नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– एलटीटी मुंबई-जयनगर एक्स्प्रेसला (११०६१) देवळाली कॅम्प आणि लहवित रेल्वे स्टेशनच्या मध्ये रविवारी (दि.३) दुपारी ३.२० मिनिटांनी रुळावरून घसरून भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात जयनगर एक्स्प्रेसचे ११ डब्बे रुळावरून घसरल्याने प्रवाशांत एकाच खळबळ उडाली. या डब्यांतील काही प्रवाशी जखमी झाले तर काही प्रवाशांनी भीतीमुळे डब्यांतून बाहेर देखील उड्या घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातस्थळी रेल्वे रुळाखाली एक मृतदेह अडकलेला आढळून आला असला तरी संबंधित मृतदेहाजवळ रेल्वे तिकीट, पास, ओळखपत्र असे ओळख पटेल असे कोणताही पुरावा मिळून आला नसून रेल्वे प्रवाशांकडून देखील या मृतदेहाबाबत कोणताही दावा देखील करण्यात आलेला नसल्याची माहिती अपघातस्थळी मदतकार्यासाठी उपस्थित मध्यरेल्वेच्या अधिका-यांनी दिली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या रेल्वे अपघातातील जीवितहानीबद्दल नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.
जयनगर एक्स्प्रेस मुंबईकडून नाशिकच्या दिशेने येत असतांना लहवित स्टेशनजवळ अचानक या गाडीचे अकरा डबे रुळावरून घसरल्याने प्रवाशांत एकच गोंधळ उडाला. या अपघाताची माहिती मिळताच सर्वप्रथम स्थानिक नागरीक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. काही वेळातच रेल्वेचे स्थानिक अधिकारी, रेल्वे पोलीस, आरपीएफ पथक अपघातस्थळी दाखल झाले आणि मदत कार्याला वेग आला. जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांनीही अपघातस्थळी धाव घेतली आणि मदतकार्याचा आढावा घेत सुचना केल्या. जखमी प्रवाशांना नाशिक शहर बसेस द्वारे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींत बहुतेक उत्तर भारतातील प्रवाशांचा समावेश आहे. ज्या प्रवाशांना वाहन उपलब्ध झाले नाही त्यांनी साहित्य घेवून पायीच घटनास्थळ सोडले. मनमाड येथून रेस्क्यू व्हन आणी पथक अपघातस्थळी दाखल झाल्यावर तातडीने मदतकार्य, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळी ६.०५ मिनिटांनी मुंबई येथूनही एक खास रेल्वे गाडी प्रवाशांसाठी सोडण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली. मध्यरेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी, भुसावळ डीआरएम केडिया हे वरिष्ठ अधिकारी देखील अपघातस्थळाच्या दिशेने रवाना झाले. प्रवाशी, त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने तत्काळ हेल्पलाईन नंबर देखील जाहीर केले.
नवीन कोचेसमुळे प्रवाशांचे प्राण वाचले-
अपघातग्रस्त जयनगर एक्स्प्रेसचे कोचेस नवीन होते. त्यामुळे एवढा भीषण अपघात होऊनही प्रवाशी जखमी होण्याचे प्रमाण कमी झाले, अशी माहिती अपघातस्थळी उपस्थित रेल्वे अधिका-यांनी दिली. अपघातस्थळी रेल्वेच्या मदत पथकाला तीन जखमी प्रवाशी मिळून आलेले असले तरी प्रत्यक्ष जखमींची संख्या वाढण्याची शक्यताही काही अधिका-यांनी व्यक्त केली.
मार्ग बदलविण्यात आलेल्या रेल्वे गाड्या-
१-सीएसएमटी-हावडा एक्सप्रेस (१२३२२)-पुणे दौड मार्गे मनमाड,
२-सीएसएमटी-नागपूर एक्सप्रेस (१२२८९)-वसईरोड मार्गे सुरत-जळगाव,
३-एलटीटी-बनारस एक्स्प्रेस (१२१६७)- पुणे दौड मार्गे मनमाड,
४-एलटीटी-पाटलीपुत्र एक्स्प्रेस (१२१४१)- पुणे दौड मार्गे मनमाड,
५-एलटीटी-हतिया एक्स्प्रेस (१२८११)- पुणे दौड मार्गे मनमाड,
६-सीएसएमटी-फिरोजपूर पंजाब मेल (१२१३७)- वसईरोड मार्गे भोपाल,
७-एलटीटी-पटना एक्सप्रेस (१३२०२)- पुणे दौड मार्गे मनमाड,
८-सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस (१२१३९)- पुणे दौड मार्गे मनमाड,
रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या-
१-सीएसएमटी-संक्राईल (००११३)-स्पेशल पार्सल ट्रेन
२-सीएसएमटी-मुंबई-गोंदिया (१२१०५)