ये तेच त्यांचीही स्टार्टअप अतिशय गतिमान पद्धतीने धावू लागली. व्यवसाय वाढीसाठी लागतो तो पैसा. दोघेही विद्यार्थीदशेत असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात पैसा त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता. केवळ तीस हजार रुपयांच्या आपल्या पहिल्या गुंतवणुकीवर होऊन त्यांनी हळूहळू आपला व्यवसाय वाढविण्यास सुरुवात केली.
दिल्ली आणि इतर अनेक शहरांमध्ये होत असलेल्या स्टार्टअप कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी भाग घेण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी विजय देखील झाले. याच स्पर्धांमधून मिळणारी बक्षिसाची रक्कम ते आपल्या व्यवसायात गुंतवू लागले. अनेक मोठमोठ्या शिक्षण संस्था व गुगल, इन्फोसिस सारख्या कंपन्या स्टार्टअप कॉम्पिटिशन घेत असतात. अशा प्रत्येक स्पर्धेकडे या दोघांनी उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून पाहण्यास सुरुवात केली. अनेकदा क्लासमध्ये असताना देखील त्यांना दुकानदारांची किंवा वह्या सप्लाय करणाऱ्यांचे फोन येत. त्या वेळेला आम्ही नंतर फोन करतो, अशीच उत्तरे देऊ लागले. कारण विद्यार्थी आहेत असं सांगितल्यानंतर समोरील व्यक्ती व्यवसाय करण्यास फारशा उत्सुक नसे.
२०१३ मध्ये आयआयटीतून पास आऊट होत असताना दोघांनीही कॉलेज कडून मिळणारी नोकरीची संधी (प्लेसमेंट) नाकारली. असे करणारे त्यांच्या बॅचमधील हे एकमेव व आयआयटी रूर्कीच्या इतिहासातील दुसरे होते. आता त्यांनी दिल्लीकडे येण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीत मोठे व्यवसाय व मोठी लोकसंख्या असल्याकारणाने जाहिरात देखील जास्त मिळतील व त्यासोबत वह्यांची विक्री होण्यास देखील अधिक मदत होईल. दिल्लीत त्यांनी काही जण कामाला ठेवले. त्यांच्याकडून जाहिराती मिळवणे आणि वह्यांची विक्री करणे हे काम सुरू झाले.
कालांतराने मुंबई मध्ये देखील त्यांनी आपला व्यवसाय पोहोचवला. आता प्रत्येक वही मागे त्यांना सुमारे ३० पैसे ते तीन रुपये इतका नफा मिळत होता. आणि त्यांच्या या व्यवसायातील क्षमता पाहून मुंबईमधील एका गुंतवणूकदाराने २५ लाख रुपयांची पहिली गुंतवणूक या कंपनीत केली. आता त्यांची ही कंपनी रजिस्टर झाली होती. दिवसेंदिवस नवे यश संपादन करत होती. बेवकूफ डॉट कॉम, एचसीएल टेक्नॉलॉजी, ऑक्सिजन, वुनिक.कॉम अशा अनेक कंपन्यांच्या जाहिराती त्यांना मिळू लागल्या आहेत.
जी वही बाजारात ५५ रुपयांना मिळते ती अॅडिस्टर केवळ ३५ रुपयांना विकते. वह्यांच्या विक्रीसाठी त्यांनी अनेक दुकानदार व कोचिंग क्लासेस सोबत टाय अप केले आहे. बदलत्या काळासोबत तंत्रज्ञानाचा वापर देखील आपल्या वह्यांमध्ये त्यांनी केला. स्वतःचे एक ॲप देखील तयार केले. या ॲप द्वारे त्यांच्या कंपनीच्या वह्या तुम्ही सहज रित्या पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट करू शकता. कुठल्याही माध्यमातून शेअर करू शकता. यामुळे विद्यार्थ्यांना नोट्स एक्सचेंज करणे अतिशय सोपे झाले. अनुभव याच्या मते जशी तंत्रज्ञान आपली पानं उलटत आहे, तसं व्यवसायाचे पान देखील वेळोवेळी उलटतच राहिलं पाहिजे. तरच आपण यशस्वी होऊ शकतो.