सातपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कलर्स मराठी वाहिनी प्रस्तुत रमा राघव या मालिकेतील अभिनेत्यांसोबत शनिवारी सायंकाळी जिजामाता मैदानावर सर्वोत्कृष्ट जोडी या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातपूरकरांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत मनमुराद आनंद लुटला. दरम्यान, सातपूर कॉलनी येथील चित्रा कटारे व प्रफुल कटारे या दांपत्याने सर्वोत्कृष्ट जोडीचा बहुमान पटकावला.
कलर्स मराठी या वृत्तवाहिनीवर सध्या “खट्याळ प्रेमाची तिखटगोड गोष्ट रामा राघव” ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. याच मालिकेतील रमा राघव भूमिका साकारणारे ऐश्वर्या शेटे व निखिल दामले या कलाकारांच्या उपस्थित जिजामाता शाळेच्या मैदानावर सर्वोत्कृष्ट जोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातपूरकरांनी भरभरून प्रतिसाद देत स्पर्धेत सहभाग नोंदवला. यावेळी रमा राघव या जोडीकडून स्पर्धेतील जोडीदारांकडून ओढणीला गाठ मारणे, फुगा फुगवणे, रिंग रिंग, डान्स, उखाणे घेणे यासह विविध खेळ खेळण्यात आले. यावेळी विजेत्या जोडीला बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फरीदा सलिम शेख, गायत्री सोपान शहाणे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव महिरे,प्रफुल्ल कटारे,जुनेद शेख,बंटी लभडे,विकी संसारे,अजय वाघिरे,संतोष भवर,नाना चौधरी,विजय उल्हारे,अजिंक्य पंडित, दर्शन सिंग,सचिन सांगळे,दादा ठाकरे,सचिन आहिरे आदींसह सम्यक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.