मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारने महाविद्यालय आणि विद्यापीठांना परवानगी दिली आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील शैक्षणिक केंद्र सुरू होणार आहेत. १५ ते १८ वर्षे वयोगटाचे लसीकरण सुरू असल्याने ज्या विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना महाविद्यालय व विद्यापीठात प्रवेश दिला जाणार आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने सर्व शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमधील शैक्षणिक कार्याला बंदी घातली होती. मात्र, या निर्णयाला अनेक स्तरातून विरोध झाला. हे सर्व पुन्हा सुरू करावे आणि शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी करण्यात आली. २४ जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. यासंबंधीचा निर्णय स्थानिक प्रशासनाला घेण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले आहेत. १५ वर्षे वयापुढे लस उपलब्ध आहे तसेच तरुणांचा मोठा प्रतिसाद लसीकरणाला आहे. त्यामुळे महाविद्यालय आणि विद्यापीठ बंद ठेवणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रीया उमटत होत्या. अखेर उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालय आणि विद्यापीठांचे कामकाज सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला. मुख्यमंत्र्यांनी त्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून महाविद्यालय आणि विद्यापीठातील शैक्षणिक कामकाज पुन्हा सुरू होणार आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.