नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहलीसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा पाय घसरून खोल दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सुरगाणा तालुक्यातील साखळचोंड धबधब्याच्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. हा विद्यार्थी दीड हजार फूट दरीत कोसळला. तक्षिल संजाभाई प्रजापती असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुळचा गुजरात राज्यातील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा तातापाणी येथे साखळचोंड धबधबा आहे. या धबधब्याच्या ठिकाणी सुरत येथील सार्वजनिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजचे काही विद्यार्थी सहलीसाठी आले होते. तक्षिल हा इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. तक्षिलसह त्याचे १० ते १२ मित्र पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे आले होते. दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील शॉवर पॉईंट धबधब्यावर अंघोळ करत होते. खडकावर शेवाळ असल्याने तक्षिलचा पाय घसरला. त्यामुळे तो दीड हजार फूट खोल दरीत कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दीड हजार फूट खोल दरीतून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. यासाठी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह रस्त्यावर आणण्यात येऊन पाच वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यासाठी पोलिस व स्थानिक ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले.
College Student Death Surgana Waterfall Accident
Nashik Rural Crime