विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
नाईट कर्फ्यूतही जंगी विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर समारंभस्थळी गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी वऱ्हाडींना चोप दिला. याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाल्यानंतर अखेर सरकारने जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांचे निलंबन केले आहे.
कोरोनामुळे देशात विविध ठिकाणी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधातच लग्नसोहळ्याचा हंगाम सुरू आहे. अशा लग्नांचे व्हिडिओ आणि फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन होत असलेल्या दोन लग्नसोहळ्यात पश्चिम त्रिपुराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी छापे मारले. यादरम्यान त्यांचे रौद्ररूप पाहायला मिळाले. जिल्हाधिकार्यांनी मंगल कार्यालयाला सीलच केले नाही, तर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कायमस्वरूपी बंदच करून टाकले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दोन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव लग्नसोहळे थांबवत असल्याचे दिसत आहेत. त्यामध्ये त्यांचा राग अनावर होत असल्याचे दिसत आहे. मंगलकार्यालयात छापा मारताना जिल्हाधिकार्यांनी कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याबद्दल लग्नातील सर्व वर्हाडींना बाहेर काढले. त्यापैकी एकाला कानशिलातही लगावली.
रात्रीची संचारबंदी सुरू असताना या कार्यालयात थाटामाटात लग्नसोहळा सुरू होता. लग्नातही ठरवून दिलेल्या लोकांपेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. रात्रीची संचारबंदी सुरू असतानाही रात्री उशिरापर्यंत सोहळा सुरूच होता. तेव्हा पोलिसांच्या लवाजम्यासह जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी छापा मारून दोन्ही कार्यालयांमधून तेथील वर्हाडी लोकांना बाहेर हाकलले. आपत्कालीन व्यवस्थापन अधिनियम आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी वर आणि वधुसह सर्व सहभागी लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
बघा हे दोन्ही व्हिडिओ
https://www.facebook.com/100001973199329/videos/3993489397393461/
#DM_Agartala#marriage pic.twitter.com/eFLSXXsmHW
— सोमेश?? (@mrsomeshsaxena) April 27, 2021