टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म
न्यूयॉर्क शहरातील सर्वात उंच अलिशान टॉवर मध्ये बसून लाखो रुपयांची नोकरी सोडून ते भारतात आले. तेही शेती करण्यासाठी. असं कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल. पण हो, सत्यजित हाणगे आणि त्यांचा भाऊ अजिंक्य हाणगे यांच्या टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्मची भन्नाट यशोगाथा आज आपण जाणून घेऊयात….
पुणे शहराजवळच इंदापूर तालुक्यात भोडणी या खेडेगावात जन्माला आलेले हे दोन शेतकरी पुत्र. आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंब यांचा मुख्य व्यवसाय शेती. परंतु शेतीमधील हालापेष्टा आणि या सगळ्यातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न या सर्व गोष्टी आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून त्यांच्या आईवडिलांनी दोघाही भावांना पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी पाठवलं. अतिशय लहान वयापासूनच पुणे शहरात आधी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दोघांनीही पूर्ण केले. परंतु जेव्हा जेव्हा दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये गावी जाण्याचा प्रसंग यायचा त्यावेळेला आपल्या शेतामध्येच दोघे भाऊ रमत.
शेतीच्या मातीशी एकरूप होणे, तेथील जनावरांची जवळीक साधणे या सर्व गोष्टी त्यांना शहरी जीवनापेक्षा अधिक जास्त प्रिय वाटत होत्या. परंतु उत्तम करिअर घडविण्याच्या उद्देशाने पालकांनी त्यांना शहरांमध्ये ठेवून उच्च शिक्षाविभूषित करण्याचा निर्णय घेतला होता. आणि तसेच झाले. सत्यजितने डिग्री संपादन केल्यानंतर एमबीएची प्रवेश परीक्षा उत्तम गुणांनी पास केली. त्यामुळे पुणे विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागामध्ये त्याचा नंबर लागला. उत्तम प्रकारे आपलं एमबीए पूर्ण केल्यानंतर मोठमोठ्या नामांकीत कंपन्यांमध्ये त्याला बोलावणे येऊ लागलं. वयाच्या आणि करिअरच्या अगदी सुरुवातीलाच लठ्ठ पगाराची नोकरी ती ही आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मिळाल्यामुळे पालकांसोबतच गावकऱ्यांकडूनही अभिजीतचे खूप कौतुक झाले. आई-वडिलांचे स्वप्न साकार झाले होते.
मुळातच अंगाशी जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे सत्यजित आता वेगवेगळे पद पादाक्रांत करत होता. अनेक देशांमध्ये फिरण्याचा देखील त्याला योग येत होता. हे सर्व असूनही एक गोष्ट मात्र त्याला नेहमीच सलत होती आणि ती म्हणजे मी एक शेतकऱ्याचा मुलगा असून देखील शेतीपासून दूर पळतो आहे. लहानपणापासूनच नेहमीच कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त आनंद जर मला मिळाला आहे तर तो केवळ शेतीतूनच. पण केवळ पैसा कमावण्यासाठी आज मी माझ्या मातीपासून दूर राहत आहे.
असेच एकदा बिझनेस दौऱ्यावर असताना सत्यजित अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील सर्वात उंच टॉवरच्या शिखरावर बसून संपूर्ण शहर आपल्यापेक्षा कमी उंचीचे आहे हे पहात होता. म्हणजेच आपल्या कॉर्पोरेट जगतातील यशाच्या शिखरावर पोहचले याची अनुभूती घेत असताना मात्र पुन्हा सत्यजितला आपल्या गावाकडच्या शेतजमिनीची आठवण झाली. आणि अशा ठिकाणी पोहोचून देखील आपल्या शेतीबद्दलची इतकी ओढ त्याला जाणवल्याने त्याने पुन्हा हा आपल्या गावाकडे येण्याचा निर्णय घेतला.
सत्यजितने आपला लहान भाऊ अजिंक्य याच्या समोर गावी परत जाऊन शेती करण्याचा त्यांचा विचार मांडला. अजिंक्य हा देखील एका बड्या बँकेमध्ये उत्तम प्रकारची नोकरी करत होता. अजिंक्यच्या मनात देखील शेती बद्दलचे विलक्षण प्रेम लहानपणापासूनच होते. म्हणून त्याने देखील चटकन या निर्णयाला अनुमोदन दिले. दोघेही उच्चशिक्षित असल्याने त्यांनी चटकन उडी न मारता आधी संपूर्ण अभ्यास करून मग सावधतेने उतरण्याचा निर्णय घेतला. हे करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की, शेती हा व्यवसाय म्हणून जरी अनेक लोक करत असतील तरीदेखील त्यातून मिळणारे उत्पन्न हे सरासरीपेक्षा फारच कमी आहे. अभ्यास करत असताना त्यांच्या आणखी एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे दिवसेंदिवस रासायनिक खते व कीटकनाशके वापरून शेत जमिनीची पोत दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. यासोबतच पावसाच्या पाण्याचा व्यवस्थितपणे निचरा न होणे व त्यामुळे शेतीला पुरेसे पाणी न मिळणे इत्यादी अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर आज उभ्या आहेत.
नाण्याची दुसरी बाजू पाहण्याचा देखील त्यांनी यात विचार केला. शेतीमालाचा उपभोगता आज सुखी आणि समाधानी आहे का या प्रश्नाचा मुळात त्यांनी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रासायनिक कीटकनाशके व खतांमुळे अन्नपदार्थ मधील जीवनावश्यक घटक कमी होत असून किंबहुना जीवनशैलीशी संबंधित आजारांना ते निमंत्रण देत आहेत असं देखील यांच्या लक्षात आलं.
तेव्हा शेती तर करायची पण ती व पारंपारिक पद्धतीने म्हणजेच ऑरगॅनिक पद्धतीने शेती करण्याचा दोघांनीही निर्णय घेतला. आपल्या नोकऱ्या सोडून दोघेजण ज्या वेळेला आपल्या गावी असलेल्या शेतावर पोहचले. त्यावेळेला अवतीभवतीच्या सर्वच लोकांनी नातेवाईकांनी व घरच्यांनी देखील त्यांच्या या निर्णयाची मनमुराद टीका केली. परंतु आपल्या उद्दिष्टांवर आणि निर्णयावर ते ठाम असल्यामुळे त्यांनी कुणाकडेही लक्ष न देता आपले काम सुरू केले.
गेली अनेक वर्ष त्यांची स्वतःची शेतजमीन देखील रासायनिक खते बियाणे आणि कीटकनाशकांचा वापर केला जात असल्यामुळे या दोघांनी केलेला पहिला सेंद्रिय शेतीचा प्रयोग हा सपशेल फसला. त्यांनी सेंद्रिय पद्धतीने लावलेले आपले पहिले पीक एका रोगामुळे अवघ्या काही दिवसांमध्येच संपुष्टात आले. तेव्हा मात्र दोघेजण सतर्क झाले परंतु घाबरून न जाता यातून काय मार्ग काढता येईल याकडे त्यांनी लक्ष दिले.
पारंपारिक शेतीमधील पारंपारिक उत्पन्नच काढून आत्ता सध्या चालणार नाही तर नव्या प्रयोगासाठी नवे पीक लावणे गरजेचे आहे हे लक्षात घेतले. यासाठी त्यांनी पपईची झाडे लावली. संपूर्णपणे सेंद्रिय करत असताना खत आणि कीटकनाशकांच्या ऐवजी गाईचे शेण, गोमूत्र व गूळ यांचा एकत्रित काला केला कडू लिंबाचा रस अशा नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर त्यांनी केला. आणि फार मेहनतीनंतर त्यांचे पहिले पीक त्यांच्या हातात पडले. रासायनिक खते किंवा कीटकनाशके न वापरल्यामुळे यांच्या शेतातील पपई दिसायला जरी आकर्षक नसली तरी देखील ती चवीला मात्र तितकीच उत्कृष्ट होती. आपल्या पपई उत्पादनाला ज्यावेळेला बाजारात घेऊन गेले तेव्हा कमी आकर्षक दिसणाऱ्या यांच्या ऑरगॅनिक पपईला केवळ चार रुपये किलो हा भाव ठरविण्यात आला. त्याचवेळी आकर्षक दिसणाऱ्या परंतु रासायनिक पद्धतीने पिकविलेल्या पपईला आठ ते दहा रुपये किलोचा दर देण्यात आला. हा अजब न्याय पाहून दोघे बंधू हताश झाले आणि यावर दुसरा मार्ग शोधू लागले.
तेव्हा ऑरगॅनिक उत्पादनाला मॉल्समध्ये किंवा बड्या मार्केटमध्ये चांगली मागणी मिळू शकते, असा अंदाज घेऊन त्यांनी मुंबई व पुण्यातील अनेक बड्या मॉल्स संपर्क साधला. परंतु ऑरगॅनिक असल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय तुम्ही मॉलमध्ये माल विक्री करू शकत नाही, असे सांगून त्यांना तिथून देखील परत पाठवण्यात आले. मॉल्स नी माल नाकारला म्हणून पुन्हा मंडई मध्ये जाऊन आपल्या या शेतमालाचा अपमान करून घेणार नाही, हे असे दोघांनीही ठरवले. आणि म्हणून स्वतः रस्त्यावर फळ गाड्यांचा स्टॉल लावून ते स्वतः तिथे विक्रीसाठी उभे राहिले.
येणाऱ्या ग्राहकांना ऑरगॅनिक पदार्थांचे महत्त्व पटवून सांगू लागले. आणि असे करत करत एका सन्माननीय बाजार भाव आला. त्यांनी आपला संपूर्ण माल विकला. परंतु हे करत असताना त्यांना असं लक्षात आलं की उद्या कोणीही कुठलीही फळ ऑरगॅनिक म्हणून जर रस्त्यावर विकू लागले तर यातून ग्राहकांची फसवणूक होईल. ऑरगॅनिक मालावरील लोकांचा विश्वास देखील उठेल. यासोबतच बाजारातून उत्तम किंमत मिळवायची असेल तर तुम्हाला स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याशिवाय पर्याय नाही, हे देखील त्यांच्या लक्षात आले. आणि इथूनच सुरूवात झाली टू ब्रदर्स ऑरगॅनिक सन्स या कंपनीची.
आता त्यांनी शेतीमध्ये आणि प्रयोग करण्यास सुरुवात केली. या प्रयोगांमध्ये नवीन प्रजाती निर्माण करणे, व उपलब्ध असलेल्या उत्पादनातून नवे पदार्थ निर्माण करणे, नैसर्गिक पद्धतीने सर्व फळे पिकविणे, शेतीला पूरक असलेले खत स्वतः निर्माण करणे, किंबहुना पारंपरिक भारतीय वंशाच्या रोपांचे संगोपन करून त्यांचीच वाढ करणे, असे अनेक प्रयोग त्यांनी केले. यासोबतच त्यांनी गाईंचे संगोपन करताना त्यांना देखील कुठलेही कमीत कमी युक्त खाद्य किंवा औषधे वा इंजेक्शन दिले नाहीत. आणि यामुळेच त्यागा यांनी दिलेले दूध हेदेखील उत्तम प्रतीचे निर्माण होऊ लागले.
मुंबईमध्ये दर रविवारी ऑरगॅनिक फार्म मार्केट लावून तिथे आपले ऑरगॅनिक शेतीची उत्पादने विकण्यास त्यांनी सुरुवात केली. यात प्रमुख्याने भाज्या फळे व शुद्ध तूप, पदार्थांचा प्रामुख्याने समावेश आहे. २०१४ मध्ये सुरू केलेली कंपनीत २०१६ मध्ये वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये इतक्या पर्यंत पोहोचली. केवळ मुंबईतील एका मार्केटवर अवलंबून राहून आता चालणार नव्हतं. त्यामुळे भारतभर आपला व्यवसाय कसा वाढवू शकतो, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.
हे करत असतांना त्यांना ऑनलाइन विक्रीचा पर्याय लक्षात आला आणि म्हणून त्यांनी स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट निर्माण केली. ज्यात लोक ऑनलाइन पद्धतीने यांचा माल मागवू शकतात. ताजी फळे व भाज्या जरी ऑनलाईन पद्धतीने डिलिव्हरी करणं शक्य नसेल तरीदेखील ऑनलाईन नैसर्गिक शेवगाच्या पाल्याची पावडर, काही विशिष्ट शक्तीवर्धक चुर्ण, शुद्ध गुळ अशा अनेक वस्तू त्यांनी ऑनलाईन विक्रीसाठी ठेवले आहेत. या सर्व प्रॉडक्टची माहिती ते वेळोवेळी आपल्या सोशल मीडियावर अपलोड देखील करत असतात.
असेच एकदा एका सोशल मीडिया पोस्टवर त्यांना अमेरिकेतील एका व्यक्तीचा मेसेज आला की त्याला यांचे तूप अमेरिकेमध्ये डिलिव्हरी करून हवे आहे. यांनी फार विचार न करता त्याला होकार दिला. मात्र अमेरिकेपर्यंत पुरविण्यासाठी लागणारे लायसन्स व इतर कागदपत्र याची तरतूद करणं यात त्यांचा फार मोठा कालावधी गेला. आणि हे करत असताना मोठ्या प्रमाणात खर्च देखील करावा लागला. परंतु एक नवे मार्केट यांच्यासाठी निर्माण होत आहे हे लक्षात आल्यामुळे त्यांनी ते करण्यास पीछेहाट केली नाही.
तब्बल आठ ते नऊ महिन्यानंतर कुरिअर द्वारे अमेरिकेला टू ब्रदर्स चे तूप यशस्वीरीत्या पाठवण्यात आले. आणि यातूनच त्यांच्यासमोर निर्माण झाला तो एक्सपोर्टचा मार्ग. एका ग्राहकापासून सुरुवात झालेला एक्सपोर्टचा व्यवसाय केवळ पुढील तीन वर्षांमध्ये आज ते चाळीसहून अधिक देशांमध्ये सातशेहून अधिक शहरांपर्यंत पोहोचले आहेत.
२०१६ मधील दोन लाख रुपयेच्या वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत २०२०-२१ मधील त्यांचे उत्पन्न हे १२ कोटी रुपयांचे असून पुढल्या वर्षी २० कोटी रुपयांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. हे सर्व करण्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारची सरकारी सबसिडी कुठल्याही प्रकारचे कर्ज किंवा कुठल्याही फंडिंग एजन्सीकडून गुंतवणूक घेतलेली नाही हे विशेष. आज त्यांची कंपनी देश-विदेशातील व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासाचा विषय बनला असून अनेक देशांमधील बड्या पगाराची नोकरी सोडून तरुण-तरुणी त्यांच्याकडे स्वतःहून नोकरी करण्यासाठी येत आहेत.
आपल्या माती बद्दलचे प्रेम, स्वतःचा जिव्हाळ्याचा विषय झोपा असल्याने संपूर्णपणे झोकून दिल्याने आज आज हे यश त्यांना दिसत आहे. स्वतःचा व्यवसाय मोठा करण्यापर्यंतच न थांबता त्यांनी आपल्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना देखील नैसर्गिक सेंद्रिय शेती चे ट्रेनिंग दिले असून अनेक लोकांकडून आज ते त्यांचा सेंद्रिय माल विकत घेत असून त्यांना देखील रोजगाराची नवीन साधने उपलब्ध करून दिली आहेत. आत्मनिर्भर भारत या उपक्रमांतर्गत स्वतः पंतप्रधान यांनीदेखील त्यांचा सन्मान केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील अतिशय दुर्लक्षित असलेला घटक म्हणजेच शेती याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारे काम या या दोघा तरुणांनी केले आहे. आणि आज ते अनेक तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत.