नाशिक – राज्यातील रत्नगिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुर, सांगली व इतर जिल्ह्यामध्ये महापुरामुळे दरड कोसळुन मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होऊन नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने या पुरग्रस्त भागतील नागरीकांना सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सर्व धर्मदाय संस्थांनी पुढाकार घेवून गरजूंना शक्य ती मदत करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, महापुरामुळे वरील जिल्ह्यामध्ये कधीही भरुन न येणारे नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत शासन स्तरावर आवश्यक त्या उपाय योजना केल्या जात आहे. परंतु सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सर्वांनी या नागरीकांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत मदत करण्यासाठी आर्थिक स्वरूपात स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा फोर्ट, मुंबई, शाखा कोड 00300, IFSC कोड SBIN0000300, खाते क्रमांक 10972433751 यावर धनादेश किंवा डिमाण्ड ड्राफ्टद्वारे आर्थिक मदत करता येईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सोनवणे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.