इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखाद्या सिनेमाची कथा वाटावी अशी घटना अलीकडेच कोलंबियामध्ये घडली आहे. या देशाने इतिहासात नोंद करून ठेवावी, अशी ही घटना आहे. अमेझॉनच्या घनदाट जंगलात वन्यप्राणी, विषारी साप आणि अंधाराला सहज गिळून टाकता येतील अश्या वयातील चार बालके चाळीस दिवस इथे जगली. आता त्यांचे जगभरात कौतुक होत आहे.
एका छोट्याशा विमानातून एक आई आपल्या चार मुलांना घेऊन फिरायला निघाली. सोबत आणखीही दोन लोक होते. अमेझॉनच्या जंगलावरून जात असताना विमानाला अपघात होतो आणि चार बालके सोडून आई व इतर दोघांचा मृत्यू होतो. या मुलांचे वय १३, ९, ४ आणि एक. विश्वास बसणार नाही, पण १३ वर्षाच्या मुलाने इतर तिन्ही भावंडांना पालकाच्या भूमिकेतून जपले आणि चाळीस दिवस कठीण परिस्थितीतही जीवंत ठेवले. अपघातानंतर सर्वांचे मृतदेह सापडले पण मुले सापडली नाहीत. त्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला असेल, असा विचार करण्यात आला. पण मृतदेह हाती लागलेला नव्हता त्यामुळे शोध मोहीम सुरू होती.
मुलांच्या आजीचा एक संदेश रेकॉर्ड करण्यात आला आणि तो प्रत्यक्ष जंगलात आणि हवाई शोध मोहिमेद्वारे ऐकवण्यात आला. ‘मी तुमची आजी आहे. इथे लोक तुमची मदत करायला आले आहेत. ते तुमचा शोध घेत आहेत, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा’, असा संदेश ऐकवण्यात आला. त्याचवेळी शोध पथकाला लहान मुलाच्या पायाचे ठसे एका ठिकाणी आढळले आणि त्यावरूनच मुलांचा शोध लागला.
केसाचे रिबीन आले कामी!
यातील १३ वर्षाचा मुलगा सर्वांत मोठा होता. खरे तर १३ वर्षांच्या वयात काय कळतं, असे आपण म्हणतो. पण ही सगळी मुले कोलंबियातील आदिवासी जमातीची आहेत. त्यामुळे त्यांना सगळे शिक्षण जन्माला आल्यापासूनच दिले जाते. मोठ्या मुलाने केसांच्या रिबिन्स वापरून झाडाच्या फांद्या आणि खोडांचा आधार घेत छताची व्यवस्था केली.
खाण्या-पिण्याचे काय?
ज्यावेळी ही मुले जंगलात अडकली, तो जंगली फळांचा हंगाम होता. त्यामुळे ही फळे त्यांना खाता आली. याशिवाय मोठ्या मुलाने एकप्रकारचे पीठ शोधून काढले, जे विषारी नव्हते. त्यामुळे एक वर्षाचा बालकही या परिस्थितीत पोट भरू शकला. हुईतोतो जमातीचे आदिवासी असल्यामुळे त्यांना विषारी पाने, फळांची ओळख होती. शिवाय डबक्यातील कचरा स्वच्छ करून त्यांनी पाणी पिण्याची व्यवस्थाही केली.